भारतातील क्विक कॉमर्स क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. याचे मुख्य कारण आहे माणसांच्या बदलत्या गरजा. आज लोक बाजारात जाऊन खरेदी करण्याऐवजी वस्तू घरपोच मागविण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कंपन्या आता क्विक कॉमर्स क्षेत्राकडे वळत आहेत. ॲमेझॉन लवकरच या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. कंपनी बंगळुरूपासून १५ मिनिटांत डिलिव्हरी करण्याच्या प्रयोगाला सुरुवात करणार आहे. हा प्रयोग सर्व मोठ्या शहरांमध्ये करून, त्याची व्याप्ती वाढवली जाण्याची अपेक्षा आहे. प्रसिद्ध अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी भारतात आपल्या सेवांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता ही कंपनी क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करणार असल्याने मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सध्या भारतात क्विक कॉमर्स क्षेत्रात झोमॅटोच्या ब्लिंकइट, झेप्टो व स्विगी इन्स्टामार्टसारख्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. ॲमेझॉन कंपनीची जवळची प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्टनेही काही भागांत ही सेवा सुरू केल्याने, आता ॲमेझॉनही या क्षेत्रात उतरत आहे. भारतात क्विक कॉमर्स सेक्टरचा विस्तार कसा होत आहे? ॲमेझॉनने या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय का घेतला? ॲमेझॉनची ही सेवा कधी सुरू होणार आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
हेही वाचा : खुले कारागृह म्हणजे काय? त्यात कैदी कसे राहतात आणि काय करतात?
ॲमेझॉन क्विक कॉमर्स क्षेत्रात
भारत जागतिक स्तरावरील अशा काही बाजारपेठांपैकी एक आहे, जिथे क्विक कॉमर्स कंपन्यांना यश मिळाले आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियनसारख्या इतर देश आणि प्रदेशांपेक्षा भारतात जलद वितरणासाठी येणारा खर्च खूपच कमी आहे. तसेच, वितरण कर्मचाऱ्यांचे वेतन जास्त आहे. परिणामी, ॲमेझॉनलाही भारतातील वाढत्या क्विक कॉमर्स क्षेत्राचा भाग व्हायचे आहे. या क्षेत्रात कंपनीला आधीच विस्तारलेल्या डिलिव्हरी नेटवर्कचा फायदा होऊ शकतो, जो देशातील बहुतेक प्रदेशांत पिन कोडद्वारे पसरलेला आहे.
परंतु, क्विक कॉमर्स क्षेत्रातील ॲमेझॉनच्या काही प्रतिस्पर्ध्यांच्या असे लक्षात आले आहे की, असे नेटवर्क सुरुवातीपासून तयार केले जाऊ शकते. ॲमेझॉन इंडिया कंपनीचे भारताचे प्रमुख मनीष तिवारी यांनी ॲमेझॉन कंपनी सोडली असून, त्यांनी नेस्ले इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ॲमेझॉन सेलर सर्व्हिस इंडिया ई-कॉमर्स कंपनीच्या भारतीय बाजारपेठेतील घटकाने २५,४०६ कोटी रुपयांच्या परिचालन महसुलात १४ टक्के वाढ नोंदवली. त्यांचा निव्वळ तोटा २८ टक्क्यांनी कमी होऊन, ३,४६९ कोटी रुपये झाला.
भारतात क्विक कॉमर्स क्षेत्राचा विस्तार
क्विक कॉमर्स हे भारतातील सर्वाधिक गर्दीच्या बाजारपेठांपैकी एक ठरत आहे. भारतात झोमॅटोच्या मालकीच्या ब्लिंकिट, स्विगीज इन्स्टामार्ट आणि झेप्टो यांसारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणात शेअर नियंत्रित करतात; ज्याचा बाजारातील वाटा ४५ अब्ज डॉलर्स इतका मोठा आहे, असे गुंतवणूक बँकिंग फर्म ‘जे. एम. फायनान्शियल’ने म्हटले आहे. २०१९-२० मध्ये करोना साथीच्या आजारापूर्वी, अशा कंपन्यांचे एकूण व्यापारी मूल्य एक बिलियन डॉलर्सपेक्षा कमी होते; परंतु त्यानंतर २०२३-२४ मध्ये ते ३.३ अब्ज डॉलर्स झाले आहे, असे सल्लागार फर्म ‘रेडसिर’ने म्हटले आहे.
क्विक कॉमर्स मार्केटमध्ये झपाट्याने वाढ झाल्यामुळे फ्लिपकार्टलाही या क्षेत्रात उतरणे भाग पडले. तसेच नायका आणि मिंत्रा यांसारख्या सौंदर्य व कपडे ई-टेलर्सनीदेखील अशा सेवा सुरू केल्या आहेत. बिग बास्केट आणि रिटेलचे जिओ मार्टही या बाजारात उतरले आहेत. मोतीलाल ओसवाल यांच्या अलीकडील अहवालानुसार, ब्लिंकिट ४६ टक्के शेअरसह क्विक कॉमर्स मार्केटमध्ये आघाडीवर आहे. त्यानंतर झेप्टो २९ टक्के शेअरसह दुसऱ्या स्थानावर आहे. स्विगी इन्स्टामार्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे; ज्याचे शेअर्स २५ टक्के आहेत.
हेही वाचा : चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताला रशियाची मदत! काय आहे वोरोनेझ रडार प्रणाली?
ब्लिंकइट आणि इन्स्टामार्टमधील स्पर्धा
क्विक कॉमर्स क्षेत्रातील दोन सर्वांत मोठे प्रतिस्पर्धी झोमॅटोचे ब्लिंकइट आणि स्विगीचे इन्स्टामार्ट फूड डिलिव्हरी आणि स्टॉक मार्केटमध्येही स्पर्धक आहेत. डेटा दर्शवितो की, ब्लिंकिट सध्या आघाडीवर आहे. २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत ब्लिंकइटने मागील तिमाहीच्या तुलनेत पाच टक्के वाढ नोंदवून सहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त ऑर्डर मूल्य (जीओव्ही) नोंदवले. त्या तुलनेत इन्स्टामार्टचे जीओव्ही तीन हजार कोटींपेक्षा थोडे जास्त होते. झेप्टोचे मागील तिमाहीतील आकडे उपलब्ध नाहीत. मात्र, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये (कंपनीच्या ताज्या उपलब्ध अहवालात) कंपनीने १४ पटींनी वाढ नोंदवली होती आणि कंपनीचा महसूल २,०२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला; पण तरीही कंपनीचे नुकसान झाले. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये विक्रीत वाढ होण्याची आणि महसूल पाच हजार कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.