समाजमाध्यमांचा अतिवापर मानवी शरीरासाठी घातक आहे, असे अनेकदा सांगितले जाते. अनेक अभ्यासांतून ते स्पष्टही झालेले आहे. समाजमाध्यमांचा प्रमाणपेक्षा अधिक वापर केल्यास नैराष्य, तणाव, चिडचिड करणे अशा समस्या उद्भवू शकतात. लहान, किशोरवयीन तसेच तरुण मुलांवरही समाजमाध्यमाच्या वापरामुळे प्रतिकूल परिणाम होत आहेत. याच कारणामुळे या माध्यमांचा वापर मर्यादित प्रमाणात करावा, असे अनेकजण सांगतात. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेत एकूण ३३ राज्यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबूकची पालक कंपनी ‘मेटा’विरोधात थेट तक्रार केली आहे. इन्स्ट्राग्राम, फेसबूकच्या अतिवापरामुळे तरुणांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे, असा दावा या राज्यांनी केला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे? मेटा कंपनीने यावर काय स्पष्टीकरण दिले आहे? समाजमाध्यमांच्या अतिवारामुळे नेमके काय होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…
“मेटा कंपनीकडून मुलांना प्रवृत्त केले जात आहे”
अमेरिकेतील ३३ राज्यांच्या अॅटर्नी जनरल्सनी मेटा कंपनीविरोधात तक्रार केली आहे. तक्रार करणाऱ्यांमध्ये कॅलिफोर्निया, न्यू यॉर्क यासारख्या राज्यांचाही समावेश आहे. आपल्या तक्रारीत ‘मेटा कंपनीने त्यांच्या वेगवेगळ्या मंचाच्या (इन्स्ट्राग्राम, फेसबूक) वापराच्या धोक्यांसंदर्भात लोकांची वारंवार दिशाभूल केली आहे. यासह तरुण मुले, किशोरवयीन मुलांना समाजमाध्यमांची सवय लागावी (व्यसन जडावे) यासाठी मेटा कंपनीकडून मुलांना प्रवृत्त केले जात आहे,’ असा आरोप या राज्यांनी केला आहे.
“तरुणांना लक्ष्य केले जात आहे”
दोन वर्षांपूर्वी मेटा कंपनीतील कर्मचारी फ्रान्सेस हौगेन यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांनंतर जगभरात खळबळ उडाली होती. मेटा कंपीकडून नफा मिळवण्यासाठी तरुणांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे, असा आरोप हौगेन यांनी केला होता. हा आरोप करताना त्यांनी मेटा कंपनीने इन्स्टाग्रामच्या वापरासंदर्भात एक केलेल्या एका सर्वेक्षणाच आधार घेतला होता. हाच अभ्यास नंतर हौगेन यांनी सार्वजनिक केला होता. ज्या तरुण मुली इन्स्टाग्राम वापरत आहेत त्या नैराश्यात, तणावात आहेत. तसेच या मुलींना स्वत:च्या शरीरासंदर्भात नैराश्य आले आहे, असे या सर्वेक्षणाच्या अभ्यासात सांगण्यात आले होते.
अमेरिकेच्या ३३ राज्यांनी केलेल्या तक्रारीत नेमके काय आहे?
अमेरिकेच्या ३३ राज्यांनी मेटाविरुद्ध केलेल्या तक्रारीत अनेक दावे करण्यात आले आहेत. या तक्रारींमध्ये मेटा कंपनीच्या इन्स्ट्राग्राम, फेसबूक या मंचावर असलेल्या लाईक्स, अलर्ट, फिल्टर्स अशा वेगवेगळ्या सुविधांचाही उल्लेख केला आहे. असे पर्याय देऊन मेटातर्फे तरुण मुला-मुलींमध्ये ‘बॉडी डिसमॉर्फिया’च्या भावनेला प्रोत्साहित केले जात आहे. बॉडी डिसमॉर्फिया अशी मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वत:च्या शरीराविषयी चिंता करते. माझ्या शरीरात काहीतरी अभाव आहे, असा भास संबंधित व्यक्तीला होत असतो. मात्र या व्यक्तीसंदर्भात अशा प्रकारच्या कोणत्याही लक्षणांकडे आजूबाजूंच्या लोकांचे लक्ष नसते. बॉडी डिसमॉर्फियामध्ये संबंधित व्यक्ती स्वत:च्या शरीराची काळजी करण्यात वेळ घालवते. तसेच बाह्यरुपात काहीतरी कमतरता आहे, असा भास या व्यक्तीला होत असतो.
“मुलांना भूरळ घालण्यासाठी शक्तीशाली तंत्रज्ञानाचा वापर”
“मेटा कंपनीने तरुण आणि किशोरवयीन मुलांना भूरळ घालण्यासाठी तसेच या मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी शक्तीशाली तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. किशोरवयीन तसेच छोट्या मुलांना जाळ्यात ओढण्यासाठी कोणकोणत्या मार्गांचा अवलंब केलेला आहे, ते मेटाने दडवून ठेवले आहे. यासह अशा प्रकारच्या मंचांमुळे देशातील तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर किती नकारात्मक परिणाम पडत आहे, याकडेही मेटा कंपनीने दुर्लक्ष केले आहे,” असे या तक्रारीत म्हणण्यात आले आहे.
“म्हणूनच ३० पेक्षा अधिक वेगवेगळे टुल्स उपलब्ध करून दिले”
दुसरीकडे मेटाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणावर मेटा कंपनीच्या प्रवक्त्या लिझा क्रेनशॉ यांनी मेटाची भूमिका स्पष्ट केली आहे. “लहान मुलांची सुरक्षितता, त्यांना ऑनालाईन मंचावर सुरक्षित वाटायला हवे, याबाबत आम्ही अॅटर्नी जनरल यांच्या मताशी सहमत आहोत आणि म्हणूनच किशोरवयीन, लहान मुले तसेच त्यांच्या कुटुंबाना सुरक्षित वाटेल यासाठी आम्ही साधारण ३० पेक्षा अधिक वेगवेगळे टुल्स उपलब्ध करून दिलेले आहेत. मात्र जगभरातील कंपन्यांसोबत लहान मुलांच्या सुरक्षेवर सकारात्मक पद्धतीने काम करण्याऐवजी अॅटर्नी जनरल यांनी अशा प्रकारचा मार्ग निवडला आहे. यामुळे आमची निराशा झाली आहे. जगभरात अनेक कंपन्यांचे वेगवेगळे अॅप्स वापरले जातात. या अॅप्सवर किशोरवयीन, लहान आणि तरूण मुलांसाठी योग्य तसेच वयोमानानुसार सुरक्षित मंच उपलब्ध करून देण्यावर या कंपन्यांशी सकारात्मकपणे काम केले पाहिजे,” अशी भूमिका लिझा यांनी मांडली.
दोन वर्षांपूर्वी फ्रान्सेस यांनी कोणती माहिती समोर आणली होती?
वेगवेगळ्या राज्यांनी केलेल्या तक्रारीत फ्रान्सेस हौगेन यांचाही संदर्भ देण्यात आलेला आहे. २०२१ साली त्यांनी मेटा कंपनीतील अंतर्गत कागदपत्रे बाहेर आणले होते. मेटा कंपनीने इन्स्टाग्रामबाबत एक सर्वेक्षण केले होते. हौगेन यांनी बाहेर आणलेल्या कागदपत्रांत या सर्वेक्षणाचीही माहिती होती. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून इन्स्टाग्राममुळे ब्रिटन आणि अमेरिकेतील किशोरवयीन मुलांवर परिणाम पडतो, असे सांगण्यात आले होते. “इन्स्टाग्राम वापरल्यानंतर आम्हाला आमच्या शरीराबद्दल वाईट वाटले, असे ३२ टक्के किशोरवयीन मुलींनी सांगितले होते,” असेही मेटाच्या सर्वेक्षणातून समोर आले होते. अनेक किशोरवयीन मुला-मुलींनी इन्स्टाग्राम वापरल्यामुळे आमच्यात नैराश्य आले होते, आम्ही तणावात होतो, असेही सांगितले होते.
समाजमाध्यमांचा मानसिक आरोग्यावर काय आणि कसा परिणाम पडतो?
समाजमाध्यमांच मानसिकतेवर काय परिणाम पडतो, याचा अभ्यास करण्यासाठी ‘प्यू रिसर्च सेंटर’ने २०२१ सालाच्या एप्रिल महिन्यात एक सर्वेक्षण केले होते. यामध्ये १८ ते २९ वयोगटातील साधारण ७१ टक्के मुलांनी सांगितले होते की ते इन्टाग्राम वापतात. तर ६५ टक्के मुलं हे स्नॅपचॅट वापरतात. सर्वेक्षण केलेल्यांमध्ये साधारण अर्धे मुलं-मुली टिट-टॉक वापरतात. याआधी समाजमाध्यमांचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम पडतो, याचा अनेकांनी अभ्यास केलेला आहे. या अभ्यासाचे अहवालही उपलब्ध आहेत. बिहेवियर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर्नमलध्ये प्रसिद्ध झालेल्या अशाच एका अभ्यासानुसार सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे नैराश्य, तणाव, चिंता यात वाढ होते.