-पंकज भोसले
चित्रपटांच्या जगतात परमोच्च मानला जाणारा ऑस्कर पुरस्कारांचा सोहळा मराठी माध्यमांच्या ज्ञातकाळापासून ‘देखणा’ आणि ‘दिमाखदार’ या विशेषणांनी रंगला. कारण दिसणाऱ्या झळाळीमागच्या किंचितशा काळोखीचे संदर्भही आपल्याला उपलब्ध नव्हते. उदारीकरणाच्या दशकात अमेरिकनांइतकाच इतर देशीयांनाही अधिक जवळ करणाऱ्या या सोहळ्यातील एक कटू इतिहासपान नुकतेच पुन्हा उघडले गेले. मार्लेन ब्रॅण्डो या अभिनेत्याची सर्वोत्तम अभिनेता म्हणून घोषणा झाली, त्यानंतरच्या काही मिनिटांत घडलेल्या नाट्याची आणि त्यानंतर उडालेल्या वादाची झळ आयुष्यभर भोगाव्या लागलेल्या सशीन लिटिलफेदर या कलावतीची तब्बल ५० वर्षांनी ऑस्कर अकादमीने माफी मागितली. माफी आणि पुढील महिन्यात अकादमीने त्याबाबत आयोजित केलेल्या कार्यक्रमाची घोषणा जगभरातील माध्यमांचा विषय बनली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण, ते जाणून घेणे महत्त्वाचे.
कोण या सशीन लिटिलफेदर?
अमेरिकी गौरवर्णीय आई आणि मूळ रेड इंडियन पिता अशा कुटुंबात जन्मलेली सशीन लिटिलफेदर ही एत्तद्देशीय अमेरिकी रहिवाशांच्या हक्कांसाठी लढणारी तरुण कार्यकर्ती म्हणून त्यावेळी परिचित होती. तिने दोन चित्रपटांमध्येदेखील भूमिका मिळविल्या होत्या. पण १९७३ सालच्या ऑस्कर सोहळ्यात ६० सेकंदाचे तिने केलेले भाषण जगभरात तिची छबी पोहोचविणारे ठरले. सोहळ्यात तिला टाळ्यांचा पाठिंबा आला, त्याहून अधिक अवहेलना करण्यात आली. तिचे भाषण लक्ष वेधण्यासाठी केले गेलेले नाट्य आहे, अशी टीका झाली. हाॅलीवूडच्या चित्रकर्त्या, दिग्दर्शकांच्या फळीने या अभिनेत्रीला वाळीत टाकले. तिचे चारित्र्यहननही झाले.
काय घडले होते त्या ऑस्कर सोहळ्यात?
‘गाॅडफादर’ या चित्रपटात करडा माफिया बनलेल्या मार्लन ब्रॅण्डो या अभिनेत्याला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली. जेम्स बाॅण्डचा ब्रॅण्ड विस्तारणारा राॅजर मूर आणि जगभरातील सौंदर्यपूजकांचे प्रेम बनलेली लिव्ह उलमन यांनी या पुरस्काराची बाहुली घेण्यासाठी मार्लन ब्रॅण्डो यांच्या वतीने व्यासपीठावर दाखल झालेल्या सशीन लिटिलफेदर या तरुणीचे स्वागत केले. या तरुणीने पुरस्काराची बाहुली घेण्याचे नाकारले. त्यानंतर तिने केलेल्या भाषणात ‘हाॅलीवूडमधील सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये नेटिव्ह अमेरिकनांच्या केल्या जाणाऱ्या चुकीच्या चित्रणाचा निषेध म्हणून मार्लन ब्रॅण्डो हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले. त्यावेळी बहुतांश प्रेक्षकांनी या भाषणाची जाहीरपणे अवहेलना केली. सोहळ्यानंतर जाॅन वेनसारखा, पडद्यावर न्यायासाठी लढणारा अभिनेता सशीन लिटिलफेदरच्या अंगावर धावून गेला. जाॅन वेन यांना रोखण्यासाठी सहा सुरक्षा रक्षकांचा ताफा बोलवावा लागला.
भाषणाचा भुर्दंड….
आपल्या तारुण्यापासून चित्रपटांत विविध भूमिका गाजविणारे मार्लन ब्रॅण्डो अभिनयाइतकेच सामाजिक कारणांसाठीही ओळखले जात. अनेक वर्षे नेटिव्ह अमेरिकनांच्या न्यायासाठी चालणाऱ्या लढ्यांना त्यांचा सक्रिय पाठिंबा होता. त्यांचे प्रश्न जगापुढे थेट पोहोचविण्यासाठी ब्रॅण्डो यांनी पुरस्कार नाकारण्याची शक्कल लढवली. त्यांनी खूप विचारांती सशीन लिटिलफेदर यांना आपला पुरस्कार नाकारणारे भाषण करण्याची विनंती केली. या एक मिनिटाच्या भाषणानंतर पत्रकार परिषद घेऊन लिटिलफेदर यांनी ब्रॅण्डो यांचे आठ पानी भाषण वृत्तपत्रांना दिले. मात्र अनेक माध्यमांनी लिटिलफेदर यांच्यावर टीका केली. कळकाढ्या वृत्तपत्रांनी लिटिलफेदर आणि मार्लन ब्रॅण्डो यांचे अनैतिक संबंध असल्याच्या वावड्या उठविल्या. हाॅलीवूडने लिटिलफेदर यांना जवळजवळ वाळीत टाकल्यासारखी परिस्थिती झाली. अभिनेत्री म्हणून लिटिलफेदर यांची कारकीर्द सुरू होण्याआधीच संपली.
भाषणाचे तात्कालिक संदर्भ कोणते?
नेटिव्ह अमेरिकनांच्या हक्कांची इतक्या जाहीरपणे वाच्यता करण्याची गरज निर्माण झाली, ती ‘वुंडेड नी क्रीक’ परिसरात झालेल्या घटनांमुळे. १८९० मध्ये अमेरिकी सैनिकांनी मूळ रहिवाशी असलेल्या रेड इंडियनांचा न्यायहक्कांच्या मागणीसाठी केलेले बंड अत्यंत निर्घृणपणे मोडले. शेकडो माणसे त्यात मारली गेली. फेब्रुवारी १९७३ मध्ये पुन्हा या परिसरात गोऱ्या नागरिकांप्रमाणे समान वागणूक दिली जावी यासाठी लढा उभारण्यात आला. एफबीआयपासून अमेरिकी यंत्रणांनी ७१ दिवस या मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या परिसराला वेढा घातला. या राजकीय दडपशाहीचे पडसाद सशीन लिटिलफेदर यांच्या संभाषणात उमटले होते. मार्लन ब्रॅण्डो यांनी पाठिंबा दिल्यामुळे हा प्रश्न राष्ट्रव्यापी बनला. ऑस्कर सोहळा अनेक देशांत पाहिला जात असल्याने, त्यावेळी कोट्यवधी लोकांना या प्रश्नांबाबत माहिती झाली.
ऐतिहासिक भाषणानंतर सशीन यांचे आयुष्य?
या भाषणाआधी सशीन यांना हाॅलीवूड सिनेमांमध्ये ज्या भूमिका मिळाल्या होत्या त्या अत्यंत छोट्या स्वरूपाच्या होत्या. पण भाषणानंतर त्यांची अभिनय कारकीर्द संपुष्टात आली. त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप करण्यात आले. चित्रपटाची वाट सोडून त्यांनी वृद्धांची सेवा करणाऱ्या संस्थांत अनेक वर्षे काम केले. नेटिव्ह अमेरिकन नागरिकांच्या हक्कासाठी त्या सातत्याने लढत राहिल्या. ‘सशीन : ब्रेकिंग द सायलन्स’ या लघुपटाद्वारे २०१८ मध्ये ऑस्कर सोहळ्याच्या इतिहासातील या घटनेची पुन्हा उजळणी करून देण्यात आली होती.
अकादमीच्या माफीनाम्यानंतर काय?
ऑस्कर अकादमीने केलेल्या पत्ररूपी माफीनाम्यात सशीन यांना सहन कराव्या लागलेल्या अन्यायाची भरपाई होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. पुढल्या महिन्यात म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी लिटिलफेदर ७५ वर्षांच्या होतील. सव्वीसाव्या वर्षापासून भोगाव्या लागलेल्या त्रासाची जाहीर माफी त्यावेळी मागितली जाईल. त्यांच्याशी संवादाचा कार्यक्रम अकादमीने योजला आहे. ‘आम्ही रेड इंंडियन्स माणसं खूप सहिष्णू असून अकादमीला माफी मागण्यासाठी फक्त ५० वर्षांचा कालावधी लागला’ अशी टिप्पणी सशीन यांनी केली. यू ट्युबपासून सर्वच माध्यमांवर गेले दोन दिवस सशीन यांचे जगभरातून कौतुक होत आहे. पुढील महिन्यात भाषणात त्या काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.