Apple iPod Discontinued: अ‍ॅपल कंपनीने आयपॉड टच मॉडेल बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आयपॉड प्रोडक्शन आता पूर्णपणे बंद होणार आहे. अ‍ॅपलने ऑक्टोबर २००१ मध्ये आयपॉड लाँच केला होता. त्या काळातील सर्वात प्रसिद्ध संगीत गॅझेट म्हणून याची ख्याती होती. आयपॉड मिनी, आयपॉड नॅनो, आयपॉड शफल आणि आयपॉड टचसारखे अनेक लोकप्रिय मॉडेल्स विकले आहेत. पण गेल्या काही वर्षांत आयपॉड क्लासिक, आयपॉड नॅनो आणि आयपॉड शफलची विक्री फारशी विक्री झालेली नाही. याशिवाय अनेक वर्षांपासून या मालिकेबाबत कोणतेही विशेष आणि मोठे अपडेट जारी करण्यात आलेले नाही. त्याचे शेवटचे अपडेट २०१९ मध्ये 7th Gen आयपॉड टचसाठी रिलीझ करण्यात आले होते. एक काळ असा होता की, बाजारात अ‍ॅपल आयपॉडची मोठी मागणी होती. आयफोनच्या वाढत्या लोकप्रियतेनंतर अ‍ॅपलने आपल्या आयपॉडकडे लक्ष देणे बंद केले आहे. अ‍ॅपल आता २० वर्षांनंतर प्रोडक्ट बंद करणार आहे. आयपॉड टच शेवटच्या स्टॉकपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल, असे अ‍ॅपलने म्हटले आहे.

अ‍ॅपलने आयपॉड का लाँच केले?

आयपॉड लाँच करण्यामागे कंपनीचं एक उद्दिष्ट होतं. या माध्यातून लोकांना अधिक मॅकिंटॉश संगणक खरेदी करण्यास प्रवृत्त केले. अ‍ॅपलने मॅकिंटॉश इकोसिस्टमच्या बाहेर लाँच केलेले पहिले वैयक्तिक डिव्हाइस होते. अनेक वर्षांमध्ये वैयक्तिक संप्रेषण साधन प्रवासातील पहिले पाऊल होते. यासाठी अ‍ॅपलने आयपॉडची निर्मिती केली. “आम्ही आयपॉड केला नसता तर आयफोन बाहेर आला नसता,” अ‍ॅपलचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष टोनी फॅडेल यांनी सांगितलं. आयपॉडचा शोध लावण्याचे श्रेय टोनी फॅडल यांना दिले जाते. “आयपॉडने आम्हाला आत्मविश्वास दिला. यामुळे स्टीव्ह जॉब्समध्ये आत्मविश्वास आला की आम्ही ठरलेल्या चौकटीच्या बाहेर काहीतरी करू शकतो आणि आम्ही नवीन क्षेत्रांमध्ये शोध सुरू ठेवू शकतो.”

आयपॉडला संगीतप्रेमींची पसंती

अ‍ॅपलचा आयपॉड लाँच होताच लोकांच्या पसंतीस उतरले. संगीतप्रेमींची पसंती असण्याबरोबरच लोकांनी आयपॉडला स्टेटस सिम्बॉलही मानले. विशेषतः कॉम्पॅक्ट साइज आणि युनिक स्क्रोल व्हील लोकांना आवडले. आयपॉड टचने त्याकाळी लोकांना संगीताचा आस्वाद घेण्याचा आधुनिक मार्ग दिला. यामध्ये युजर्संना टच स्क्रीन आणि इंटरनेट सपोर्ट मिळत असे.

आयपॉडचा प्रवास

परवडणाऱ्या हँडहेल्ड डिव्हाइससह आयपॉड वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि मॉडेल्समध्ये उपलब्ध झाले. यामुळे अनेक लोकांना अ‍ॅपल इकोसिस्टमची ओळख करून दिली. आयपॉड क्लासिक नंतर त्याच्या पॉलिश स्टील फ्रेम आणि आयकॉनिक क्लिक व्हीलद्वारे ओळखता येण्याजोगे लहान आयपॉड मिनी लाँच केले. त्यानंतर आणखी लहान आयपॉड नॅनो आले. २००५ मध्ये अ‍ॅपल आयपॉड शफल घेऊन आले. हे स्क्रीनशिवाय पहिले आयपॉ़ड मॉडेल होते. सप्टेंबर २००७ मध्ये, अ‍ॅपलने पहिल्या आयफोनचे अनावरण केल्याच्या काही महिन्यांनंतर आयपॉड टच लाँच केले. एक मल्टी टच डिव्हाइस जे वायफाय, सफारी ब्रॉउजर, यूट्यूब यासह आले होते. सध्या विकले जात असलेले मॉडेल आयपॉड टचची सातवी आवृत्ती आहे. त्या काळातील पोर्टेबल कॅसेट प्लेअर्सपेक्षा वेगळ्या पद्धतीने संगीत पोर्टेबल बनवण्यात कंपनीला यश आलं. ९९ सेंट्समध्ये गाणी विकत घेण्याची, डाउनलोड करण्याची आणि खिशाच्या आकाराच्या डिव्हाइसमध्ये संग्रहित करण्याची क्षमता त्याच्या काळासाठी अत्याधुनिक मानली गेली.

मागणी का घटली?

आयपॉडच्या नंतर जन्माला आलेल्या आयफोनने पोर्टेबल म्युझिक प्लेअर्स बंद करण्यात भूमिका बजावली. स्मार्टफोनवरील वाढीव कार्यक्षमतेमुळे आयपॉड अनेक ग्राहकांनी पाठ फिरवली. याशिवाय, स्पॉटिफाई, आयट्यून्स, प्राइम म्युझिक इ. संगीत स्ट्रीमिंग सेवांसोबत वेगवान स्वस्त इंटरनेटमुळे आयपॉडचा वापर खूपच कमी झाला. आयपॉड लाँच झाल्यापासून अ‍ॅपलने अंदाजे ४५० दशलक्ष आयपॉड डिव्हाइसची विक्री केली आहे. परंतु मागील आर्थिक वर्षात २०१४ च्या तुलनेत युनिट विक्री सुमारे २४ टक्क्यांनी घसरली, असा अहवाल डब्ल्यूएसजेने दिला. कंपनीने २०१५ मध्ये आयपॉड विक्रीचा अहवाल देणे बंद केले. टेक रिसर्चमध्ये खास असलेल्या लूप व्हेंचर्स या उद्यम भांडवल फर्मच्या डेटाचा हवाला देणार्‍या द न्यूयॉर्क टाइम्सच्या मते,अ‍ॅपलने गेल्या वर्षी अंदाजे ३ दशलक्ष आयपॉड विकले. तर २५० दशलक्ष आयफोन विकले गेले.

अ‍ॅपलच्या संगीत इकोसिस्टमचे पुढे काय?

कंपनी अ‍ॅपल म्युझिकच्या माध्यमातून आपली संगीत स्ट्रीमिंग सेवा सुरू ठेवेल. तसेच इतर उपकरणांवर उपलब्ध असेल. एका निवेदनात, अ‍ॅपलचे वर्ल्डवाइड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रेग जोसविक म्हणाले: “आज आयपॉडचा आत्मा जिवंत आहे. आम्ही आमच्या सर्व उत्पादनांमध्ये ही सेवा देत आहोत. आयफोन ते अ‍ॅपल वॉच ते होमपॉड मिनी, मॅक, आयपॅड आणि अ‍ॅपल टीव्हीवर एक अविश्वसनीय संगीत अनुभव एकत्रित केला आहे”