बांगलादेशमध्ये सोमवारी राजधानी ढाकासह अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र स्वरूपाची आंदोलने झाली. ही आंदोलने गाझामधील इस्रायलच्या लष्करी मोहिमेचा निषेध म्हणून करण्यात आली. या आंदोलनात इस्रायलशी संबंधित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या मागणीसाठी निदर्शक रस्त्यावर उतरले. या आंदोलनाचे स्वरूप उग्र झाले आणि आंदोलकांनी बाटा, केएफसी व पिझ्झा हट यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडना लक्ष्य केले. ‘ढाका ट्रिब्यून’ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक भागांत या आंदोलनांनी हिंसक स्वरूप धारण केले. दुकानांची तोडफोड करण्यात आली आणि त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. बांगलादेशमधील या तणावाचे कारण काय? बाटा, केएफसी व पिझ्झा हटला बांगलादेशी नागरिकांनी लक्ष्य का केले? त्याविषयी जाणून घेऊ…
बांगलादेशात पिझ्झा हट, केएफसी अन् बाटाच्या दुकानांची लूटमार
बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये इस्रायलविरोधात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांनी काही वेळातच हिंसक स्वरूप घेतले आणि निदर्शकांनी आपला मोर्चा जागतिक फ्रँचायजींकडे वळवला. निदर्शकांनी इस्रायलशी संबंधित दुकानांवर हल्ले केले आणि लूटमार केली. बोगरा शहरात शेकडो विद्यार्थी व स्थानिक सातमाथा चौकात जमले आणि त्यांनी हातात फलक घेऊन ‘गाझामधील नरसंहार’चा निषेध अशा स्वरूपाची घोषणाबाजी केली. या निदर्शनांमध्ये इस्रायली उत्पादनांवर देशात बहिष्कार टाकण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ब्रँडदेखील या हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप करीत त्यांनी दुकानांवर हल्ले केले.
निदर्शकांनी सर्वप्रथम बाटा शोरूमवर हल्ला केला. त्यानंतर या निदर्शनाला हिंसक वळण लागले. निदर्शकांनी बाटाच्या इमारतीवर विटा फेकल्या. परिणामी इमारतीच्या काचा फुटल्या. कर्मचाऱ्यांनी तातडीने आतून दरवाजे बंद करून घेतल्याने दुकानाचे होणारे पुढील नुकसान टळले. “निदर्शकांनी इमारतीवर विटा फेकल्या आणि काचा फोडल्या. मात्र, कोणतीही मोठी किंवा अनुचित घटना घडली नाही”, असे बोगरा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एस. एम. मोइनुद्दीन यांनी सांगितले.
बांगलादेशमधील सिल्हेट शहरात निदर्शकांनी मीरबोक्सतुला परिसरातील केएफसी आउटलेटवर हल्ला केला. त्यांनी असा दावा केला की, हा ब्रँड इस्रायली कंपन्यांशी संबंधित आहे. त्यांनी या दुकानावर हल्ला करून शीतपेयांच्या बाटल्या फोडल्या, असे ‘बंगाली ट्रिब्यून’च्या वृत्तात सांगण्यात आले. निदर्शनाचे हिंसक स्वरूप बघता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केएफसी आउटलेट बंद केले. बांगलादेश सरकार आणि संयुक्त राष्ट्राकडून इस्रायलशी संबंधित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची कार्यवाही त्वरित करावी, अशी मागणी निदर्शकांनी केली. तसेच, देशांतर्गत इस्रायली वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात यावा, असे आवाहन त्यांनी लोकांना केले.
इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये निरपराध मुले, महिला आणि नागरिक मारले जात आहेत. सर्वांनी मानवतेसाठी उभे राहण्याची वेळ आली आहे, अशाही घोषणा निदर्शकांनी दिल्या. बांगलादेशच्या चितगावमधील जीईसी चौकाजवळदेखील हिंसाचार उफाळला. निदर्शकांनी जीईसी चौकाच्या परिसरातील केएफसी आणि पिझ्झा हट या ब्रँडच्या दुकानांची तोडफोड केली. त्यांनी इमारतीवर विटा, दगड आणि बूट मारून फेकले. त्या हल्ल्यांमुळे दोन्ही दुकानांच्या काचा पूर्णपणे फुटल्या. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चितगाव महानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. “आम्ही घटनेची चौकशी करीत आहोत. परिस्थिती आता नियंत्रणात आहे”, असे बांगलादेशातील पंचलाईश येथील पोलिस प्रमुख मोहम्मद सुलेमान यांनी ‘ढाका ट्रिब्यून’ला सांगितले.
कॉक्स बाजारातदेखील निदर्शकांनी या दुकानांवर हल्ले केले. कलातली परिसरात निदर्शक जमले आणि त्यांनी केएफसी व पिझ्झा हटच्या साइन बोर्डवर दगडफेक केली. कॉक्स बाजार येथील पोलीस अधिकारी इलियास खान यांनी ‘बीबीसी बंगाल’ला सांगितले की, रेस्टॉरंट्समध्ये कोणतीही तोडफोड झाली नाही. केवळ त्यांच्या साइन बोर्डवर दगडफेक करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षदर्शी आपला अनुभव सांगत म्हणाले की, या हल्ल्यांमुळे जवळपासच्या अनेक दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या घटनेवर ‘बाटा’ची प्रतिक्रिया
बांगलादेशातील ‘बाटा’च्या दुकानांना लक्ष्य करून, दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर ‘बाटा’ने अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली आहे आणि या हल्ल्यांचा निषेध केला. ‘बाटा’कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात कंपनीने अशांततेला खतपाणी घालणाऱ्या चुकीच्या माहिती पसरवण्यात येत असल्याचे सांगून लिहिले, “बाटाबद्दल चुकीची माहिती पसरविण्यात आली आहे की, बाटा ही इस्रायलच्या मालकीची कंपनी आहे किंवा चालू इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात ‘बाटा’चा राजकीय संबंध आहे, असा केला जाणारा दावा स्पष्टपणे चुकीचा आहे”. ‘बाटा’ने या निवेदनात पुढे सांगितले, “बाटा ही खासगी आणि कुटुंबाच्या मालकीची कंपनी आहे. या संघर्षाशी कंपनीचा कोणताही राजकीय संबंध नाही. बांगलादेशातील आमच्या दुकानांवर अलीकडेच झालेले हल्ले ही अत्यंत खेदजनक बाब आहे”.
राजकीय तणावात वाढ
बांगलादेशात सुरू असलेल्या इस्रायलविरोधी निदर्शनांमुळे जनजीवन विस्कळित झालेय. मुख्य म्हणजे राजकीय तणावही पुन्हा निर्माण झाला आहे. मुख्य सल्लागार व नोबेल पुरस्कारविजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. दुसरीकडे शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगनेदेखील या घटनांचा विरोध केला आणि या घटनांचा उल्लेख देशातील वाढत्या अतिरेकीपणाचे संकेत म्हणून केला. हे राजकीय संकट नसून, राष्ट्रीय आणीबाणी आहे. याबाबत इतर देशांनी काही भूमिका घेतली नाही, तर बांगलादेशचा अफगाणिस्तान होण्यास वेळ लागणार नाही, असे अवामी लीगने जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे
“हे केवळ राजकीय संकट नाही; तर ही एक राष्ट्रीय आणीबाणी आहे. जर आंतरराष्ट्रीय समुदाय गप्प राहिला, तर बांगलादेश पुढील अफगाणिस्तान बनण्याचा धोका आहे,” असे निदर्शने हिंसक झाल्यानंतर जारी केलेल्या निवेदनात अवामी लीगने म्हटले आहे. त्यांनी या परिस्थितीसाठी युनूस यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाला जबाबदार धरले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलण्यास सांगितले. या घटनेवर मुहम्मद युनूस म्हणाले, “सोमवारी अनेक शहरांमध्ये गाझासमर्थक निदर्शनांमधील हिंसक घटनांवर बांगलादेश पोलिसांनी त्वरित कारवाई केली आहे.
हे हल्ले सार्वजनिक सुरक्षितता आणि कायद्याचा अपमान आहे.” त्यांनी पुढे नमूद केले, “आतापर्यंत या घटनेंतर्गत किमान ४९ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जलद गतीने कारवाई केली आहे. पुढील तपास सुरू असून, या निंदनीय कृत्यांसाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध अतिरिक्त गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे,” असे त्यांनी नमूद केले.