भारतात मागील काही काळात घरगुती काम करणाऱ्या कामगारांवर घरमालकाकडून अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बुधवारी (१९ जुलै) अशीच एक घटना नैऋत्य दिल्लीतील द्वारका परिसरात घडली. महिला वैमानिक आणि तिच्या पतीने एका १० वर्षीय मुलीकडून मोलकरणीचे काम करवून घेतले आणि तिला मारहाणही केली, असा आरोप या दाम्पत्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या या कृत्याची माहिती आजूबाजूच्या परिसरात पसरल्यानंतर जमावाने दाम्पत्याला घराबाहेर खेचून मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्ली (द्वारका) पोलिस आयुक्त एम. हर्षवर्धन यांनी सांगितले की, या दाम्पत्याने दोन महिन्यांपूर्वी पीडित मुलीला घरकामासाठी ठेवले होते. पीडित मुलीच्या अंगावर जखमा दिसल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी याची माहिती पोलिसांना दिली. “या घटनेची माहिती आजूबाजूच्या परिसरातील लोकांना कळल्यानंतर या लोकांनी दाम्पत्याला याचा जाब विचारला आणि मारहाण केली. वर्धन यांनी सांगितले की, पती कौशिक बागची (वय ३६) आणि त्याची पत्नी पूर्णिमा बागची (३३) यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंडविधान कलम ३२३, ३२४ व ३४२, बालकामगार प्रतिबंधक कायदा आणि बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तथापि, घरगुती कामगारांवर अन्याय-अत्याचार करणारी ही काही पहिलीच घटना नाही. भारतात घरगुती कामगार किंवा मदतनीस सुरक्षित का नाहीत, या प्रश्नाचा आढावा फर्स्टपोस्ट या संकेतस्थळाने घेतला आहे.

अत्याचाराची काही ताजी प्रकरणे

फेब्रुवारी महिन्यात गुरुग्राम येथील घरातून एका १७ वर्षीय मोलकरणीची सुटका करण्यात आली. घरमालकांनी तिचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, मनीष खट्टर व कमलजित कौर या दाम्पत्याने पीडितेला निर्दयीपणे मारहाण केली. ती घरात व्यवस्थित काम करीत नाही म्हणून मारहाण केली, असे त्यांनी सांगितले. पीडितेच्या चेहरा आणि शरीरावर कापल्याच्या आणि चटका दिल्याच्या अनेक जखमा दिसल्या.

हे वाचा >> घरकामासाठी आणलेल्या मुलीला अमानुष मारहाण; उच्चशिक्षित दाम्पत्याला अटक

पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीच्या चेहऱ्यावर, दंड, हात व पायावर ठिकठिकाणी जखमा होत्या. झारखंडवरून कामासाठी आलेल्या या पीडित मुलीला या दाम्पत्याने पाच महिन्यांपासून वेतनही दिले नव्हते, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली. या प्रकरणाचा तपास करीत असताना घरकामासाठी अल्पवयीन बालकामगार पुरविणाऱ्या एजन्सीवरही पोलिसांनी धाड टाकली आणि त्याच्या मालकाला अटक केली.

मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात अनिता नावाच्या २० वर्षीय मोलकरणीने तिची घरमालक शेफाली कौल यांच्यावर मारहाणीचा आरोप केला. नोएडातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या क्लेओ काऊंटी सोसायटीमध्ये कौल राहतात. पोलिसांनी सांगितले की, कौल या व्यवसायाने वकील आहेत. अनिताला त्या नियमित मारहाण करीत होत्या आणि जेव्हा अनिताने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला बळजबरीने परत आणण्यात आले. मोलकरणीच्या अंगावर जखमा आणि ओरखड्याचे व्रण दिसून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या बातमीनुसार कौल यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले.

२०२१ साली, बंगळुरूमधील महादेवपुरा येथील एका दाम्पत्याला अल्पवयीन मोलकरणीसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. १५ वर्षीय अल्पवयीन पीडितेने ‘बंगळुरू मिरर’शी बोलताना सांगितले की, तिने सदर दाम्पत्याच्या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी तिला मोठ्या चमच्याने अंगावर चटके दिले.

पूर्व दिल्लीमधील कैलाश परिसरात २०१८ साली सोनी कुमारी या १५ वर्षी मोलकरणीची हत्या करण्यात आली होती. ‘द वायर’ने दिलेल्या माहितीनुसार, सोनीने तिचा पगार मागितल्यामुळे तिची हत्या करण्यात आली. हत्येनंतरच्या चौकशीत आढळले की, पीडिता झारखंडमधून बेपत्ता झाली होती आणि ती दिल्लीत काम करते हे तिच्या घरच्यांनाही माहीत नव्हते.

भारतातील घरकाम करणाऱ्या कामगारांची स्थिती

भारतात घरगुती कामगारांची संख्या खूप मोठी आहे. विशेषतः शहरी भागात कामगारांची लाट आलेली पाहायला मिळते. अधिकृत आकडेवारीनुसार- भारतात अंदाजे ४७ लाख घरगुती कामगार असून, त्यापैकी ३० लाख महिला आहेत. तथापि, आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या अंदाजानुसार ही संख्या दोन ते नऊ कोटींदरम्यान असण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >> घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला सँडलने मारहाण, २५ वर्षीय अभिनेत्रीला अटक

दिल्ली मजूर संघटनेने २०१८ साली गोळा केलेल्या डेटानुसार- भारतात पाच कोटींहून अधिक घरगुती कामगार असून, त्यापैकी बहुसंख्य महिला कामगार आहेत, अशी माहिती ‘द वायर’ने समोर आणली होती. दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये अधिकतर महिला आणि मुली काम करतात. या महिला किंवा मुली झारखंड, बिहार, बंगाल व ओडिशा या राज्यांतून स्थलांतरीत झालेल्या असतात. ‘द हिंदू’ने मध्यंतरी दिलेल्या बातमीनुसार अनेक अल्पवयीन मुलींना गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडण्यास भाग पाडले जाते आणि शहरांमध्ये काम करण्याची बळजबरी करण्यात येते. या बातमीत पुढे म्हटले की, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसणे आणि साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक छोट्या जाती आणि आदिवासी जमातींमधील महिला जीवन जगण्याचा मार्ग म्हणून घरगुती कामगार होण्याचा मार्ग निवडतात.

२०१६ साली घरगुती कामगारांच्या परिस्थितीची तपशीलवार माहिती देणारा एक अहवाल समोर आला होता. त्यानुसार बंगळुरूमध्ये घरकाम करणाऱ्या एकूण कामगारांपैकी ७५ टक्के कामगार अनुसूचित जातींमधील होते; तर १५ टक्के ओबीसी आणि आठ टक्के लोक अनुसूचित जमातींमधील होते, अशी माहिती ‘द हिंदू’ने प्रकाशित केली होती.

काही वर्षांपासून घरकाम करणाऱ्या कामगारांची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतात घरगुती कामगारांची नोकरभरती करणाऱ्या खासगी एजन्सी सुरू झाल्या. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार, या खासगी एजन्सीजनीन स्वतःला या क्षेत्रात औपचारिकता आणणारे आणि अर्थव्यवस्था चालना देणारे असल्याचे सांगितले असले तरी त्यांची कार्यपद्धती ही अनौपचारिक स्वरूपाची आहे. अनेक एजन्सी त्यांनी नियुक्त केलेल्या महिलांना आर्थिक किंवा इतर मदत देण्यात अपयशी ठरतात किंवा तशी मदत देण्यास टाळाटाळ करतात.

हे वाचा >> घरकाम करणार्‍या महिलेचा मुलगा बनला डॉक्टर ; प्रतिकुल परिस्थित पूर्ण केले शिक्षण

घरगुती कामगारांची दुर्दशा

‘द वायर’ने २०१८ साली घरगुती कामगारांची दशा जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी वार्तालाप केला होता. त्यावेळी कामगारांनी सांगितले की, त्यांचे मालक त्यांच्यासोबत भेदभावाची वागणूक करतात. तसेच घरमालकांकडून त्यांच्याशी अनेकदा गैरवर्तणूक केली जाते. बहुतेकांनी त्यांना अतिशय तुटपुंजा पगार मिळत असल्याची तक्रार केली होती; तर काहींचा पगार अनेक महिन्यांपासून थकवण्यात आला होता. काहींनी सांगितले की, एकाच पगारात त्यांना वर्षानुवर्षे काम करावे लागत आहे. रुबी नावाच्या एका मुस्लिम कामगार महिलेने ‘द वायर’शी बोलताना सांगितले की, घरमालक एक कप चहा पाजतात आणि त्या बदल्यात आणखी १० कामे करून घेतात.

एका ४० वर्षीय महिलेने सांगितले की, आम्ही जेव्हा पगारवाढीची मागणी करतो तेव्हा ते आमच्यावर डाफरतात. “कधी कधी ते आम्हाला घरातील वस्तू देतात आणि आम्हाला पैशांऐवजी दुसऱ्या काही वस्तू हव्यात का, अशी विचारणा करतात. कदाचित त्यांना वाटत असेल की, दर महिन्याला वाढीव पगार देण्यापेक्षा घरातीलच काही वस्तू देणे परवडू शकते.”

‘द हिंदू’ने दिलेल्या माहितीनुसार, घरगुती कामगार असंघटित क्षेत्रात मोडत असल्यामुळे त्यांना एक तर वेतन दिले जात नाही किंवा तुटपुंजे वेतन दिले जाते. देशभरात घरगुती कामगारांना किमान वेतन देण्याच्या नियमाची अंमलबजावणी होत नाही. अनेक कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी शौचालय वापरण्याची परवानगी दिली जात नाही किंवा ती सुविधा उपलब्ध करून दिली गेली तरी ती अतिशय अस्वच्छ असते. ‘द वायर’ने दिलेल्या माहितीनुसार- अनेक घरमालक त्यांच्या मदतनीसांना घरातील शौचालय वापरण्याची परवानगी देत नाहीत.

अनेकदा घरकामगारांना सुट्टी मागताना मालकांशी वाद घालावा लागतो. मूळची बिहारची असलेली आशा दिल्लीत घरकाम करते. २०१८ साली ‘द वायर’शी बोलताना तिने सांगितले, “कधी कधी नातेवाईक भेटायला येतात. कधी आमचे मूल आजारी पडते. त्यासाठी जेव्हा आम्ही सुट्टी मागतो, तेव्हा मॅडम ओरडतात. जर आम्ही सुट्टी घेतली, तर आम्हाला कामावरून काढून टाकू, अशी धमकी देतात. जर आमचे काम बंद झाले, तर मग आम्ही जगायचे कसे? कुटुंब कसे चालवायचे?

आणखी वाचा >> नालासोपारा येथे घरकाम करणाऱ्या एका महिलेवर सामुहिक बलात्कार

कधी कधी घरगुती कामगारांना लैंगिक अत्याचार आणि छळणुकीलाही बळी पडावे लागते. २०२१ साली, जवळपास तीन हजार घरगुती कामगार महिलांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना पत्र पाठवून कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी, अशी मागणी केली.

भारतात घरगुती कामगारांना वाईट वागणूक का दिली जाते?

दिल्ली घरेलू कामगार संघटनेच्या कार्यकर्त्या बबी कुमारी या घरगुती कामगारांच्या हक्कांसाठी लढत आहेत. त्यांनी ‘द वायर’शी बोलताना सांगितले की, घरगुती कामगारांसोबत जातीय आणि वर्गीय भेदभाव केला जातो. “वर्गवाद किंवा उच्च-नीच हे आपल्या समाजातील एक कटू सत्य आहे. याचे उत्तर आर्थिक विषमतेत आहे. तुम्ही भारतातील वर्तमान परिस्थिती पाहिली, तर लक्षात येईल की, इथे बहुतेक ठिकाणी भांडवलशाही आहे. समाजातील एका वर्गाकडे सर्व संसाधने, आर्थिक सुबत्ता असून, ते दिवसेंदिवस समृद्ध होत आहेत; तर समाजातील दुसरा घटक या सर्वांपासून वंचित आहे. या सर्व परिस्थितीला फक्त आर्थिक धोरणेच जबाबदार नाहीत; तर भांडवलशाही व्यवस्थादेखील तेवढीच कारणीभूत आहे.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा गुरुग्राममधील प्रकरण समोर आले होते. त्यानंतर दिल्ली येथे हेल्पर फॉर यू ही ऑनलाईन सुविधा पुरविणाऱ्या मीनाक्षी गुप्ता जैन यांनी ‘बीबीसी’ला प्रतिक्रिया देताना सांगितले की, घरगुती कामगारांशी कोणताही कायदेशीर करार केला जात नाही किंवा त्यांना किमान हमी वेतनही दिले जात नाही. त्यामुळेच त्यांचे अधिक शोषण केले जाण्याची शक्यता असते. तसेच हे कामगार हजारो किलोमीटर लांबून आपले गाव सोडून शहरात कामासाठी आलेले असतात. त्यामुळे त्यांना कुणाकडे मदतही मागता येत नाही.

या कामगारांची कुणी छळणूक केली तरी त्यांच्याकडे मदतीसाठी कुणीही फिरकत नाही. घरगुती कामगारांसाठी जोपर्यंत कठोर कायदा होत नाही, एजन्सी आणि मालकांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत अशा घटना घडत राहतील, असेही त्या म्हणाल्या.

भारतीय कायदे घरगुती कामगारांना संरक्षण देतात?

”द हिंदू”ने दिलेल्या बातमीनुसार, घरगुती कामगारांना संरक्षण देणारा समर्पित असा कायदा अस्तित्वात नाही. “कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक अत्याचार (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा २०१३” भारताने मंजूर केला आहे. या कायद्याने संघटित व असंघटित अशा दोन्ही क्षेत्रांतील महिला कामगारांना सुरक्षा मिळाली आहे. त्यात घरगुती कामगारांचाही समावेश होतो. २०२० साली स्क्रोल या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतात या कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होत नाही.

बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा १९८६ नुसार, १४ वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांनाच घरात कामाला ठेवण्याची परवानगी आहे. कारण- घर हे सर्वांत सुरक्षित मानले जाते. पण, ‘हेल्पर फॉर यू’च्या मीनाक्षी जैन म्हणाल्या की, घरगुती काम करणारी मुले तर सर्वाधिक असुरक्षित आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार- १४ वर्षांवरील मुले घरात काम करू शकतात. कारण- घरकाम करणे धोकादायक नाही. पण, घराचे दरवाजे जेव्हा बंद असतात, तेव्हा घर ही जगातील सर्वांत धोकादायक जागा असते.

जून २०१९ साली केंद्रीय कामगार मंत्रालयाने नोकरभरती करणाऱ्या एजन्सींचे नियमन करणे आणि उपलब्ध कायद्यानुसार घरगुती कामगारांना संरक्षण देणे, यासाठी एका सर्वंकष धोरणाचा मसुदा तयार केला. मात्र, ‘द हिंदू’ दैनिकाने सांगितल्यानुसार, घरगुती कामगारांना “किमान वेतन हमी, सामाजिक सुरक्षा, मारहाण व छळणुकीपासून संरक्षण, पेन्शन योजना, आरोग्य व मातृत्वाचे लाभ” द्यायचे असतील तर एका सर्वसमावेशक कायद्याची गरज आहे. तथापि कामगार मंत्रालयाने तयार केलेले धोरण अद्याप राबवण्यात आलेले नाही.

Story img Loader