गेल्या दोन आठवड्यांपासून बाजारात सर्व प्रकारच्या फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असून, किरकोळ बाजारात एक किलो भाज्यांचे दर शंभरीपार झाले आहे. पालेभाज्याही कडाडल्या आहेत. या दरवाढीची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे.
पुणे-मुंबईत भाज्यांची आवक कोठून होते?
पुणे-मुंबईतील घाऊक बाजारात भाज्यांची आवक पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नगर जिल्ह्यांतून होते. मुंबईतील वाशी बाजारात पुणे जिल्ह्यातील मंचर, जुन्नर, खेड, तसेच नाशिक भागातून आवक होते. भाज्या, पालेभाज्या, फळांना या दोन शहरांतून मोठी मागणी असते. कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांतून शेवगा, पावटा, घेवडा, हिरवी मिरची, लसणाची आवक होते. बटाट्याची आवक उत्तरेकडील राज्यांतून होते. राज्यातील अन्य भागांच्या तुलनेत पुणे-मुंबईतील बाजारात शेतमालाला चांगला दर मिळतो. त्यामुळे शेतकरी या दोन बाजारांत शेतमाल विक्रीस पाठवितात.
तापामानवाढीचा, पूर्वमोसमी पावसाचा परिणाम?
कडक ऊन, तसेच पूर्वमोसमी पावसामुळे फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले. मुसळधार पाऊस झाल्याने लागवड, तसेच प्रतवारीवर परिणाम होतो. मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. पालेभाज्यांचा गेल्या १५ दिवसांपासून बाजारात तुटवडा जाणवत असून, कडक ऊन आणि पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे.
भाज्यांच्या दरवाढीमागची कारणे काय?
हवामानातील बदलांवर कृषी व्यवसाय अवलंबून आहे. फळभाज्या, फळे, पालेभाज्या लागवडीस पोषक वातावरण आवश्यक असते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने लागवड म्हणजे नशिबाचा खेळ असतो. लागवड पूर्णपणे हवामानावर अवलंबून असते. लहरी हवामानाचा फटका लागवडीला बसतो. मध्यंतरी राज्याच्या सर्व विभागांत झालेल्या पूर्वमोसमी पावसाचा फटका फळभाज्यांसह पालेभाज्यांना बसला. मुसळधार पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले, तसेच प्रतवारीवर परिणाम झाला. त्यामुळे शेतात भाज्या खराब झाल्या आणि बाजारात आवक कमी झाल्याने दरवाढ झाली.
दरवाढीचा परिणाम काय?
दरवाढीचा फायदा थेट शेतकऱ्यांना मिळत नाही. ज्या बाजारात चांगले दर मिळतात, तेथील बाजारात शेतकरी शेतमाल विक्रीस पाठवितात. अगदी नाशिक भागातील शेतकरी गुजरातमधील बाजारात भाज्या विक्रीस पाठवितात. दरवाढ झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होताे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना वाहतूक खर्च सोसावा लागतो. वाहतूक-लागवड खर्च, बाजार आवारातील कर (पट्टी), तोलाई, हमालीचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. अडते किंवा दलालांच्या गाळ्यांवर शेतमाल पाेहोचल्यानंतर बोली लावली जाते. लागवडीपासून बाजारात शेतमाल पोहोचविण्यापर्यंत शेतकऱ्यांना कष्ट घ्यावे लागतात. त्यातून शेतमालाला दर मिळाला नाही, तर तो फेकून द्यावा लागतो. टोमॅटोच्या बाबतीत दोन वर्षांपूर्वी हेच झाले होते. अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी शेतात टोमॅटो, ढोबळी मिरची फेकून दिले होते.
हेही वाचा – ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ २१ जून रोजीच का साजरा करतात? यंदा योग दिनाची ‘थीम’ काय आहे?
भाज्यांचा तुटवडा आणखी किती दिवस?
बहुतांश फळभाज्यांच्या दरांत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला. फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले. नवीन लागवडीस किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे फळभाज्यांचे दर तेजीत राहणार आहेत. गेल्या १५ दिवसांपासून पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर ५० ते ६० रुपयांपर्यंत आहे. मेथीच्या एका जुडीचे दर ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. बहुतांश पालेभाज्यांचे दर तेजीत असून, महिनाभर पालेभाज्यांचे दर तेजीत राहणार आहेत. दरवाढीमुळे गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडून पडणार आहे.
भाज्या महाग झाल्यानंतर मागणी कशाला?
भाज्या महाग झाल्यानंतर कल कडधान्य खरेदीकडे वाढतो. मूग, मटकी, मसूर, वाल अशा कडधान्यांना मागणी वाढली आहे. गेल्या हंगामात पावसाने ओढ दिल्याने सध्या बाजारात डाळींचा तुटवडा जाणवत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने सर्व प्रकारच्या डाळींच्या दरात किलोमागे दहा ते पंचवीस रुपयांनी वाढ झाली आहे.
rahul.khaladkar@expressindia.com