पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री अजित पवार रुसून बसल्याची चर्चा सुरू होती. आजारपणामुळे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीवारी करावी लागली. यानंतरच अजित पवार यांना मनाप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. याबरोबरच राष्ट्रवादीच्या नऊपैकी सात मंत्र्यांकडे विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली. तरीही छगन भुजबळ आणि आदिती तटकरे या दोन मंत्र्यांना नाशिक आणि रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे म्हणून अजित पवार गट आग्रही आहे. पालकमंत्रीपद हाती असल्यावर जिल्ह्यावर प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रण ठेवता येत असल्यानेच पालकमंत्रीपदासाठी सर्व मंत्र्यांचा आग्रह असतो. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालकमंत्री ही संकल्पना काय आहे? 

उपमुख्यमंत्रीपद जसे घटनात्मक पद नाही तसेच पालकमंत्रीपदाबाबतचे आहे. ही सरकारची प्रशासकीय सोय असते. सरकार आणि जिल्हा प्रशासनात दुवा म्हणून पालकमंत्री जबाबदारी पार पाडत असतात. जिल्ह्यातील एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली जाते. पण कधी-कधी बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांकडे ही जबाबदारी सोपविली जाते. पालकमंत्रीपद हे प्रशासकीय तसेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असते. 

हेही वाचा – विश्लेषण : केविन मॅकार्थींच्या हकालपट्टीचे नाट्य कसे रंगले? बायडेन प्रशासनाची पुन्हा आर्थिक कोंडी?

पालकमंत्रीपदाची निर्मिती केव्हा झाली? 

महाराष्ट्रात ‘पालकमंत्री’ असे संबोधले जाते. पण इतर बहुतेक राज्यांमध्ये ‘जिल्हा प्रभारी (डिस्ट्रिक इन-चार्ज) मंत्री’ असे म्हटले जाते. ७४व्या घटना दुरुस्तीनुसार जिल्हा नियोजनासाठी जिल्हा नियोजन समित्यांची निर्मिती करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीचे पालकमंत्री किंवा जिल्हा प्रभारीमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. यामुळे सर्वच राज्यांमध्ये पालकमंत्री किंवा जिल्हा प्रभारीमंत्री हे पद अस्तित्वात आले. आसाममध्ये दोन वर्षांपूर्वी पालकमंत्रीपदाची निर्मिती करण्यात आली. राज्यात वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्या-त्या जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्र्यांकडे जिल्ह्याची जबाबदारी सोपविली जात असे. या मंत्र्यांकडून जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क ठेवून त्यांची कामे मार्गी लावली जात असत. पालकमंत्री हा जिल्ह्यातीलच असावा अशीही काही तरतूद नाही. कोणाला पालकमंत्री नेमावे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. 

पालकमंत्र्यांची नक्की जबाबदारी काय असते?

सरकार आणि जिल्हा प्रशासन यात दुवा म्हणून पालकमंत्र्याने जबाबदारी पार पाडायची असते. सरकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यावर पालकमंत्री लक्ष ठेवतात. सरकारी योजनांचा जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते. सरकारी योजना राबविणे व त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांची असते. जिल्ह्यातील विविध विकास कामे पार पाडण्याकरिता जिल्हा नियोजन समिती असते व तिचे पदसिद्ध अध्यक्ष हे पालकमंत्री असतात. जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्याच्या विकासाकरिता नियोजन केले जाते. राज्याच्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्याच्या विकास कामांकरिता निधीची तरतूद केली जाते. या निधीचा वापर कसा करायचा, कोणती विकासकामे करायची, कोणत्या कामांसाठी निधीचे नियोजन करायचे हे जिल्हा नियोजन समितीकडून निश्चित केले जाते. नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी होत आहे का, यावरही पालकमंत्र्यांना लक्ष ठेवावे लागते. जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील सरकारी निधीवर पालकमंत्र्याचे वर्चस्व असते. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्यास पालकमंत्र्यांना स्वागताला उपस्थित राहावे लागते.

हेही वाचा – विश्लेषण : मुंबईलगतच्या भागातील आदिवासींसाठी विकासाची वाट बिकटच का ठरते?

पालकमंत्री जिल्ह्यांमध्ये किती प्रभावी असतात?

पालकमंत्र्यांच्या हाती जिल्ह्याची सारी सूत्रे असतात. यामुळे जिल्ह्यात तो सर्वार्थाने प्रभावी असतो. सर्व शासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा पालकमंत्र्यांच्या आदेशाने किंवा इशाऱ्यावर काम करीत असते. जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते. निधी वाटपाचे सारे अधिकार हाती असल्याने जिल्ह्यातील छोटी-मोठ्या कामांचे वाटप करताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा फायदा होईल याकडे पालकमंत्र्यांचा कटाक्ष असतो. विरोधी पक्षाचा आमदार असल्यास त्याच्या मतदारसंघातील कामे कशी रोखायची किंवा जास्त निधीच द्यायचा नाही हे सारे पालकमंत्र्याच्या हाती असते. विरोधकांचे खच्चीकरण करून सत्ताधारी पक्षाची जिल्ह्यात ताकद कशी वाढेल यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका अधिक महत्त्वाची असते. राजकीय महत्त्व ओळखूनच पालकमंत्रीपद सोपविले जाते. पुण्यात लोकसभेचे चार मतदारसंघ असल्याने भाजपच्या नेतृत्वाने अजित पवार यांची पुणे पालकमंत्रीपदाची इच्छा पूर्ण केली असावी.

पालकमंत्री मुख्यमंत्र्यांना डोईजड झाल्यास काय?

मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांमध्ये वितुष्ट आल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातील एक अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री तर नारायण राणे महसूलमंत्री असताना उभयतांमध्ये वाद झाला होता. तेव्हा विलासराव देशमुख यांनी राणे यांच्या मर्जीतील जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली होती. काही प्रकरणांमध्ये पालकमंत्री बदलण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. पालकमंत्र्यांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळेच शेजारील कर्नाटकात कुमारस्वामी काँग्रेस आघाडीचे सरकार कोसळले होते.

santosh.pradhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are guardian ministers so effective why the political fight for their appointments print exp ssb
Show comments