भारतात आपण प्राचीन संस्कृती व संलग्न वास्तूंविषयी मोठ्या अभिमानाने व्यक्त होतो. इसवी सनपूर्व काळापासून भारतातील विविध राजघराण्यांनी भारतीय संस्कृती वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचवल्याचे ऐतिहासिक तसेच पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध आहेत. भारतीय संस्कृतीने त्या देशांनांही समृद्धी बहाल करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. श्रीलंका हा देश याच संस्कृतीच्या माध्यमातून भारताशी जोडला गेला. भारत आणि श्रीलंका हे सांस्कृतिक नाळेद्वारे जोडले गेलेले देश आहेत. इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने भारतीय संस्कृती इतर आशियाई देशात पोहोचवली, सम्राट अशोकाची भूमिका मोलाची ठरली. अशोकाने कलिंगायुद्धानंतर बौद्ध तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला. याच काळात भारतीय व्यापारीवर्ग हा देखील मोठ्या प्रमाणात या तत्त्वज्ञानाचे अनुसरण करत होता. हे व्यापारी समुद्रमार्गे व्यापाराच्या निमित्ताने इतर देशात स्थायिक झाले होते. याच काळात राजश्रयाच्या छत्रछायेखाली बौद्ध तत्त्वज्ञान भारतातून इतर देशांत पोहोचले.सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी श्रीलंकेत पाठविल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत. एकूणच गेल्या अडीच हजार वर्षांपासून बौद्ध तत्त्वज्ञानाने श्रीलंकेला सांस्कृतिक पार्श्वभूमी प्रदान करण्याचे काम केले. इतकेच नव्हे तर दक्षिण भारतीय अनेक राजवंशानी श्रीलंकेवर राज्य केले होते. या राज्यकाळात दक्षिण भारतीय-द्राविडी स्थापत्यशैलीत मंदिरे घडविली गेली. याच काळात तमीळवंशीय मोठ्या प्रमाणात श्रीलंकेत स्थायिक झाले असावेत, असे अभ्यासक सांगतात. असे असतानाही श्रीलंकेतील तमीळवंशीय जनता आजही आपल्या अधिकारांसाठी झगडताना दिसते. हा झगडा दीर्घकालीन असला तरी गेल्याच महिन्यात प्रकाशित झालेल्या बातम्यांनी केवळ भारतातीलच नाही तर जगातील अनेक इतिहासप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. श्रीलंकेच्या भूमीवर एक हजार वर्षांपेक्षा अधिक जुना इतिहास असलेल्या हिंदू मंदिरांचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे चित्र आता समोर येत आहे. त्यामुळेच जगभरातील अनेक इतिहासप्रेमी, कला-स्थापत्य अभ्यासक यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु भारतात मात्र अद्याप याची प्रतिक्रिया फारशी उमटलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीलंकेत नेमके काय घडत आहे?

सिंहली हे श्रीलंकेतील मूळ रहिवासी मानले जातात. सिंहली विरुद्ध तमीळ असा संघर्ष अनेक दशकांचा किंबहुना शतकांचा असला तरी या संघर्षातील एक वेगळी बाजू जगासमोर येताना दिसते आहे. २४ एप्रिल रोजी ‘द हिंदू’ तसेच आंतराष्ट्रीय स्तरावरील विविध वर्तमानपत्रांनी दिलेल्या बातमीनुसार उत्तर श्रीलंकेतील तमीळवंशीय नागरिक आपल्या धार्मिक अधिकारांसाठी रस्त्यावर उतरून लढा देत आहेत. सिंहलीकरणाच्या मुद्यावरून स्थानिक हिंदू मंदिरे उध्वस्त करण्याचा श्रीलंका सरकारचा डाव असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तमीळ प्रसारमाध्यमांनी श्रीलंकेतील हिंदू मंदिरांच्या तोडफोडीच्या अनेक घटना नोंदविल्या आहेत. केवळ इतकेच नाही तर काही मंदिरांतून हिंदू देवी- देवतांच्या मूर्ती हलविण्यात आल्याचे व जुन्या मंदिरांचे बौद्ध प्रार्थनास्थळांत रूपांतर केल्याच्या आरोपांचाही यात समावेश आहे. प्रामुख्याने स्थानिक तमिळ संघटनांकडून हे आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय जुन्या मंदिरांच्या जागेवर व सभोवतालच्या परिसरात बौद्ध मंदिरांच्या संख्येत जाणीवपूर्वक वाढ केली जात आहे. उत्तर श्रीलंकेतील जाफना शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी हिंदू देवतेची प्रतिमा ठेवून स्थानिक तमीळवंशियांकडून सरकारचा निषेधही करण्यात आला. या आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याने लोकांमध्ये असंतोषाची भावना आहे.

आणखी वाचा : विश्लेषण: स्टारबक्स- ‘इट स्टार्ट्स विथ युवर नेम’; नेमका वाद आहे तरी काय?

श्रीलंकेच्या पुरातत्त्व विभागाची भूमिका

श्रीलंकेत असलेल्या हिंदू मंदिरांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. पांड्य, चोल, पल्लव या प्राचीन भारतीय राजवंशाचे या मंदिरांच्या स्थापत्यशैलीत महत्त्वाचे योगदान आहे. अनेक मंदिरे ही श्रीलंकेच्या उत्तरेस आहेत. बहुतांश मंदिरे ही श्रीलंकेच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येतात. ऐतिहासिक स्थळांमध्ये सुरू असलेल्या ‘पुरातत्त्व संशोधनाचा’ हवाला देऊन प्राधिकरणांनी काही मंदिरांमध्ये सार्वजनिक प्रवेश प्रतिबंधित केला आहे. वावुनिया येथील वेदुकुनारीमलाई येथील मंदिरात पूजा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली होती. या मंदिरातील मूर्तींची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ या परिसरात मोठे आंदोलनदेखील करण्यात आले होते. श्रीलंकेच्या पुरातत्त्व विभागाकडून करण्यात येणाऱ्या या प्रतिबंधाचा संबंध सिंहलीकरणाच्या प्रक्रियेशी जोडला जात आहे.

सिंहलीकरण म्हणजे नेमके काय?

सिंहलीकरण ही वांशिक ओळख दर्शविणारी संज्ञा आहे. या संज्ञेचे मूळ सिंहली भाषेत आहेत. सिंहली भाषा व संस्कृती यांचे जे अनुसरण करतात त्यांना सिंहली असे म्हणतात. जे मूळ सिंहली वंशाचे नाहीत परंतु सिंहली भाषा, धर्म, राहणीमान या सर्व माध्यमांतून त्यांना सिंहली संस्कृतीचे आचरण करण्यास लावणे म्हणजे सिंहलीकरण होय. बहुसंख्य सिंहली बौद्धधर्मीय आहेत. या सिंहलीकरण प्रक्रियेचा श्रीलंकेतील तमीळ वंशीय लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रयोग करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. लोकसंख्येचा विचार करता, उत्तर श्रीलंकेमध्ये सगळ्यात जास्त हिंदू तमीळ आहेत. त्या खालोखाल ख्रिश्चन व मुस्लिमांचा क्रमांक लागतो. चौथ्या क्रमांकावर सिंहली बौद्धधर्मीय आहेत. श्रीलंका हा अधिकृत बौद्धधर्मीय देश आहे. या देशात ७० टक्क्यांपेक्षा अधिक जनता बौद्धधर्मीय आहे. तर हिंदू १२ टक्के आहेत आणि उर्वरित मुस्लिम व ख्रिश्चन आहेत. याच पार्श्वभूमीवर इतर धर्मियांचे सिंहलीकरण करण्याचा प्रयत्न श्रीलंकेत होत असल्याचा आरोप श्रीलंका सरकारवरही होत आहे.

श्रीलंकेच्या सरकारवरील आरोप

जाफना शहराचे आमदार आणि तमिळ नॅशनल पीपल्स फ्रंटचे नेते गजेंद्रकुमार पोनम्बलम यांनी, “या घटना म्हणजे तमिळींच्या धार्मिक हक्कांवर घाला घालण्याचा प्रकार आहे,” असे म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत श्रीलंकेतील गृहयुद्धाच्या समाप्तीनंतर विद्यमान सरकारने उत्तर आणि पूर्वेकडील ‘सिंहलीकरणाला गती’ दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कुरुन्थुरमलाई, मुल्लैतिवू येथील अय्यानार मंदिर परिसरात अशाच स्वरूपाचे चित्र दिसते. या मंदिर परिसरात कुठल्याही धार्मिक संस्था/मठ यांना काहीही करण्यास न्यायालयाकडून बंदी असताना लष्कर व पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत या ठिकाणी बौद्ध मूर्ती बसविण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळीही स्थानिक तमिळींकडून आंदोलन करण्यात आले होते.

आणखी वाचा : विश्लेषण : भारतीय संस्कृतीतील मातृसत्ताक कुटुंबपद्धती !

श्रीलंकेच्या गृहयुद्धाच्या काळात भारताकडून मोठ्या प्रमाणात श्रीलंकेला मदत पुरविण्यात आली होती. त्यामुळे भारत व श्रीलंका यांच्यातील संबंध सुधारण्याच्या वाटेवर आहेत, असेच चित्र समोर आले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असून विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे तसेच विरोधी पक्षनेते सजीथ प्रेमदासा सिंहलीकरणाचा जोरदार प्रयत्न करत असल्याचा तमीळ संघटनांचा आरोप आहे. २०१८ सालच्या जाहीरनाम्यात उत्तर-पूर्व श्रीलंकेत १००० बौद्ध विहार बांधण्याचा दावा विक्रमसिंघे यांनी केला होता. म्हणूनच श्रीलंका सरकार आता ‘तमिळ ओळख पुसून टाकण्याच्या प्रयत्न’ जाणीवपूर्वक करत असल्याचा तमीळ संघटनांचा आरोप आहे. श्रीलंकेतील काही हिंदू मंदिर प्रशासकांनी या मुद्द्यावर भारतीय उच्चायुक्तांकडे संपर्क साधला आहे. तसेच काही श्रीलंकन ​​तमीळ गटांनी भारतीय जनता पार्टीसह भारतातील हिंदू संघटनांनी यात हस्तक्षेप करून हिंदू मंदिरांवर आलेले गंडातर टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे.

हा वाद हिंदू विरुद्ध बौद्ध असा आहे का?

हा वाद सकृतदर्शनी हिंदू विरुद्ध बौद्ध असा दिसत असला, तरी या वादाला अनेक पदर आहेत. मूलतः हा वाद वांशिक आहे. बौद्ध किंवा हिंदू यांचे जन्मस्थान भारतच आहे. परंतु श्रीलंकेतील वादाच्या मागे तमीळ विरुद्ध सिंहली या संघर्षाची पार्श्वभूमी आहे. त्याच पार्श्वभूमीवर तिथल्या स्थानिक तमिळींच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणून राजकीय पोळी भाजली जात असल्याचा आरोप होत आहे. केवळ इतकेच नाही तर तमीळ हिंदूंचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित सांस्कृतिक पुरावे नष्ट करण्यावर भर दिला जात आहे, असे या आरोपांचे स्वरूप आहे. परंतु, हे सांस्कृतिक पुरावे नष्ट करत असताना एका बाजूला ते स्वतःचा ऐतिहासिक ठेवा नष्ट करत असल्याचा विसर मात्र त्यांना पडलेला दिसतो आहे. एखादी प्राचीन वास्तू ही केवळ त्या देशाची नसते तर तो समस्त मानवजातीचा वारसा असतो, हे युनेस्कोच्या पारंपरिक वारसा सनदेमध्ये नमूद केले आहे. एकंदरच, काही हजार वर्षांचा वारसा असणाऱ्या वास्तू नामशेष होत असतील तर सध्या श्रीलंकेत सुरू असलेला हा प्रकार हे दुर्दैवच म्हणावे लागेल!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are hindu temples being destroyed in srilanka why sinhalese vs tamil hindu conflict is simmering svs