पर्यटनासाठी दुबई भारतीयांचे पसंतीचे ठिकाण आहे. दरवर्षी लाखो पर्यटक दुबईला भेट देतात. २०२३ मध्ये भारतातील सहा दशलक्षांहून अधिक पर्यटकांनी दुबईला भेट दिली. परंतु, अलीकडील अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, दुबईत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय पर्यटकांचा व्हिसा मोठ्या प्रमाणात नाकारण्यात येत आहे. व्हिसा नाकारण्याचा आजवरचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. त्यामुळे पर्यटकांसह ट्रॅव्हल एजंटचेदेखील नुकसान होत आहे. व्हिसा नाकारण्याचे दर एक-दोन टक्क्यांवरून सुमारे पाच-सहा टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. पण यामागील नेमके कारण काय? व्हिसा नाकारण्याचे प्रमाण का वाढले? याचा भारतीयांवर काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले

दुबईच्या व्हिसा अर्जांपैकी जवळपास ९९ टक्के अर्ज एकदाच मंजूर झाले होते; परंतु यूएई अधिकारी आता अगदी परिपूर्ण अर्जही नाकारत आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने म्हटले आहे की, दररोजच्या प्रत्येक १०० अर्जांपैकी किमान पाच ते सहा अर्ज नाकारले जातात. “याआधी, दुबईचा व्हिसा नाकारण्याचे प्रमाण फक्त एक ते दोन टक्के होते. परंतु, हे नवीन नियम लागू होण्यापूर्वी होते. “आमचे दररोज सुमारे १०० अर्जांमधून किमान पाच ते सहा व्हिसा नाकारले जात आहेत. कन्फर्म फ्लाइट तिकीट आणि हॉटेलमधील मुक्कामाचे तपशील जोडलेले असतानाही, व्हिसा अर्ज नाकारले जात आहेत,” असे पासिओ ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक निखिल कुमार यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले.

हेही वाचा : भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार रद्द, कारण काय? याचा काय परिणाम होणार?

ज्या प्रवाशांनी त्यांच्या हॉटेल आणि एअरलाइन आरक्षणासाठी, तसेच त्यांच्या व्हिसाच्या खर्चासाठी आधीच पैसे दिले आहेत. त्यांचे नवीन नियमांमुळे आर्थिक नुकसान होत आहे. अहवालानुसार, विहार ट्रॅव्हल्सचे संचालक ऋषिकेश पुजारी म्हणाले, “दुबई मोठ्या प्रमाणात व्हिसा नाकारत आहे. यापूर्वी जवळपास ९९ टक्के दुबई व्हिसा अर्ज मंजूर करण्यात आले होते. आता अगदी चांगल्या अर्जासाठीही नकार मिळत आहे.” त्यांनी असा दावा केला की, अगदी काळजीपूर्वक तयार केलेला अर्ज, सत्यापित हॉटेल आरक्षणे आणि एअरलाइन माहिती यांसारखी सर्व कागदपत्रे असतानाही अर्ज नाकारला जात आहे. “माझ्याकडे चार जणांचे कुटुंब होते, ज्यांनी त्यांचा अर्ज काळजीपूर्वक भरला होता. असे असूनही त्यांचा व्हिसा अर्ज नाकारण्यात आला,” असे ते म्हणाले.

दररोजच्या प्रत्येक १०० अर्जांपैकी किमान पाच ते सहा अर्ज नाकारले जातात. (छायाचित्र-रॉयटर्स)

हसमुख ट्रॅव्हल्सचे संचालक विजय ठक्कर यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, दुबईमध्ये कुटुंबासोबत राहण्याचा विचार असलेल्या दोन प्रवाशांचे दुबई व्हिसासाठी अर्ज नुकतेच नाकारण्यात आले. “व्हिसासाठी अर्ज करताना, आम्ही नवीन व्हिसाच्या आवश्यकतेनुसार सर्व संबंधित कागदपत्रे जोडली होती. तरीही त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे लक्षणीय आर्थिक नुकसान झाले. कारण- त्यांनी व्हिसा शुल्कावर सुमारे १४,००० रुपये खर्च केले होते आणि तिकीट रद्द करण्यासाठी आणखी २०,००० रुपये अधिक खर्च आला होता,” असे त्यांनी सांगितले. पुण्यातील ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे प्रमुख नीलेश भन्साळी यांनी सांगितले की, अनेक लोक बनावट विमान तिकीट किंवा इतर कागदपत्रे जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुबईने नियम अत्यंत कडक केले आहेत. प्रवाशांना माझा सल्ला आहे की, कोणतीही खोटी तिकिटे किंवा खोटी हॉटेल बुकिंग टाळा.

नवीन व्हिसा नियम

यूएईने गेल्या महिन्यात दुबईतील पर्यटक व्हिसा अर्जांसाठी कठोर निकष लागू केले; ज्यामुळे व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. नवीन नियमांनुसार व्हिसासाठी अर्ज करताना, प्रवाशांनी त्यांच्या परतीच्या तिकिटांची प्रत इमिग्रेशन विभागाच्या वेबसाइटवर अपलोड करणे आवश्यक आहे. यापूर्वी विमानतळ अधिकाऱ्यांना या कागदपत्रांची मागणी करावी लागत होती. तसेच, प्रवाशांनी हॉटेल आरक्षणाचा पुरावा किंवा दुबईमधील त्यांच्या इच्छित निवासस्थानाचे इतर पुरावे सादर करणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर राहण्याची योजना असलेल्या पर्यटकांनी त्यांच्या निवासी व्हिसाची प्रत, त्यांचा अमिराती आयडी, त्यांच्या होस्टकडील भाडेकरार आणि त्यांची संपर्क माहिती सादर करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, पर्यटकांनी हे दाखवणेदेखील आवश्यक आहे की, त्यांच्याकडे शहरात राहण्यासाठी पुरेसा निधी आहे. त्यामध्ये बँक स्टेटमेंट किंवा प्रायोजकत्व पत्र समाविष्ट आहे. दोन महिन्यांच्या व्हिसासाठी अर्जदारांकडे त्यांच्या क्रेडिट किंवा डेबिट खात्यांमध्ये किमान १.१४ लाख रुपये असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : ४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?

पर्यटक व्हिसा अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी ऑनलाइन आणि मान्यताप्राप्त ट्रॅव्हल फर्म दोन्ही पर्याय आहेत. तरीही व्यापार व्यवसाय, व्यक्ती किंवा कुटुंबे अद्याप व्हिसासाठी अर्ज करू शकतात; परंतु दोन्ही व्हिसा श्रेणींमध्ये समान कागदपत्रे लागतात. ही धोरण सुधारणा लोकप्रिय दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या अगदी आधी आली आहे. या महोत्सवादारम्यान हॉटेलच्या खोल्या अगदी प्रीमियम दरांवर ऑफर केल्या जातात. हा महोत्सव ८ डिसेंबरपासून सुरू झाला असून, १४ जानेवारी २०२५ ला संपणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are indian tourists struggling to get dubai visa rac