गुजरातमध्ये तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्यानंतर सशस्त्र दलाच्या ताफ्यातील सर्व ३३० अत्याधुनिक हलक्या (एएलएच) ध्रुव हेलिकॉप्टर्सची उड्डाणे तांत्रिक पडताळणीसाठी तात्पुरती थांबविण्यात आली आहेत. या अपघातात दोन वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाला. स्वदेशी बनावटीच्या ध्रुवच्या अपघातांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
अपघातांची मालिका
५ जानेवारी रोजी नियमित सरावादरम्यान तटरक्षक दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर पोरबंदर तळावर उतरत असताना अपघातग्रस्त झाले. काही महिन्यांपूर्वी पोरबंदर किनाऱ्यावर ध्रुव हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी कोची येथे मार्च २०२३ मध्ये तटरक्षक दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर उड्डाण करताच कोसळले होते. स्वदेशी बनावटीच्या ध्रुवचा तीनही सैन्यदलांकडून वापर होतो. बहुउद्देशीय परदेशी हेलिकॉप्टरला कमी किमतीचा पर्याय म्हणून त्याकडे पाहिले जाते. विविध आवृत्तींतील ध्रुव हेलिकॉप्टरचे मागील पाच वर्षांत १५ अपघात झाले. या दुर्घटनांमुळे अनेकदा संपूर्ण ताफा जमिनीवर रोखून धरण्याची वेळ येते. यावेळी ध्रुवचे उड्डाण थांबविल्याने प्रजासत्ताक दिनाच्या हवाई मानवंदना सरावात अडसर निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>>Who is Nikhil Kamath : पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच्या पहिल्या पॉडकास्टमुळे चर्चेत आलेले निखिल कामथ कोण आहेत?
चौकशी आणि उपाययोजना कोणत्या?
ध्रुव हेलिकॉप्टर विकसित करणारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि तटरक्षक दल या अपघाताची स्वतंत्रपणे चौकशी करतील. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’ (एफडीआर) आणि ‘कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर’ (सीव्हीआर) विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. याआधीच्या दुर्घटनांमध्ये तांत्रिक बिघाड, मानवी चुका, टर्बाइन ब्लेडमध्ये समस्या अशी कारणे उघड झाली होती. उड्डाण नियंत्रण प्रणालीच्या गिअर पेटीतील नियंत्रक पट्टीद्वारे वैमानिक हेलिकॉप्टरच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो. ध्रुवमधील ही नियंत्रक पट्टी ॲल्युमिनियमची होती. तिची झीज होऊन अपघात होऊ शकतात असे हे लक्षात आल्यावर एचएएलने ॲल्युमिनियमची पट्टी बदलवून अधिक मजबूत धातूची नियंत्रक पट्टी बसविली. ध्रुवच्या नव्या आवृत्तीत आवश्यकतेनुसार सुधारणा केल्या. गतवर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या अपघातानंतर स्वतंत्र तज्ज्ञ समितीने ध्रुवच्या समस्यांवर सादर केलेल्या शिफारसी आता लागू केल्या जात आहेत.
ध्रुवचा प्रवास
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने सुमारे दोन दशकात ४०० ध्रुव हेलिकॉप्टर तयार केली. ५.५ टन वजनी गटातील दोन इंजिन असणारे हे बहुउद्देशीय प्रगत हेलिकॉप्टर आहेत. जेव्हा भारतीय सैन्याने त्यांना ताफ्यात समाविष्ट करण्यास सुरुवात केली, तेव्हा स्वदेशी लष्करी हेलिकॉप्टर क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात झाल्याची भावना उमटली होती. आधुनिक हलके ध्रुव काही देशात निर्यात झाले. परंतु, इक्वाडोरमध्ये त्याचे अपघात झाले. भारतीय लष्कराचा हवाई विभाग (आर्मी एव्हिएशन) ध्रुवचा सर्वाधिक वापर करतो. त्यांच्या ताफ्यात १८० च्या आसपास ध्रुव असून, त्यामध्ये काही हल्ला चढविण्याची क्षमता राखणाऱ्या ‘रुद्र’ प्रकाराचाही समावेश आहे. हवाई दलाकडे ७५, नौदल २४ आणि तटरक्षक दलाकडे १९ ध्रुव होते. गतवर्षी लष्करासाठी नव्याने २५ एएलएच ध्रुव मार्क – ३ आणि तटरक्षक दलासाठी नऊ व पुन्हा सहा अशा एकूण १५ हेलिकॉप्टर खरेदीचा करार करण्यात आला.
हेही वाचा >>>डासांच्या निर्मूलनासाठी विषारी वीर्याचा वापर; त्यामुळे जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी कसा होणार?
उड्डाण तास, अपघातांचे प्रमाण कसे?
साधारणत: २००२ पासून ध्रुवचा वापर सुरू झाला. एएलएचने एकत्रितपणे सुमारे चार लाख उड्डाण तास नोंदवले, ज्यामध्ये प्रति एक लाख तास उड्डाण करताना अपघातांची संख्या आंतरराष्ट्रीय मानकापेक्षा कमी असल्याकडे लक्ष वेधले जाते. ध्रुव अपघाताच्या चौकशी समितीमध्ये तज्ज्ञांचा समावेश करण्याचा वैमानिकांचा आग्रह आहे. ध्रुवची रचना व उत्पादनातील दोष, गुणवत्ता नियंत्रण, देखभाल-दुरुस्ती, वैमानिक व तंत्रज्ञांचे प्रशिक्षण यांच्याबद्दल सखोल विश्लेषण केले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.
प्रतिमा संवर्धनासाठी एचएएलची करामत
तांत्रिक बिघाडाची पूर्वकल्पना असतानाही काही वर्षांपूर्वी एचएएलने आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पाच ध्रुव हेलिकॉप्टर्स थेट मलेशिया व थायलंडला नेली होती. प्रत्यक्षात ती प्रदर्शनात सहभागी न होताच माघारी बोलविण्याची नामुष्की ओढवली. तांत्रिक दोषांची तपासणी सुरू असताना या हेलिकॉप्टरची वाहतूक करण्याच्या कृतीवरून महालेखाकारांनी एचएएलला फटकारले. यावर पाच कोटींचा नाहक खर्च केल्याचा ठपका ठेवला होता. तेव्हा एचएएल व्यवस्थापनाने ध्रुवच्या सकारात्मक प्रसिद्धीसाठी ही कृती केल्याचा बचाव केला. त्यावेळी लष्कराकडील सर्व ध्रुव उड्डाणे स्थगित केल्याने त्यांच्याविषयी नकारात्मक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे ध्रुवचे प्रतिमा संवर्धन करून विश्वास निर्माण होण्यासाठी ही हेलिकॉप्टर्स आंतरराष्ट्रीय एअर शोसाठी नेल्याचे स्पष्टीकरण दिले गेले होते.