पोलिस प्रशिक्षण आता केवळ स्वसंरक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, निदान जपानमध्ये तरी नाही. जपानमध्ये पोलिसांना चक्क मेकअपचे प्रशिक्षण दिले जात आहे. पोलिसांना मेकअप कसा करायचा, भुवया ट्रिम कशा करायच्या आणि त्वचेची काळजी कशी घ्यायची हे शिकविले जात आहे. अनेकांना हा विचित्र प्रकार वाटत असला, तरी अधिकाऱ्यांसाठी कठोर राहण्याबरोबरच आकर्षक दिसणेदेखील आवश्यक असल्याचे तेथील अधिकाऱ्यांचे सांगणे आहे. सोशल मीडियावर काहींना ते मजेदार वाटत आहे, तर काहींना अर्थपूर्ण वाटत आहे. परंतु, अनपेक्षित प्रशिक्षणामागे एक गंभीर कारण आहे. मेकअप प्रशिक्षणामागील नेमकी कारणे काय आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांना मेकअपचे प्रशिक्षण

जानेवारीमध्ये फुकुशिमा प्रीफेक्चरमधील फुकुशिमाकेन केसात्सुगाको पोलिस अकादमीने आपल्या प्रशिक्षणात मेकअप कोर्सचीही सुरुवात केली. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’नुसार, पदवीपर्यंतच्या अनेक पुरुष अधिकाऱ्यांसह ६० पोलिस कॅडेट्स या सत्रात सहभागी झाले होते. कॅडेट्सना मॉइश्चरायझिंग, प्राइमर्स लावणे आणि आयब्रो पेन्सिल वापरणे यांसारखी आवश्यक ग्रूमिंग कौशल्ये शिकवण्यात आली. व्यावसायिक दृष्टिकोन राखण्यासाठी, अकादमीने प्रसिद्ध जपानी कॉस्मेटिक्स ब्रँड शिसेइडोच्या सौंदर्य सल्लागारांची मदत घेतली, ज्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केशरचना आणि भुवया ट्रिमिंग करण्याचे प्रशिक्षण दिले. बऱ्याच पुरुष कॅडेट्ससाठी मेकअप वापरण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती आणि मेकअप करणे त्यांना सहजासहजी जमले नाही. काहींनी प्राइमर लावताना गडबड केली, तर अनेकांना ते लावण्याची पद्धत शिकण्यास वेळ लागला.

जपानमध्ये पोलिसांना चक्क मेकअपचे प्रशिक्षण दिले जात आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

एका कॅडेटने सांगितले, “मी यापूर्वी कधीही मेकअप केला नव्हता. माझा विश्वास आहे की पोलिस अधिकारी असणे म्हणजे अनेकदा लोकांच्या नजरेत असणे, त्यामुळे कामावर जाण्यापूर्वी मी स्वत:ला चांगल्या पद्धतीने सादर करावे, याची खात्री मला करून घ्यायची आहे.” या उपक्रमामुळे जपानी सोशल मीडियावर प्रतिक्रियांची लाट उसळली आहे. “आता ते संशयितांना पकडण्यासाठी त्यांच्या डोळ्यात पावडर टाकू शकतात!” असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे; तर दुसऱ्याने या उपक्रमाची खिल्ली उडवत म्हटले, “जेव्हा मी बातमी वाचली तेव्हा मला सुरुवातीला वाटले की त्यांना वाईट लोकांना पकडण्यासाठी स्वतःला सुंदर ठेवणे शिकवले जात आहे.” काहींना मात्र या निर्णयामागील तर्क दिसला. “हे मूर्खपणाचे वाटू शकते, परंतु पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही मेकअप कोर्स घेणे चांगली कल्पना नाही का?” असे एका वापरकर्त्याने म्हटले.’

पोलिसांना मेकअप का शिकवला जातोय?

पोलिस अकादमीचे उप-प्राचार्य ताकेशी सुग्युरा यांनी या प्रशिक्षणामागील कारण स्पष्ट केले. पोलिस अधिकारी नियमितपणे सर्व स्तरातील लोकांशी संवाद साधतात, त्यामुळे स्वच्छ आणि व्यावसायिक स्वरूप राखणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. लोकांवर सकारात्मक छाप पाडण्यासाठी आणि समुदायामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, अकादमीने ग्रूमिंग कोर्स सुरू केला असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. “आम्ही विद्यार्थ्यांना आठवण करून देऊ इच्छितो की, समाजाचे सदस्य आणि भविष्यातील पोलिस अधिकारी या नात्याने, चांगले आणि आकर्षक दिसणे महत्त्वाचे आहे,” असे सुग्युरा यांनी जपानी प्रसारक ‘निप्पॉन टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

पारंपरिकपणे जपानमधील पोलिस अकादमींनी कायदेशीर शिक्षण आणि शारीरिक प्रशिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, समाजाला सौजन्याने जोडण्याचा प्रयत्न म्हणून असे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्याकडे पाहिले जात आहे. हा दृष्टिकोन स्वीकारणारे फुकुशिमा हे एकमेव नाहीत. यामागुची येथील एका पोलिस अकादमीनेही असाच एक कार्यक्रम राबविला आहे, ज्याची सुरुवात मूलभूत गोष्टींपासून झाली आहे. पुरुष कॅडेट्सना योग्य स्किनकेअर आणि चेहऱ्याला कसे स्वच्छ करावे, हे तंत्र शिकवण्यात आले. २०२१ मध्ये, टोकियोमधील एका शाळेने मुलांसाठी विशेष ग्रूमिंग धडेदेखील सुरू केले.

सेसोकू येथील शिक्षक सदस्य टोरू कोजिमा यांनी या उपक्रमामागील शाळेची प्रेरणा स्पष्ट केली. “आम्ही टोकियोच्या मध्यभागी सेसोकू विद्यार्थ्यांना सक्रिय आणि शांत विद्यार्थी जीवनशैलीचा आनंद घेण्यास मदत करण्याच्या प्रबळ आशेने हा कार्यक्रम सुरू केला. त्यांच्या गणवेशाची आणि ड्रेस शूजची काळजी कशी घ्यावी, याबद्दल जागरूक आणि कुशल असण्यामुळे एक ताजे, स्वच्छ वातावरण मिळते आणि त्यांनी त्यांचे केस स्टाईल केल्याने सर्व समान गणवेश परिधान करत असले तरीही त्यांना स्वत:ची अभिव्यक्ती करण्याची संधी मिळते, असे त्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले.