Kunal Kamra controversy स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणाची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. कुणाल कामरा याने एका कार्यक्रमात विडंबनात्मक गाण्यातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आणि त्यांचा उल्लेख ‘गद्दार’असा केला. त्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे आणि सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दाही उचलून धरला जात आहे. या वादानंतर शिवसेनेचे (शिंदे) कार्यकर्ते आक्रमक झाले. रविवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील स्टुडिओची तोडफोड केली. याच स्टुडिओत कुणाल कामराचा कार्यक्रम रेकॉर्ड केला जात होता. कामराविरुद्ध अनेकदा पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या आणि धमक्याही देण्यात आल्या. परंतु, या वादानंतर यूट्यूब वापरकर्ते आनंदाने कुणाल कामरा याला देणगी स्वरूपात पैसे देत आहेत. त्यामागील कारण काय? नेमके हे प्रकरण काय? जाणून घेऊ.
वादाची सुरुवात कशी झाली?
१९९७ च्या ‘दिल तो पागल है’मधील ‘भोली सी सुरत’ या गाण्याच्या चालीत कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. “मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आये,” असे गाण्याचे बदललेले बोल कामरा याने स्टेजवर वाचून दाखवले. हे गाणे २०२२ मध्ये महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध शिंदे यांनी केलेल्या बंडावर आधारित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले. “कुणीही अभिव्यक्ती करू नये असं आपलं म्हणणं नाही. हास्य, व्यंग यांचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत. राजकीय व्यंग झालं तरी आपण त्याला दुसरा कुठला रंग देण्याचा प्रयत्न केलेला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आपण लोक आहोत; पण ते स्वैराचाराकडे जाणार असेल, तर ते मान्य होणार नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“एकनाथ शिंदेजींचा अपमान झाला आहे आणि तसे करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे सहन केले जाणार नाही. निवडणुकांनी देशद्रोही कोण आहेत हे सिद्ध केले आहे. कोणत्याही स्टँडअप कॉमेडियनला इतक्या मोठ्या नेत्याला देशद्रोही म्हणण्याचा अधिकार नसावा,” असेही फडणवीस म्हणाले. “महाराष्ट्राच्या जनतेने देशद्रोही कोण आहे हे ठरवले आहे. कुणाल कामराने माफी मागावी. हे सहन केले जाणार नाही,” असे ते पुढे म्हणाले. त्या विनोदी कलाकारावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कामरानं त्याच्या कृत्याबद्दल माफी मागावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
शिवसेना आक्रमक
कुणाल कामराचा व्हिडीओ शूट केलेल्या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचे व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाले. मुंबईच्या खार भागातल्या ‘दी युनिकाँटिनेंटल हॉटेल’मध्ये असणाऱ्या ‘दी हॅबिटॅट’ स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी शिवसेनेच्या १२ नेत्यांना अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. स्टँडअप कॉमेडियनविरुद्ध एफआयआर दाखल करणारे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी कामराकडून माफी मागण्याची मागणी केली आणि म्हटले, “शिवसैनिक त्यांना मुंबईत मुक्तपणे फिरू देणार नाहीत.” पुढे ते म्हणाले, “जर तो सार्वजनिक ठिकाणी कुठेही दिसला, तर आम्ही त्याच्या चेहऱ्याला काळे फासू.”
स्टुडिओच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून माहिती देण्यात आली की, ते स्टुडिओ बंद करीत आहेत आणि कलाकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी व्यासपीठ कसे उपलब्ध करून द्यावे याचा मार्ग शोधत आहेत. “आम्हाला लक्ष्य करीत अलीकडे करण्यात आलेल्या तोडफोडीमुळे आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही काळजीत आहोत.” त्यांनी पुढे नमूद केले, “कलाकार त्यांच्या विचारांसाठी पूर्णपणे जबाबदार असतात. आम्ही कधीही कोणत्याही कलाकाराने सादर केलेल्या कंटेंटमध्ये सहभागी झालो नाही; परंतु अलीकडील घटनांमुळे आम्हाला पुन्हा विचार करायला भाग पाडले आहे. आम्हाला प्रत्येक वेळी दोष दिला जातो आणि लक्ष्य केले जाते.”
“स्वतःला आणि आमच्या मालमत्तेला धोक्यात न घालता, मुक्त अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ प्रदान करण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधेपर्यंत आम्ही स्टुडिओ बंद करीत आहोत. आम्ही सर्व कलाकार, प्रेक्षकांना त्यांचे विचार मुक्तपणे मांडण्यासाठी आमंत्रित करतो. आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाचीही गरज आहे; जेणेकरून आम्ही कलाकारांच्या अधिकारांचादेखील आदर करू,” असे स्टुडिओने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
एक सोशल मीडिया वापरकर्ता म्हणाला, “मेरे को तो अच्छा लगा, अच्छा किया”, अशी प्रतिक्रिया कुणाल कामरा याने कंगना रनौतचे कार्यालय बीएमसीने पाडल्यावर दिली होती. संजय राऊत यांनी खिल्ली उडवली होती. त्यांच्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’चे समर्थन करण्यापूर्वी, हे नक्की पाहा. हे फक्त एक निरीक्षण आहे,” असे एका वापरकर्त्याने ‘एक्स’वर लिहिले. “भाषण स्वातंत्र्यावर तुम्ही फक्त तेव्हाच नाराजी व्यक्त करू शकता जेव्हा ते हिंसाचाराला उत्तेजन देते. कुणाल कामराच्या कृत्यानं असे काही घडत नाही,” असे कामराच्या बचावात दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले.
कुणाल कामराला यूट्यूबवर देणग्या
कामराच्या विडंबनात्मक गाण्यानं सोशल मीडियावर नव्या वादाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी लोक यूट्यूबवर आपले मत मांडताना दिसत आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो समर्थकांनी कुणाल कामरासाठी आनंदाने पैशांचे वाटप केले आहे. त्यांनी यूट्यूबच्या ‘सुपर थँक्स’ फीचरचा वापर करून कुणाल कामरा याला स्वखुशीने पैसे दिले आहेत. हे यूट्यूबचे वैशिष्ट्य आहे. त्यात यूट्यूबवर निर्मात्याचे समर्थन करण्यासाठी लोक पैसे देऊ शकतात. स्टँडअप कॉमेडियनच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करण्याचा आणि त्याच्या धाडसाची प्रशंसा करण्याचा हा वापरकर्त्यांचा एक मार्ग होता.

या वादामुळे कामराच्या भविष्यातील संधी जसे की स्टँडअप गिग्स रद्द होतील हेदेखील वापरकर्त्यांनी लक्षात घेऊन त्याला देणगी दिली. “बोलण्याचे धाडस दाखवल्याबद्दल कुणालचे आभार. मला आशा आहे की, प्रत्येक जण आपले पैसे त्याला देतील आणि आपल्या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतील,” असे एका यूट्यूब टिप्पणीकर्त्याने १७९ रुपये देणगी देताना लिहिले. दुसऱ्या टिप्पणीकर्त्याने देणगी देताना लिहिले, “कृपया निधी संकलनाचा कार्यक्रम आयोजित करा आणि आम्ही तुमचे बिल भरू. चिअर्स मित्रा.”
कुणाल कामराची प्रतिक्रिया
कामरा याने ‘एक्स’वर दिलेल्या निवेदनात एकही शब्द उच्चारला नाही. “मला धडा शिकवण्याच्या धमक्या देणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी : अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार फक्त श्रीमंतांकडे नाही. तुमच्यासारखे लोक जोक सहन करू शकत नाहीत. एखाद्या वजनदार राजकीय माणसामुळे माझा जो अभिव्यक्तीचा हक्क आहे, त्यावर काही परिणाम होणार नाही. मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही. राजकीय सर्कस आणि राजकारणावर मी व्यंगात्मक पद्धतीने बोट ठेवले आहे,” असे कामरा याने लिहिले.
“माझ्याविरुद्ध कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलिस आणि न्यायालयांना सहकार्य करण्यास तयार आहे. पण, विनोदामुळे नाराज झाल्यास तोडफोड करणे हा योग्य पर्याय आहे, असे ज्यांनी ठरवले आहे, त्यांच्याविरुद्ध कायदा निष्पक्ष आणि समान रीतीने लागू केला जाईल का”, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. कुणाल कामराने तोडफोडीसाठी शिवसेनेवर टीका केली आणि असे म्हटले की, त्याच्या विनोदासाठी ‘दी हॅबिटॅट’ जबाबदार नाही आणि त्याच्या मजकुरात त्यांचा कोणताही सहभाग नाही.