जून महिन्याची सुरुवातच बलात्कार, खून अशा विकृत गुन्ह्यांनी झाली. मुंबईमध्ये १ ते ८ जून, २०२३ पर्यंत ४ बलात्कारांच्या घटनांची नोंद करण्यात आली. दि. २२ मे, २०२३ रोजी मुंबई पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या अहवालानुसार जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२३पर्यंत ३२५ बलात्काराच्या घटनांची नोंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बलात्काराच्या घटनांची एकूण आकडेवारी, बलात्काराची वाढलेली मानसिकता आणि ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय याचा ऊहापोह करणे उचित ठरेल…
२०२३ चा मुंबई पोलिसांचा अहवाल काय सांगतो…
२२ मे, २०२३ रोजी मुंबई पोलिसांनी बलात्कारांच्या आकडेवारी संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, जानेवारी, २०२३ ते एप्रिल २०२३ पर्यंत मुंबई शहरात ३२५ बलात्कारांच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये जानेवारीमध्ये ७८, फेब्रुवारीमध्ये ६०, मार्चमध्ये ९० आणि एप्रिलमध्ये ८९ बलात्कारांच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. याच तुलनेत पुणे शहरामध्ये ४ महिन्यांमध्ये मिळून ८९ बलात्काराच्या घटनांची नोंद पोलिसांमध्ये करण्यात आली. जानेवारीमध्ये सर्वाधिक २८ घटना, फेब्रुवारीमध्ये २४, मार्चमध्ये १३ आणि एप्रिलमध्ये २४ घटनांची नोंद करण्यात आली. नागपूरमध्ये ८५ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली असून सर्वाधिक एप्रिलमध्ये झालेले आहेत. या सर्व संख्यांमध्ये अधिकांश बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तीकडून झालेले आहेत.
हेही वाचा : विश्लेषण : मुंबई प्लास्टिकची होत आहे? मुंबई का अडकतेय प्लास्टिकच्या विळख्यात…
२०१९ ते २०२२ पर्यंतची आकडेवारी
जानेवारी, २०२२ ते जुलै २०२२ या काळात मुंबई पोलिसांनी ५५० बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यातील ४४५ आरोपींना त्यांनी अटक केली असे मुंबई पोलिसांनी जुलै, २०२२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार दिसते. याच अहवालानुसार, ५५० बलात्कारांच्या घटनांमध्ये ३२३ मुली या अल्पवयीन होत्या. २०२१ मध्ये ८८८ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. २०२० या टाळेबंदीच्या काळात जानेवारी, २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत ७६६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये ६५८ आरोपींना अटक करण्यात आली. यात ४४५ अल्पवयीन मुली तर ३२१ महिलांवर बलात्कार झाले. अनुक्रमे ४१९ आणि २३९ आरोपींना अटक करण्यात आली. २०१९ मध्ये बलात्कारासंदर्भातील कलम ३७६ अंतर्गत १०१५ प्रकरणे नोंदवण्यात आली. यातील ९३१ प्रकरणे सोडवण्यात आली. २०१९ मध्ये ४१,९३१ महिला अत्याचारांची नोंद मुंबई पोलिसांमध्ये करण्यात आली. २०२० मध्ये ५१,०६८ तर २०२१ मध्ये ६४,६५६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. २०२२ मध्ये ५८,११२ घटनांची नोंद करण्यात आली.
खून, बलात्कार आणि मानसशास्त्र
मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांच्याशी वाढती बलात्कारांची संख्या आणि विकृत मानसिकता यासंदर्भात चर्चा केली असता त्यांनी बलात्कारासंदर्भात विविध पैलू सांगितले. मुळात स्त्रीकडे उपभोगाची वस्तू पाहण्याची मानसिकता पूर्वीपासून आहे. यामध्ये पुरुषांच्या मनात असणारी श्रेष्ठत्वाची भावना, सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक वातावरण कारणीभूत ठरत असते. स्त्रीकडून मिळालेला नकार आणि त्यामुळे निर्माण झालेली सूडाची भावना विकृत मानसिकतेसाठी कारण ठरते. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी वाटेल त्या पातळीवर जाण्याची तयारी पुरुषांमध्ये निर्माण झालेली दिसते. त्यासाठी ते तुरुंगातही जाण्यास तयार असतात.
मुळात जन्मजात कोणीही गुन्हेगार नसतो. समाज त्या व्यक्तीला घडवत असतो. कुटुंबाकडूनही होणारे संस्कार महत्त्वाचे ठरत असतात. समाज माध्यमे किंवा अन्य इंटरनेटवरील संकेतस्थळांमुळे विकृतीला पोषक असा मजकूर मिळतो. ‘आपण एक गुन्हा केला तर काय झालं’ ही मानसिकता यामुळे निर्माण होते. गुन्ह्याशी संबंधित पर्याय, अंमलबजावणी, पळवाटा हे समाजमाध्यमांवर उपलब्ध असते. त्याचाच आधार घेत विकृतीकडे पुरुष झुकतात. ‘बलात्कारानंतर खून’ अशी आता घटनांची पुनरावृत्ती झालेली दिसते. यालाही एकप्रकारे कारण दृक-श्राव्य माध्यमे, समाजमाध्यमे आहेत. व्यक्ती एखादी घटना या माध्यमांवर बघते. पुरावे नष्ट करण्याचा मार्ग म्हणून खून हा पर्याय त्यांना दिसतो. यातून एकाच पॅटर्नच्या गुन्ह्यांची निर्मिती होते.
बलात्कार रोखण्यासाठी महिलांची सक्षमताही तेवढीच आवश्यक आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे, प्रतिकारक्षमता या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्व स्त्रिया सक्षम होण्यासाठी आधी सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. बलात्कार थांबवण्यासाठी प्रबळ जनजागृतीची गरज आहे. कारण, कायद्यांनी बलात्कार थांबणार नाहीत. बलात्कार हे निरोगी मानसिकता निर्माण झाली तर थांबू शकतात, असे डॉ. शुभांगी पारकर यांनी मत मांडले आहे.
‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय ?
दहा वर्षांमध्ये बलात्कार आणि खुनाच्या झालेल्या घटनांचा आढावा घेतल्यास एकाच प्रकारच्या घटना किंवा समान पॅटर्न असलेल्या घटना दिसतात. अशा प्रकारच्या घटनांना ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणतात. तसेच, ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे वास्तवात घडलेल्या एखाद्या गुन्ह्यावरून प्रेरणा घेऊन किंवा काल्पनिक गुन्ह्यांवर आधारित मालिका/चित्रपटावरून प्रेरणा घेऊन तशाच प्रकारे केला जाणारा गुन्हा. ज्या गुन्ह्यांना माध्यमांमधून अधिक प्रसिद्धी मिळाली त्या गुन्ह्यांमध्ये अशाप्रकारची पुनरावृत्ती होण्याची अधिक शक्यता वर्तवली जाते. सध्या बलात्कार करून खून, खून करून तुकडे करणे, खून करण्याच्या पद्धती यामध्ये बऱ्यापैकी साम्य दिसते. या पद्धतीला ‘कॉपीकॅट क्राईम’ असे म्हणतात.
प्रथम ‘कॉपीकॅट’ या शब्दाचा प्रयोग डिसेंबर १९६१ मध्ये ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या एका लेखात डेव्हिड ड्रेसलर यांनी केला. डेव्हिड हे समाजशास्त्रज्ञ आणि न्यूयॉर्क स्टेट परोल विभागाचे कार्यकारी संचालक होते. ‘द केस ऑफ कॉपीकॅट क्रिमिनल’ या पुस्तकात त्यांनी याबाबत सविस्तरपणे लिहिले आहे.
सध्या खून आणि मृतदेहाचे तुकडे हा पॅटर्न ‘डेक्सटर’ या अमेरिकन क्राईम शोमध्ये दाखवण्यात आलेला. २०१० मध्ये डेहराडून येथे घडलेल्या अनुराधा गुलाटी हत्या प्रकरणात तिच्या देहाचे ७० तुकडे करण्यात आले होते. त्यानंतर हाच पॅटर्न आफताब पुनावाला याने वापरलेला दिसतो. उत्तरप्रदेशमध्ये २१ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रिन्स यादव याने आपल्या प्रेयसीचा खून करताना हाच पॅटर्न वापरला आणि हाच पॅटर्न २०२३ मध्ये बलात्कार, खून प्रकरणांमध्ये वापरलेला दिसतो.
बलात्काराचे होणारे सामाजिक परिणाम
बलात्कार या घटनेचे पीडित व्यक्तीसह समाजावरही परिणाम होत असतात. समाजामध्ये असुरक्षिततेची, न्यूनगंडाची, संशयाची भावना निर्माण होते. बलात्काराच्या घटना ऐकून पुरुषांविषयी किंवा विशिष्ट समाजाविषयी नकारात्मक भावना निर्माण होताना दिसून येते. यामुळे अर्थातच समाजाचे स्वास्थ्य बिघडते. स्त्रीच्या आत्मनिर्भरतेवर काही प्रमाणात कुटुंबाकडून मर्यादा आणल्या जातात. यावरूनच बलात्कार ही घटना समाजाच्या मानसिकतेवरही परिणाम करताना दिसते.