कडक उन्हापासून त्वचेचा बचाव करायचा असेल, तर सनस्क्रीन लोशन लावणे हा एक उत्तम पर्याय मानला जातो. बाजारात सध्या सौंदर्यप्रसाधनांच्या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. वेगवेगळे दावे करणऱ्या सनस्क्रीन आज बाजारात उपलब्ध आहेत. उन्हाळा असल्यामुळे चांगल्यातील चांगले सनस्क्रीन घेण्याकडे लोकांचा कल असतो. विशेषतः जाहिराती बघून लोक सौंदर्यप्रसाधने खरेदी करतात. परंतु, आता या जाहिरातींवरून नवा वाद सुरू झाला आहे. सनस्क्रीनच्या जाहिरातीवरून दोन मोठे सनस्क्रीन ब्रँड आमने-सामने आले आहेत. जाहिरातीचा वाद चक्क न्यायालयापर्यंत येऊन पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात होनासा कन्झ्युमरने त्यांची मोठी प्रतिस्पर्धी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल)विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. होनासा कन्झ्युमर ही ब्युटी अँड पर्सनल केअर ब्रॅंड ‘मामाअर्थ’ची पेरेंट कंपनी आहे. होनासाने हिंदुस्तान युनिलिव्हरच्या नवीन जाहिराती अपमानकारक असल्याचे म्हटले आहे. या नवीन जाहिरातींमध्ये सनस्क्रीन या सौंदर्यप्रसाधनाचा समावेश आहे. ‘होनासा’ने या जाहिरातींवर लवकरात लवकर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. नेमका हा वाद काय आहे? लोकप्रिय सौंदर्यप्रसाधन ब्रॅंडमधील वाद न्यायालयात कसा पोहोचला? त्याबद्दल जाणून घेऊ.

हिंदुस्तान युनिलिव्हर विरोधात होनासाची तक्रार काय?

हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ‘लॅकमे’ सनस्क्रीनच्या नवीन जाहिरातीवरून या वादाला सुरुवात झाली आहे. होनासाने दावा केला आहे की, या जाहिरातीत आमच्या प्रॉडक्टचा अपमान करण्यात आला आहे. ‘लॅकमे’ सनस्क्रीनच्या नवीन जाहिरातीतील या सनस्क्रीनमध्ये एसपीएफ ५० असल्याचा आणि उन्हापासून उच्च संरक्षण देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु, त्यांनी होनासाच्या प्रॉडक्टप्रमाणे दिसणाऱ्या सनस्क्रीनमध्ये केवळ २० टक्के एसपीएफ असल्याचा दावा केला आहे. या जाहिरातीत पिवळी बाटली दाखवण्यात आली आहे, जी होनासाच्या सनस्क्रीन ब्रँडसारखी दिसते.

होनासाने असेदेखील म्हटले की, हिंदुस्तान युनिलिव्हरने आपल्या सनस्क्रीनला ‘ऑनलाइन बेस्ट सेलर’ असे लेबल लावण्यात आले आहेत. त्यांचे असेही सांगणे आहे की, ही बाटली होनासाच्या स्वतःच्या सनस्क्रीन ब्रँड ‘द डर्मा को’सारखी दिसते. दिल्ली उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत होनासाने म्हटले आहे की, द डर्मा कोचे सनस्क्रीन अॅमेझॉनमध्ये सातत्याने बेस्ट सेलर म्हणून नोंदवले जात आहे. परंतु, त्यांच्या जाहिरातीमध्ये ‘एसपीएफ लाय डिटेक्टर टेस्ट’असे लेबल लावण्यात आले आहे. त्याचा अर्थ असा की त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी जाहिरात केलेल्या फायद्यांबद्दल खोटे बोलत आहे.

जाहिरातींच्या दाव्यांमध्ये काय?

एसपीएफ म्हणजेच सन प्रोटेक्शन फॅक्टर, त्याने त्वचेला उन्हापासून कितपत संरक्षण मिळते, हे त्यावरून ठरते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जास्त एसपीएफ म्हणजे सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणोत्सर्गाच्या हानिकारक प्रभावांपासून चांगले संरक्षण. लॅक्मेच्या नवीन जाहिरातीमध्ये प्रतिस्पर्धी सनस्क्रीनच्या वास्तविक एसपीएफवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. लॅक्मेच्या जाहिरातीत दावा करण्यात आला आहे की त्यांचे सनस्क्रीन ‘इन व्हिव्हो’ चाचणी केलेले आहे. इन व्हिव्हो चाचणीमध्ये उत्पादन किती प्रभावी आहे हे प्रत्यक्ष त्वचेवर तपासले जाते. हिंदुस्तान युनिलिव्हरने न्यायालयात सांगितले की, जेव्हा त्यांनी’द डर्मा कंपनी’च्या सनस्क्रीनची इन व्हिव्हो चाचणी केली तेव्हा त्यात केवळ २० एसपीएफ असल्याचे आढळून आले.

या प्रकरणात पुढे काय होणार?

दिल्ली उच्च न्यायालय या खटल्याची सुनावणी सुरू आहे आणि अंतिम निकाल येईपर्यंत सुनावणी सुरू राहणार आहे. ही चाचणी सुरू असताना हिंदुस्तान युनिलिव्हर त्यांच्या जाहिरातींमधील ‘द डर्मा’ कंपनीचा संदर्भ बदलण्याचे आणि जाहिरात असलेले फ्लेक्स काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हरने होनासाच्या संस्थापक गझल अलाघ यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. गझल अलाघ यांच्या सोशल मीडियावरील पोस्टविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे. परंतु, गझल अलाघ यांनी स्वतःच्या पोस्टचे समर्थन करीत सोशल मीडियावर त्यांच्या उत्पादनांचे समर्थन करत लॅक्मेवर उपहासात्मक टीका केली आहे, असे हिंदुस्तान युनिलिव्हरचे म्हणणे आहे. “इन व्हिव्हो टेस्टेड एसपीएफ५० क्लबमध्ये लॅक्मेचे स्वागत,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

ब्रँड जाहिरातीत एकमेकांवर टीका करू शकतात?

हे परिस्थितीवर अवलंबून आहे. प्रतिस्पर्ध्यावर टीका करणे ही जाहिरातीतील एक युक्ती आहे. यापूर्वी हिंदुस्तान युनिलिव्हरनेदेखील इतर प्रतिस्पर्धी ब्रँडवर त्यांच्या उत्पादनांना कमी लेखणाऱ्या जाहिरातींविरोधात खटला दाखल केला आहे. २०२२ मध्ये त्यांनी जर्मनीतील साबणीचा ब्रँड ‘सेबामेड’वर हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ‘डव’ला कमी लेखल्याचा आणि त्वचेसाठी उपयुक्त नसल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीविरोधात खटला दाखल केला होता. २०१७ मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरने क्वालिटी वॉल्स खऱ्या आइस्क्रीम नसून हायड्रोजनेटेड वनस्पती तेलापासून तयार असल्याचा दावा करणाऱ्या जाहिराती चालवल्याबद्दल ‘अमूल’विरोधातही खटला दाखल केला होता. यांसारख्या अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयांनी निकाल देताना असे स्पष्ट केले आहे, की जाहिरातींमध्ये तुलना करणे कायदेशीर आहे.

जाहिराती मर्यादा कधी ओलांडतात?

कायद्यानुसार ही तुलना तथ्यात्मक आणि पुराव्यांच्या आधारावर होणे योग्य मानले जाते आणि पुरावे नसल्यास केलेली तुलना ही ‘अपमानजनक’ मानली जाऊ शकते. सनस्क्रीनवरील या जाहिरातीच्या वादात हिंदुस्तान युनिलिव्हरने ‘द डर्मा’ कंपनीच्या सनस्क्रीनमध्ये एसपीएफ २० आहे, हे सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेतील चाचणी अहवाल न्यायालयात सादर केला गेला. परंत, होनासाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला आहे की, हा अहवाल अपूर्ण आहे आणि त्यांनी डर्मा कंपनीच्या सनस्क्रीनमध्ये एसपीएफ ५० आहे या दाव्याला समर्थन देणारा दुसरा अहवाल न्यायालयासमोर सादर केला. आता या प्रकरणात पुरावे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आता न्यायालय कोणत्या आधारावर निर्णय देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.