उत्तर अमेरिका आणि मध्य अमेरिकेमध्ये सोमवार, ८ एप्रिल रोजी खग्रास सूर्यग्रहण निरीक्षणाची संधी मिळत आहे. या ग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे, एकदा एका ठिकाणच्या भूभागावर खग्रास सूर्यग्रहण दिसल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण दिसून येण्याची वेळ ४०० वर्षांनी येते. त्यामुळे दुर्मिळातील दुर्मीळ अशा या खगोलभौतिक घटनेविषयी जगभर विलक्षण आकर्षण दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

८ एप्रिलचे खग्रास सूर्यग्रहण कुठे?

मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडातील काही भागांमध्ये हे सूर्यग्रहण थेट दिसणार आहे. अमेरिकेच्या दक्षिण आणि पूर्व भागामध्ये जवळपास ३ कोटी नागरिकांना ते दिसेल. भारतातून अर्थातच डिजिटल माध्यमांतून हे ग्रहण पाहता येऊ शकेल. भारतीय वेळेनुसार रात्री ९.१२ वाजता ग्रहणास आरंभ होईल. रात्री १०.०८ वाजता खग्रास पूर्णत्वाकडे पोहोचेल. ९ एप्रिल रोजी पहाटे २.२२ वा. ग्रहण सुटेल. या ग्रहणाचे खग्रासरूप (टोटॅलिटी) अलीकडच्या काळात दिसून आलेल्यांपैकी सर्वाधिक म्हणजे जवळपास ४ तासांचे असेल.

आणखी वाचा-विश्लेषण: निमित्त निवडणुकीचे अन् फुटीचे राजकारण; गांधी- नेहरू ते पवार!

सूर्यग्रहण म्हणजे काय?

शाळेतील भूगोल विषयामध्ये आपण सर्वजण सूर्यग्रहणाची मूलभूत व्याख्या शिकलेलो आहोत. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की चंद्राची सावली पृथ्वीच्या ज्या भागावर पडते, तेथून सूर्य काही वेळेसाठी अंशतः किंवा जवळपास पूर्णतः झाकला जातो. पूर्णतः सूर्य झाकल्या जाण्याच्या स्थितीस खग्रास (टोटल एक्लिप्स) सूर्यग्रहण म्हणतात. सूर्य अंशतः झाकला जातो, त्यावेळी त्या स्थितीस खंडग्रास (पार्श्यल एक्लिप्स) सूर्यग्रहण म्हणतात. याशिवाय कंकणाकृती (अॅन्युलर) आणि संमिश्र (हायब्रिड) असे सूर्यग्रहणाचे आणखी दोन प्रकार आहेत. खग्रास सूर्यग्रहणादरम्यान सूर्याच्या किरिटाचे (कोरोना) दुर्मीळ दर्शन होते. कंकणाकृती सूर्यग्रहणादरम्यान चंद्र पृथ्वीपासून सर्वाधिक अंतरावर किंवा त्या बिंदूच्या जवळपास असतो. वेळी एखाद्या हिऱ्याच्या अंगठीसारखा सूर्य भासतो. संमिश्र सूर्यग्रहण हे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. या स्थितीमध्ये काही भागांतून खग्रास आणि काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसून येते.

आणखी वाचा-विश्लेषण : पंतप्रधान सूर्यघर योजनेला राज्यात प्रतिसाद कमी का?

खग्रास सूर्यग्रहण सतत का होत नाही?

सूर्यग्रहणाची स्थिती कशी निर्माण होते. याचे मूलभूत कारण म्हणजे, सूर्य हा चंद्रापेक्षा जवळपास ४०० पटींनी मोठा आहे. परंतु त्याचबरोबर, सूर्य चंद्राच्या तुलनेत ४०० पटींनी दूर आहे. त्यामुळे पृथ्वीवरून दोन्ही समान आकाराचे दिसतात. पृथ्वीला चंद्र महिन्यातून एकदा पूर्ण फेरी मारतो. मग खग्रास सूर्यग्रहण प्रत्येक महिन्यात का घडून येत नाही? चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या विशिष्ट परिभ्रमण कक्षेमुळे संपूर्ण किंवा खग्रास सूर्यग्रहण ही घटना दुर्मीळ बनते. ही कक्षा विशिष्ट कोनात आहे आणि लंबवर्तुळाकार आहे. विशिष्ट कोनातील कक्षेमुळे चंद्राची सावली प्रत्येक वेळी पृथ्वीवर पडतेच असे नाही. शिवाय लंबवर्तुळाकार कक्षेमुळे चंद्र पृथ्वीपासून दूर गेल्यानंतर त्याची सावली क्षीण होते. खग्रास सूर्यग्रहणासाठी चंद्र पृथ्वीपासून सर्वाधिक नजीक असावा लागतो. त्यामुळे सूर्यग्रहण वर्षातून २ ते ५ वेळा घडून येत असले, तरी खग्रास सूर्यग्रहण १८ महिन्यांतून एकदाच घडते. अशावेळी चंद्राच्या प्रच्छायेच्या भागातील नागरिकांनाच खग्रास सूर्यग्रहण दिसून येते. याचीही वारंवारिता खूप कमी असते. कारण पृथ्वीच्या तुलनेत प्रच्छायेचा प्रदेश खूपच लहान असतो. शिवाय ७० टक्के पृथ्वी ही पाण्याने अर्थात महासागरांनी व्यापलेली असल्यामुळे अनेकदा महासागरांच्या भागात प्रच्छाया पडली, तर भूभागातील नागरिकांना खग्रास सूर्यग्रहण दिसून येऊ शकत नाही.

भारतात पुढील सूर्यग्रहण कधी?

भारतात गेल्या खेपेस २६ डिसेंबर २०१९ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण थेट दिसले होते. पुढील कंकणाकृती सूर्यग्रहण २१ मे २०३१ रोजी अपेक्षित आहे. ते भारताच्या दक्षिण आणि आग्नेय भागातून अनुभवता येईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are total solar eclipses rare why is april 8 solar eclipse special print exp mrj