-राखी चव्हाण
व्याघ्रप्रकल्पातील पर्यटनासाठी ‘जिप्सी’ हे पर्यटन वाहन वापरले जाते. व्याघ्रप्रकल्पालगतच्या गावकऱ्यांना रोजगार मिळावा म्हणून त्यांना हे वाहन चालवण्यासाठी प्राधान्य दिले जाते. मात्र, अलीकडे ग्रामीणांच्या नावावर रिसॉर्ट चालक, वनखात्यातील काही व्यक्ती वाहनाचा व्यवहार करत आहेत. परिणामी या वाहनाची योग्यता तपासणी होत नाही आणि पर्यटकांचा जीव धोक्यात येतो. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात अनेक वाहने इतर वाहनांचे सुटे भाग वापरून तयार करण्यात आल्याचे आढळले. तर मेळघाट व्याघ्रप्रकल्पात पर्यटक वाहनाला अपघात झाला. या वाहनांकडून नियमांचे उल्लंघन हीदेखील नित्याची बाब झाली आहे. मात्र, या सर्व प्रकारांमुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आला आहे.
पर्यटक वाहनांकडून नियमांचे उल्लंघन होते का?
राज्यातील व्याघ्रपर्यटनाचा सर्वाधिक भार ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पावर आहे. मात्र, पर्यटकांना वाघ दाखवण्यासाठी सातत्याने पर्यटक वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वन्यप्राणी आणि पर्यटक वाहन यांच्यात विशिष्ट अंतर असावे लागते, पण हे नियम महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्पात पाळले जात नाहीत. काही वर्षांपूर्वी उमरेड-करांडला अभयारण्यात वाघाने पर्यटकांनी भरलेल्या पर्यटन वाहनाचा आरसा चाटण्याचा प्रकार घडला. तर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाहन अतिशय जवळ गेल्यामुळे एका वाघाने त्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पर्यटक वाहनाच्या ‘योग्यता तपासणी’चे काय?
पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक पर्यटक वाहनांची योग्यता तपासणीच होत नाही. पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘जिप्सी’ या वाहनाची निर्मिती २०१८सालापासून बंद झाली आहे. तर निर्मितीपासून १५ वर्ष झालेले वाहन वापरता येत नाही. त्याच्या योग्यता तपासणीनंतरच त्या वाहनाला परवानगी दिली जाते. ही तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून करून घेणे आवश्यक आहे. मात्र, अनेक व्याघ्रप्रकल्पात पर्यटन वाहनाची योग्यता तपासणीच झालेली नाही. मेळघाट व ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील घटनेनंतर या बाबी उघडकीस आल्या. त्यानंतर आता या वाहनांची योग्यता तपासणी केली जात आहे.
व्याघ्रप्रकल्पात पर्यटकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी कुणाची?
मेळघाट व्याघ्रप्रकल्पात काही दिवसांपूर्वीच चालकाने वाहनाची वेगमर्यादा न पाळता वाहन वेगाने पळवले. त्यामुळे या वाहनाचा अपघात झाला आणि पर्यटकांना इजा झाली. तर याच व्याघ्रप्रकल्पात काही महिन्यांपूर्वी वाहनातील इंधन संपल्याने वाहन बंद पडले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातही पर्यटक वाहन बंद पडण्याच्या व अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत वाघ, बिबटे यांसारख्या प्राण्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यास, त्याची जबाबदारी व्याघ्रप्रकल्प प्रशासन घेणार आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतो.
पर्यटक वाहनाची परवानगी नेमकी कुणाकडे?
व्याघ्रप्रकल्पासाठी पर्यटन वाहन देताना गावपातळीवरील पर्यावरण विकास समितीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मग ते वाहन व्याघ्रप्रकल्पात पर्यटनासाठी दाखल होते. मात्र, ही समिती फक्त गावातील व्यक्तीला त्यासाठी प्राधान्य दिले आहे किंवा नाही हे तपासते. उर्वरित वाहनाची कागदपत्रे आणि योग्यता तपासणीची जबाबदारी ही व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाची आहे. व्यवस्थापनाकडून अशी कोणतीही तपासणी होत नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात अलीकडेच अनेक पर्यटक वाहनांना वेगवेगळ्या वाहनाचे सुटे भाग लावण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर व्यवस्थापनाने मात्र यासाठी समितीकडे बोट दाखवले.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बंदिस्त पर्यटक वाहनाचे काय?
भारतातील कोणत्याही व्याघ्रप्रकल्पात पर्यटनासाठी वापरली जाणारी वाहने बंदिस्त नाहीत. मात्र, महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी बंदिस्त वाहने वापरण्याबाबत विचार सुरू झाला होता. त्या दृष्टीने ताडोबा व्यवस्थापनाने पहिले पाऊल टाकत सफारी जिप्सी वाहनांवर सुरक्षाकवच असणारा डिझाईनचा आराखडा डिझायनर्स, फॅब्रिकेटर्स, अभियंता यांच्याकडून मागवला. मात्र दीड वर्ष उलटूनही हा प्रकल्प रेंगाळलेला आहे.