देशाची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) मुंबई ते दिल्ली द्रुतगती महामार्ग बांधला जात आहे. त्याच महामार्गाचा एक भाग म्हणजे मुंबई ते बडोदा द्रुतगती महामार्ग. या महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू असून यात ट्विन ट्यूब टनेल अर्थात दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. हे बोगदे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा माथेरान डोंगराच्या खालून जाणार आहेत. अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक असणाऱ्या भुयारीकरणाच्या कामाला फेब्रुवारीत सुरुवात झाली. आतापर्यंत भुयारीकरणाचे किती काम पूर्ण झाले आहे, हे काम कधी पूर्ण होणार, बडोदा ते मुंबई द्रुतगती महामार्ग केव्हा सुरू होणार याचा हा आढावा…
मुंबई ते बडोदा द्रुतगती महामार्ग आहे कसा?
देशातील दळणवळण सेवा बळकट करण्यासाठी एनएचआयकडून (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) देशभर रस्त्यांचे, द्रुतगती महामार्गाचे जाळे विणले जात आहे. देशातील महत्त्वाची शहरे एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे मुंबई ते दिल्ली द्रुतगती महामार्ग. एनएचआयकडून १३८६ किमी लांबीच्या या महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. यातील पहिला टप्पा नुकताच खुला झाला आहे. त्याच दिल्ली ते मुंबई द्रुतगती महामार्गाचा मुंबई ते बडोदा महामार्ग हा एक भाग आहे. मुंबई ते दिल्ली महामार्गातील हा शेवटचा टप्पा आहे. या टप्प्याचे काम महाराष्ट्रात सध्या वेगात सुरू आहे. हे काम दोन टप्प्यांत एनएचएआयकडून करण्यात येत आहे. हा महामार्ग अंदाजे ४४० किमी लांबीचा असून तो पूर्ण झाल्यास मुंबई ते बडोदा हे अंतर केवळ चार तासांत कापता येणार आहे. सध्या या अंतरासाठी साडेसात तास लागतात. या महामार्गाचे काम बडोदा ते तलासरी आणि तलासरी ते मोरबे अशा दोन टप्प्यांत सुरू आहे. बडोदा ते तलासरी टप्पा २७५.३२२ किमी लांबीचा आहे. दुसऱ्या टप्प्यात तलासरी ते मोरबेदरम्यानचे काम केले जात आहे. दुसऱ्या टप्प्यात अ, ब आणि क असे आणखी टप्पे आहेत. त्यानुसार टप्पा २ अ अंतर्गत तलासरी ते विरार अशा ७६.८१ किमी लांबीच्या महामार्गाचे तीन पॅकेजमध्ये काम सुरू आहे. टप्पा २ बमध्ये विरार ते मोरबे असे ७९.७८३ किमी लांबीचे काम सुरू आहे. हे काम चार पॅकेजमध्ये सुरू आहे. टप्पा २ क हा भोज ते मोरबे दुहेरी बोगद्याच्या कामाचा आहे. हा सर्वांत महत्त्वाचा आणि आव्हानात्मक असा टप्पा आहे.
हेही वाचा – विश्लेषण: सर्वाधिक वायू प्रदूषण दक्षिण आशियातच कसे?
माथेरानच्या डोंगराखालील दुहेरी बोगद्यांची वैशिष्ट्ये काय?
मुंबई ते बडोदा द्रुतगती महामार्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात ट्विन ट्यूब टनेल (दुहेरी बोगदे) बांधण्यात येणार आहेत. अंबरनाथमधील भोज गाव ते पनवेलमधील मोरबे या दरम्यान ४.१६ किमी लांबीचा, २१.४५ मीटर रुंदीचा आणि ५.५ मीटर उंचीचा असा हा दुहेरी बोगदा आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा माथेरानच्या डोंगराखालून हा बोगदा जाणार आहे. भल्या मोठ्या डोंगराखाली भुयारीकरण करणे हे मोठे आव्हान एनएचएआयसमोर आहे.
बोगद्याच्या कामाला सुरुवात केव्हा झाली?
माथेरानच्या डोंगराखालून जाणाऱ्या दुहेरी बोगद्याच्या कामाला एनएचआयकडून फेब्रुवारीमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. ४.४१ किमीच्या या बोगद्याच्या भुयारीकरणाच्याही कामाला सुरुवात झाली आहे. डोंगराखालून भुयार खणण्याचे अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक काम आहे. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी एनएचएआयने अत्याधुनिक अशा एसटीएम तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यानुसार दुहेरी बोगद्याच्या दोन्ही बाजूने अर्थात चार टोकांकडून भुयारीकरणास सुरुवात करण्यात आले आहे. कठीण असे खडक स्फोट करून फोडत एसटीएम यंत्र पुढे पुढे जात आहे. आतापर्यंत चारही बाजूने मिळून दीड किमीचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. आता या कामाचा वेग वाढवून शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करण्याचे एनएचएआयचे उद्दिष्ट आहे.
बोगद्याचे आणि बडोदा द्रुतगती महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार?
बडोदा ते मुंबई द्रुतगती महामार्गाचे काम १७ टप्प्यांत सुरू आहे. यातील १० टप्प्यांचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तलासरी ते मुंबई टप्प्यातील सात टप्प्यांत (पॅकेज) सुरू आहे. त्यातील माथेरानच्या डोंगराखालून जाणाऱ्या दुहेरी बोगद्याचे काम सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे एनएचएआयचे नियोजन आहे. तलासरी ते मुंबई या टप्प्याचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे काम पूर्ण झाल्यास बडोदा ते मुंबई द्रुतगती महामार्ग वाहतूक सेवेत दाखल होईल. हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास बडोदा ते मुंबई प्रवास केवळ साडेचार तासांत करणे शक्य होणार आहे.