बलुचिस्तानच्या मुसाखेल जिल्ह्यात सोमवारी (२६ ऑगस्ट) सकाळी बंदूकधार्यांनी बस आणि ट्रक थांबवले, प्रवाशांना खाली उतरवले आणि त्यांची ओळख विचारली. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला; ज्यात २३ जणांचा मृत्यू झाला. “पंजाबला जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली आणि पंजाबमधील लोकांची ओळख पटवून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या,” असे मुसाखेलचे सहायक आयुक्त नजीब काकर यांनी सांगितले. अतिरेक्यांनी यावेळी १० गाड्या पेटवल्याचेही सांगण्यात आले. बलुचिस्तानमध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला नाही. या वर्षी एप्रिलमध्ये बलुचिस्तानच्या नोश्की शहराजवळ नऊ पंजाबी प्रवाशांची ओळखपत्रे तपासल्यानंतर अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बलुचिस्तानच्या केच जिल्ह्यात सहा पंजाबी मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. २०१५ मध्ये तुर्बतजवळील कामगार छावणीवर झालेल्या हल्ल्यात बंदूकधाऱ्यांनी २० बांधकाम कामगारांना ठार केले. ते सर्व कामगार सिंध आणि पंजाबमधील होते. बलुच अतिरेकी पंजाबींना लक्ष्य का करीत आहेत? इतिहासातील घटनांशी याचा काय संबंध? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
बलुच बंडखोरी आणि पाकिस्तानी राज्याकडून दडपशाही
पाकिस्तानच्या जन्मापासून बलुचिस्तानमध्ये रक्तरंजित बंडखोरी, क्रूर राज्य दडपशाही आणि राष्ट्रवादी चळवळी सुरू आहेत. बलुचिस्तानमध्ये १९४८ साली पहिल्या बंडाची सुरुवात झाली. बलुचिस्तान प्रांतातील चार प्रमुख राज्यांपैकी सर्वांत मोठे आणि सर्वांत मजबूत राज्य असलेल्या कलातमध्ये पाकिस्तानी सैन्याने सक्तीने प्रवेश केल्यानंतर या बंडाला सुरुवात झाली. कलातच्या ‘खान’ने स्वतंत्र बलुच राज्याचा पुरस्कार केला होता. परंतु, या प्रदेशात सोविएत विस्ताराची ब्रिटिशांची भीती आणि फाळणीचे नुकसान लक्षात घेता, शक्य तितका भूभाग एकत्रित करण्याच्या पाकिस्तानच्या उत्सुकतेने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. २७ मार्च १९४८ रोजी पाकिस्तानी सैन्याने बलुचच्या भूमीत बळजबरीने प्रवेश केल्याच्या एक दिवसानंतर खान याने ॲक्सेशनच्या करारावर स्वाक्षरी केली.
त्यानंतर लगेचच या प्रवेशाविरोधात निदर्शने सुरू झाली. वेगळ्या बलुच राज्याच्या मागणीसाठी पाच वेळा स्वातंत्र्ययुद्धे पुकारण्यात आली. खानचा भाऊ प्रिन्स अब्दुल करीम याने स्वतंत्र राज्याच्या मागणीचा नारा देत १९४८ साली पहिले युद्ध सुरू केले. त्यानंतर १९५८-५९, १९६२-६३, १९७३-७७ व सध्या २००३ पासून हा संघर्ष सुरूच आहे. बांगलादेश मुक्ती चळवळीशिवाय या रक्तरंजित बंडखोरी कदाचित पाकिस्तानी सार्वभौमत्वासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे.
बलुचिस्तानी नागरिकांना पाकिस्तानी सैन्याकडून क्रूर दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. अपहरण, छळ, मनमानी अटक व फाशी यांसह अनेक अत्याचार केल्याचा आरोप बलुचिस्तानी नागरिकांनी केला आहे. अचूक आकडा उपलब्ध नसला तरी १९४८ पासून हजारो बलुच राष्ट्रवादी आणि निष्पाप नागरिकांची पाकिस्तानी सैन्याने हत्या केली असल्याचा अंदाज आहे. ‘व्हॉइस फॉर बलुच मिसिंग पर्सन’ या स्वयंसेवी संस्थेच्या मते, सुमारे ५,२२८ बलुच नागरिक बेपत्ता झाले आहेत (त्यात मृतांचाही आकडा गृहीत धरण्यात आला आहे). हा आकडा केवळ २००१ ते २०१७ च्या कालावधीतील आहे.
बलुच राष्ट्रवादी गटांनीही हिंसाचाराचा अवलंब केला आहे. प्रांतात राहणाऱ्या गैर-बलूच लोकांच्या वांशिक शुद्धीकरणाच्या प्रयत्नासह मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इस्लामाबादस्थित स्वयंसेवी संस्था ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर पीस स्टडीज’च्या ‘पाकिस्तान सिक्युरिटी रिपोर्ट २०२३’नुसार, “बलुच बंडखोर गट, प्रामुख्याने बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) व बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) यांनी बलुचिस्तानमध्ये ७८ हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये २०२३ मध्ये ८६ लोक मारले गेले आणि १३७ लोक जखमी झाले. हे हल्ले प्रामुख्याने प्रांताच्या मध्य, दक्षिण व नैर्ऋत्य भागातील १९ जिल्ह्यांमध्ये करण्यात आले; ज्यात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांना लक्ष्य केले गेले होते.” बीएलएने सोमवारच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, अशा आणखी हल्ल्यांचा इशारा दिला आहे, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे.
पंजाबींना लक्ष्य करण्याचे कारण काय?
बलुच राष्ट्रवाद आणि ७५ वर्षांपासून सुरू असलेली बंडखोरी याला दोन घटक कारणीभूत आहेत. पहिले कारण म्हणजे जातिभेद. स्वातंत्र्याच्या वेळी जात हीच बलुच राष्ट्रवादाचा आधार होती आणि आजही ती महत्त्वाची आहे. पंजाब प्रांताची निर्मिती झाल्यापासूनच पंजाब प्रांताने पाकिस्तानी राजकारणावर वर्चस्व राखले आहे. पंजाबी लोकांची देशात अभेद्य पकड आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघावरही ऐतिहासिकदृष्ट्या पंजाबींचे वर्चस्व राहिले आहे. केवळ धर्माच्या आधारावर निर्माण केलेल्या देशात जातीय भेदांनी विभाजनासारख्या बाबींना उत्तेजन दिले आहे; ज्यामुळे १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानात फूट पडली असून, आजपर्यंत बलुच संघर्ष सुरू आहे.
दुसरे म्हणजे बलुच नागरिकांमध्ये असलेली आर्थिक दुरवस्थेची आणि अन्यायाची भावना. बलुचिस्तान हा सर्वांत मोठा आणि अगदी कमी लोकसंख्या असलेला पाकिस्तानचा प्रांत आहे. बलुचिस्तान नैसर्गिक संसाधनांनी (तेलासह) परिपूर्ण आहे आणि इराण व अफगाणिस्तानच्या देशाच्या पश्चिम सीमेवर स्थित आहे. तरीही देशातील इतर लोकांच्या तुलनेत येथील लोक तुलनेने गरीब आहेत. बलुच राष्ट्रवादी गटांचे म्हणणे आहे की, पंजाबी वर्चस्व असलेले पाकिस्तानी राज्य बलुचिस्तानच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करते. उदाहरणार्थ, चीन-समर्थित ग्वादर बंदराचे बांधकाम.
हेही वाचा : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसक संघर्ष; सत्तांतरानंतरही बांगलादेशी निषेध का करत आहेत?
या प्रकल्पात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे; परंतु स्थानिक अर्थव्यवस्थेला फारसा फायदा झाला नाही. या प्रकल्पासाठी सुशिक्षित व बेरोजगार बलुची तरुणांऐवजी पंजाबी व सिंधी अभियंते आणि तांत्रिक तज्ज्ञ, तसेच चिनी तज्ज्ञांना नियुक्त केले गेले. बलुचिस्तानमध्ये पंजाबींना लक्ष्य करण्याच्या घटना याच संदर्भात घडतात. पाकिस्तानी राज्यातील पंजाबींच्या वर्चस्वाने बलुच लोकांमध्ये सतत अन्याय आणि परकेपणाची भावना येते. त्यामुळे पंजाबमधील लोक बंडखोरांचे मुख्य लक्ष्य ठरतात.
© IE Online Media Services (P) Ltd