बेरियमचा समावेश असलेले फटके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. विशेष म्हणजे ही बंदी फक्त दिल्ली किंवा राष्ट्रीय राजधानी(एनसीआर) परिसरापुरतीच मर्यादित नसून ती सर्वच राज्यांसाठी लागू आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने ७ नोव्हेंबर रोजी स्पष्ट केले. बेरियमचा समावेश असलेले फटाके फोडण्यास तसेच निर्मिती करण्यास मज्जाव करण्याचे आदेश राजस्थान सरकारने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. याच मागणीवर न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि एम. एण. सुंदरेश यांनी वरील निर्णय दिला. याच पार्श्वभूमीवर देशात कोणते फटका फोडण्यास परवानगी आहे? तसेच कोणत्या फटाक्यांवर बंदी आहे? हरित फटाके म्हणजे काय? हे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?

बेरियमचे क्षार असलेले फटाके फोडण्यावर बंदीचे आदेश केवळ दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिसरासाठी नसून संपूर्ण देशामध्ये लागू आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. “न्यायालयाचा आदेश हा संपूर्ण देशासाठी लागू असेल. यामध्ये राजस्थान राज्याचाही समावेश आहे. त्यामुळे राजस्थान सरकारने न्यायालयाच्या या निर्णयाची दखल घेत वायू तसेच ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. फक्त सणांमध्येच नव्हे तर सण संपल्यावरही सरकारने याकडे लक्ष द्यावे,” असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले.

हेही वाचा : भारताने इस्रायलकडून घेतले हर्मीस ९०० ड्रोन; हमास विरोधात वापरलेले ड्रोन किती उपयुक्त?

फटाक्यासंदर्भात न्यायालयाचा काय आदेश आहे?

सर्वोच्च न्यायालयाने २०१८ सालच्या ऑक्टोबर महिन्यात हरित आणि कमी उत्सर्जन करणारे फटाके वगळता इतर सर्व प्रकारच्या फटक्यांची निर्मिती आणि ते फोडण्यावर बंदी घातलेली आहे. याच निर्णयात न्यायालयाने फटाक्यांची माळ निर्माण करण्यावरही बंदी घातली होती. यासह फटाक्यांची निर्मिती करताना बेरियमचे क्षार वापरण्यावरही न्यायालयाने बंदी घातलेली आहे. फटाक्यांचा आवाज हा परवानगी असलेल्या आवाजापेक्षा जास्त नसावा, असेही न्यायालयाने म्हटले होते. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी न्यायालायने आपला हाच निकाल कायम ठेवला होता.

फटाके उत्पादक संघटनांची याचिका फेटाळली

या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात फटाके उत्पादकांच्या संघटनेने न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत फटाक्यांची माळ निर्माण करण्यास परवानगी द्यावी, तसेच अॅडिटिव्हसह बेरियमच्या वापरास परवानगी द्यावी, अशी मागणी या संघटेने केली होती. न्यायालयाने मात्र ही मागणी फेटाळली. २०२० साली राष्ट्रीय हरित लवादाने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाअंतर्गत राजधानी दिल्ली परिक्षेत्रात सर्व प्रकारच्या फटाक्यांची विक्री आणि वापरावर बंदी घातली होती. तसेच शहरामध्ये ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता मध्यम किंवा खराब आहे, त्याच ठिकाणी हरित फटाके फोडण्यास परवानगी आहे, असा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने घेतला होता.

हेही वाचा : मोबाईलच्या अतिवापरामुळे शुक्राणूंची संख्या होतोय कमी? नवा अभ्यास काय सांगतोय?

फटाक्यांची निर्मिती कशी केली जाते?

फटाक्यांची निर्मिती करताना प्रामुख्याने ऑक्सिडायझर, इंधन, कलरिंग एजंट, बाईंडर या चार घटकांचा वापर केला जातो. फटाक्यांनी पेट घ्यावा यासाठी ऑक्सिडायझरचा वापर केला जातो. फटाक्याने पेट घेतल्यानंतर आग कायम राहावी यासाठी इंधनाचा वापर होतो. कलरिंग एजंटमुळे फटाक्यांना वेगवेगळा रंग येतो तसेच ते चमकतात. तर हे सर्व मिश्रण एकसंध ठेवण्याचे काम बाईंडर करते. आपण जोपर्यंत फटाका पेटवत नाही, तोपर्यंत बाईंडर फटाक्यातील सर्व मिश्रणाला एकत्र ठेवण्याचे काम करते.

बेरियमचा वापर करण्यास बंदी

बेरियमसारखी रसायने हे कलरिंग एजंटचे काम करतात. बेरियमचा मानवी शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो. त्यामुळे फटाक्यांत या रसायनाचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बेरियममुळे डोळ्यांत जळजळ, श्वसनास त्रास, त्वचेची अॅलर्जी तसेच कॅन्सरसारख्या समस्या उद्भवू शकतात.

हेही वाचा : Skyquakes: स्कायक्वेक्स म्हणजे काय? भूकंप खरोखरच अवकाशात होतात का?

फटाक्यांचे वेगवेगळे रंग, त्यासाठी वापरली जाणारी रसायने

फटक्यांना फोडल्यानंतर आपल्या वेगवेगळे रंग दिसतात. मात्र या वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर केला जातो. अॅल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि टायटॅनियमचा वापर केलेल्या फटाक्यामुळे पांढरा रंग निर्माण होतो. कार्बन आणि लोह वापरल्यास फटक्याचा रंग केशरी होतो. सोडियमच्या वेगवेगळ्या कम्पाऊंड्सचा वापर केलेले फटाके फोडल्यावर पिवळा रंग निर्माण होतो. कॉपर कंपाऊंड आणि स्ट्रोन्टियम कार्बोनेटचा वापर केल्यास फटाक्यांतून निळ्या आणि लाल रंगाची निर्मिती होते. बेरियम नायट्रेट, बेरियम क्लोरेट किंवा बेरियम मोनो क्लोराईड सॉल्टचा वापर केलेल्या फटाक्यांतून हिरव्या रंगाची निर्मिती होते.

हरित फटाके म्हणजे काय?

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (CSIR-NEERI) माजी संचालक डॉ. राकेश कुमार यांनी हरित फटाक्यांविषयी २०१८ साली इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर सांगितले होते. हरित फटाक्यांत वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणारी रसायने नसतात. याच कारणामुळे त्यांना हरित फटाके म्हटले जाते. फटाके तयार करताना कमी हानिकारक आणि धोकादायक असणारे घटक वापरले जातात, असे डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले होते.

हरित फटाक्यांची कल्पना कोणी मांडली?

CSIR, सेंट्रल इलेक्ट्रो केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (सीईसीआरआय), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आदी संस्थांनी मिळून हरित फटाक्यांची संकल्पना मांडली होती. या सर्व संस्थांनी त्यावर काम केले होते. हरित फटाके हानिकारक घटकांचे कमी उत्सर्जन करतात, तसेच फोडल्यानंतर या फटाक्यांतून पाण्याची वाफ बाहेर पडते यामुळे हवेत निर्माण झालेली धूळ परत जमिनीवर येण्यास मदत होते.

हेही वाचा : भूतानने आसामच्या बंडखोर गटांविरुद्ध सुरू केलेले ऑपरेशन ‘ऑल क्लीअर नक्की’ काय होते?

हरित फटाक्यांचे तीन प्रकार

हरित फटाक्यांचेही SWAS, SAFAL आणि STAR असे तीन वेगवेगळे प्रकार आहेत. SWAS म्हणजेच सेफ वाटर रिलिजर फटाके. या हरित फटाक्यांत एका ठिकाणी पाणी असते. फटाका जेव्हा फोडला जातो, तेव्हा या पाण्याची वाफ होते. याच पाण्याची वाफ नंतर हवेतील कण, धूर पुन्हा जमिनीवर येण्यास मदत करतात. STAR म्हणजेच सेफ थर्माईट क्रॅकर श्रेणीत मोडणाऱ्या हरित फटाक्यांत पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर नसते. असे फटाके फोडल्यानंतर पर्टिकुलेट मॅटरचे (धुलीचे सूक्ष्म कण) कमी उत्सर्जन होते. तसेच हे फटाके फोडल्यानंतर मोठा आवाज होत नाही. SAFAL म्हणजेच सेफ मिनिमल अॅल्यूमिनिअम श्रेणीतील फटाक्यांत अॅल्यूमिनिअमचा वापर खूप कमी वापर केलेला असतो. किंवा अशा फटाक्यांत अॅल्यूमिनिअमऐवजी मॅग्नेशियमचा वापर केला जातो. हे फटाकेदेखील पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत कमी आवाज करतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why barium firecrackers are ban what is green firecrackers know detail information prd
Show comments