महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) तस्करी करण्यात आलेली तब्बल ३७१ मेट्रिक टन सुपारी जप्त केली आहे. या सुपारीचे एकूण मूल्य ३२ कोटी रुपये आहे. सुपारी तस्करीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या सुपारी तस्करीमागे देशातील मोठ्या टोळ्या कार्यरत आहेत, सुपारी तस्करीची नेमकी कारणे व त्यामागील अर्थचक्र जाणून घेऊया.
सुपारी तस्करीबाबत नुकतीच झालेली कारवाई काय?
जवाहरलाल नेहरू बंदरावर डीआरआयने सुपारीचे १४ कंटेनर पकडले होते. त्यात तपासणीत कॅल्शियम नायट्रेटच्या नावाखाली सुपारी लपवून आणल्याचे उघड झाले. डीआरआयला ४० फुटांच्या १४ कंटेनरमध्ये ३७१ मेट्रिक टन सुपारी सापडली असून तिची किंमत ३२ कोटी रुपये होती. आयात तपशील व बिल ऑफ लँडींगनुसार त्यात कॅल्शियम नायट्रेट असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण तपासणीत कॅल्शियम नायट्रेटऐवजी सुपारी असल्याचे निष्पन्न झाले. मुंबई व परिसरात सुपारी तस्करीप्रकरणी केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
सुपारीची तस्करी का केली जाते ?
सुपारी तस्करीच्या अर्थचक्राबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रातील नागपूर व गुजरातमधील अहमदाबाद ही सुपारी तस्करीची केंद्रस्थाने आहेत. देशात सुपारीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे ती मागणी पूर्ण करण्यासाठी कायदेशीर मार्गाने सुपारीची आयात केल्यास प्रति मेट्रिक टन १० हजार ३७९ अमेरिकन डॉलर्स (सुमारे साडे आठ लाख रुपये) कर आकारण्यात येतो. त्यामुळे सुपारीची खरेदी किंमत दुपटीने वाढते. ही रक्कम वाचवण्यासाठी सुपारीची तस्करी केली जाते. या तस्करीमुळे सरकारचा ११३% पर्यंत कर बुडला आहे. तस्करांना प्रत्येक कंटेनरमागे दोन ते तीन कोटी रुपयांचा निव्वळ फायदा होतो. त्यामुळे देशात सुपारी तस्करी मोठ्या होते.
तस्करीचे मार्ग कोणते?
इंडोनेशिया येथून मोठ्या प्रमाणात सुपारी आडमार्गाने भारतात येते. म्यानमारमार्गे ही सुपारी भारतात आणली जाते. मिझोरमपासून म्यानमारची सीमा जवळ आहे. चंपाई जिल्ह्यात मुख्य तस्करी मार्ग आहे. मणिपूरचे मोरेहदेखील तस्करीसाठी चर्चेत आहे. तेथून त्रिपुरामार्गे सुपारीची तस्करी केली जाते. मे महिन्यात तेथे करण्यात आलेल्या कारवाईत साडेआठशे किलो सुपारी जप्त करण्यात आली होती. सुपारी तस्करीसाठी दुसरा मार्ग म्हणजे सागरी मार्ग. जहाजाद्वारे रायगड जिल्ह्यातील न्हावाशेवा बंदरातही मोठ्या प्रमाणात सुपारीची तस्करी होताना दिसते.
महाराष्ट्र आणि गुजरात…
डीआरआयने २०१७ मध्ये नागपूर येथील गोदामातून १०५ मेट्रिक टन सुपारी जप्त केली होती. त्यावेळी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रहिवासी असलेल्या सय्यद अहमद शेख (४५) यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी इंडोनेशियावरून बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने सुपारीची तस्करी करणारे मोठी टोळी नागपूरमध्ये सक्रिय असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. डीआरआयने नागपूर येथील गोयल नावाच्या एका व्यक्तीच्या गोदामावर छापा टाकून १०५ मेट्रिक टन सुपारी जप्त केली. सप्टेंबर २०१७ मध्ये आरोपींनी पाच ट्रक सुपारी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. या सुपारीची ने-आण करण्यासाठी लागणारी चलने, पावत्या, परवाने आदी गोष्टी आरोपींनी बनावट तयार केल्या होत्या. सध्या देशातील सुपारी तस्करीचे नागपूर व गुजरातमधील अहमदाबाद मोठे केंद्र असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तेथील तस्करांचा देशभरातील टोळ्यांशी संपर्क आहे.
सुपारी तस्करीची उलाढाल किती?
सुपारी तस्करी ही एवढी व्यापक झाली आहे की सीबीआय व ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणाही याबाबत तपास करत आहेत. सुपारीची तस्करी आणि सीमा शुल्काचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने २०२१ मध्ये मुंबई, अहमदाबाद आणि नागपूरमधील १९ ठिकाणी छापे टाकले होते. हे प्रकरण सुमारे १५ हजार कोटींच्या गैरव्यवहाराचे असल्याचा संशय होता. नागपूर, मुंबई आणि अहमदाबाद येथील आयात कंपन्यांचे मालक, भागीदार, कस्टम हाऊसचे दलाल आणि इतरांसह १९ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. याबाबत अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुपारी तस्करी व बेकायदा विक्री याची वार्षिक उलाढाल २० हजार कोटींपेक्षा अधिक आहे. त्यात १० हजार कोटींची निव्वळ नफा असतो.