‘इंटिग्रेटेड कोचिंग’ काय आहे?

राज्यात मुंबई-पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, लातूर अशा शहरांमध्ये नीट, जेईई, एमएचटी-सीईटी अशा प्रवेश परीक्षांची तयारी विद्यार्थी अकरावीपासूनच सुरू करतात. त्यासाठी विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गांना प्रवेश घेतात. काही शिकवणी वर्गांचे कनिष्ठ महाविद्यालयांशी ‘सामंजस्य’ असल्याने विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयातील उपस्थिती परस्पर नोंदवली जाते. विद्यार्थी पूर्ण वेळ शिकवणी वर्गात उपस्थित राहून केवळ विज्ञान प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयात जातात. अशा शिकवणी वर्गांना ‘इंटिग्रेटेड कोचिंग क्लास’ असे म्हटले जाते. त्यामुळे महाविद्यालयातील अध्यापनाकडे विद्यार्थी पाठ फिरवतात. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थिती कमी होत असल्याचे चित्र आहे. शहरी भागात सुरू झालेले इंटिग्रेटेड कोचिंगचे लोण आता ग्रामीण भागातही पसरू लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंद का?

राज्य मंडळाच्या नियमानुसार कनिष्ठ महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. असे असतानाही, विद्यार्थी महाविद्यालयाच्या वर्गाकडे पाठ फिरवून परस्पर शिकवणी वर्गात जातात. मात्र, शिकवणी वर्ग आणि महाविद्यालय यांच्यातील साट्यालोट्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदली जाते. अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी आता कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवण्याची चाचपणी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. बायोमेट्रिक प्रणालीत उपस्थिती नोंदवली जाण्यासाठी विद्यार्थ्याचे फेस रेकग्निशन किंवा बोटांचे ठसे आवश्यक असतात. त्यामुळे विद्यार्थी स्वतः वर्गात उपस्थित असल्याशिवाय बायोमेट्रिक प्रणालीद्वारे त्याची उपस्थिती नोंदवणे शक्य होणार नाही. त्यामुळे उपस्थिती नोंदवली जाण्यासाठी विद्यार्थ्याला स्वतः वर्गात उपस्थित राहावेच लागेल. ही बाब विचारात घेऊन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक प्रणालीने उपस्थिती नोंदवणे बंधनकारक करण्याचा विचार शिक्षण विभागाच्या स्तरावर सुरू आहे.

या पूर्वीही बायोमेट्रिक हजेरी?

राज्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदवण्याचे निर्देश या पूर्वीच देण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयाची अद्याप तितकीशी अंमलबजावणी झालेली नाही. अलीकडेच राज्यातील शाळांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदवली जात असल्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले होते. तसेच विनोद तावडे शिक्षणमंत्री असतानाच्या काळात कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदवण्याबाबत चर्चा झाली होती.

‘इंटिग्रेटेड कोचिंग’ची देशभरातच समस्या?

इंटिग्रेटेड कोचिंगसंदर्भातील एक प्रकरण नुकतेच समोर आले. जेईई मेन्स परीक्षेत दिल्लीतील एक विद्यार्थी गुणवंत ठरल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले. त्यानंतर सीबीएसईने त्या संदर्भात स्पष्टीकरण देणारे परिपत्रक प्रसिद्ध केले. संबंधित विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेची मान्यता सीबीएसईने रद्द केलेली आहे. सीबीएसईच्या दोन सदस्यीय समितीने संबंधित शाळेची तपासणी केली असता शाळेतील अन्य अनियमिततांसह विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे आढळून आले होते. शाळेच्या शैक्षणिक कार्यपद्धतीबाबत चिंता निर्माण झाल्याने संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात आली. शाळेत अनुपस्थित राहणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींनुसार अपेक्षित नाही. केवळ परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी शाळेत अनुपस्थित राहण्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होत असल्याचे सीबीएसईने परिपत्रकात नमूद केले आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे काय?

आपले मूल मागे पडू नये अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी शिकवणी वर्ग लावण्यास महत्त्व निर्माण झाले. कनिष्ठ महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग दोन्ही करताना विद्यार्थ्याला वेळ उरत नाही. त्यातून इंटिग्रेटेड कोचिंगचा प्रकार सुरू झाला. मात्र, आता कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गातील उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत वापरण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. तसेच केंद्र सरकारने सोळा वर्षांपर्यंत कोणतीही शिकवणी न लावण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी देशभरात करावी लागेल. तरच देशभरात समानता येईल, असे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले. बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदवण्याची कल्पना स्वागतार्ह आहे. विद्यार्थ्यांनी शिकवणीसाठी महाविद्यालयातील वर्गाकडे पाठ फिरवणे योग्य नाही. मुळात शिकवणी वर्ग बंधनकारक नाही. त्यातूनही शिकवणी वर्ग आवश्यक वाटत असल्यास तो महाविद्यालयाच्या वेळेव्यतिरिक्तच्या वेळेत करावा, असे स्पष्ट मत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी मांडले.

chinmay.patankar@expressindia.com