B. R. Ambedkar and Blue: राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अलीकडेच पार पडलेल्या संसदीय अधिवेशनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याच्या आरोपाचा निषेध करण्यासाठी निळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. हा निर्णय सहजच घेण्यात आलेला नव्हता. निळा रंग हा दलित चळवळीचे प्रतिनिधित्त्व करणारा रंग आहे. या रंगाचा थेट संबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या राजकारणातील भूमिकेशी आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सूटपासून प्रेरणा
१९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. आपल्या जीवनातील शेवटच्या तीन ते चार दशकांत बाबासाहेब नेहमीच सार्वजनिक जीवनात तिहेरी सूट घालून दिसत. इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या २००२ साली द हिंदू मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये (गुहा यांच्या ऑनलाइन संग्रहातून प्राप्त झाला) म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सूट त्यांनी ज्या भयावह परिस्थितीतून सुटका करून घेतली आणि जी परिस्थिती आजही लाखो दलित बांधवांना सहन करावी लागते त्याचे प्रतीक होता.
अधिक वाचा: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?
“परंपरा आणि इतिहासाच्या नियमांनुसार बाबासाहेबांनी निळा किंवा इतर कोणत्याही रंगाचा सूट घालणे अपेक्षित नव्हते. परंतु त्यांनी सूट घालणे त्यांच्या असामान्य वैयक्तिक यशांचे फलित होते. लिंकन इनमधून कायद्याची पदवी, अमेरिकेतील पीएच.डी., इंग्लंडमधील पीएच.डी आणि भारतीय संविधानाच्या मसुद्याची रचना या सर्व परिश्रम आणि यशाचं द्योतक हा सूट होता. दलित समाजाने बाबासाहेबांचे त्यांच्या सूटच्या माध्यमातून स्मरण ठेवून उच्चवर्णीय गढीवर केलेल्या बाबासाहेबांनी केलेल्या यशस्वी आक्रमणाचा उत्सव साजरा केला,” असे रामचंद्र गुहा यांनी म्हटले आहे.
मानववंशशास्त्रज्ञ एम्मा टारलो यांनी क्लोदिंग मॅटर्स: ड्रेस अँड आयडेंटिटी इन इंडिया (१९९६) या पुस्तकात बाबासाहेबांच्या पेहरावाच्या निवडीची तुलना महात्मा गांधींच्या पेहरावाशी केली आहे. “गांधीजी हे वाणी [बनिया] समाजाचे होते, त्यांनी हरिजन [दलित] समाजाचे प्रतिनिधित्व गरीब माणसासारखा देशी पोशाख परिधान करून केले, तर आंबेडकर हे स्वतः हरिजन समाजातून आले होते, त्यांनी युरोपीय शैलीतील पूर्ण पोशाख परिधान करून दलित समाजाचे प्रतिनिधित्व केले. हरिजन पार्श्वभूमीमुळे आणि सामाजिक पूर्वग्रहांचे पूर्ण ओझे अनुभवले असल्यामुळे त्यांना परंपरेला छेद देण्याची आवश्यकता वाटली. त्यांना गरिबी आणि हलाखीचे प्रतीक असलेल्या देशी भूतकाळाबद्दल कोणताही लोभ नव्हता” असे टारलो यांनी म्हटले आहे. आज बाबासाहेबांचे स्मरण प्रामुख्याने निळ्या सूटमध्ये केले जाते. दलित समाजातील जागृती आणि प्रतिकाराचे प्रतीक म्हणून निळा रंग स्वीकारण्यामागील हे मुख्य कारणांपैकी हे एक आहे.
निळ्या रंगाचे महत्त्व
बाबासाहेबांनी केलेली निळ्या सूटची निवड केवळ त्या काळातील पाश्चात्त्य फॅशनच्या दृष्टिकोनातून प्रेरित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी १९१० आणि १९२० च्या दशकांत न्यूयॉर्क आणि लंडन येथे अनेक वर्षे घालवली होती. त्यावेळी निळ्या ब्लेझरने सामान्य नागरी पोशाखांमध्ये लोकप्रियता मिळवली होती (हा रंग आधीपासूनच लष्करी पोशाखांचा एक भाग होता. याच संदर्भात १९ व्या शतकात ‘नेव्ही ब्लू’ हा शब्द रूढ झाला).
परंतु, अनेक आंबेडकरी अभ्यासक निळ्या रंगाचे अस्तित्ववादी पैलू देखील अधोरेखित करतात. निळा रंग आकाशाचे प्रतिनिधित्व करतो, जे समानतेचे प्रतीक आहे, अशीही व्याख्या केली जाते. आकाशाखाली कोणीही वरचढ नाही. सर्वजण समान आहेत, असे Ambedkar’s Philosophy (2024) या पुस्तकाचे लेखक आणि राजकीय तज्ज्ञ व्हॅलेरियन रॉड्रिग्ज यांनी सांगितले. निळ्या रंगला लोककथांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. जगभरात निळा रंग हा संघर्षाचे प्रतीक मानला जातो. विषम, श्रेणीबद्ध जगात समानतेसाठीचा संघर्ष निळ्या रंगाने अधोरेखित केला जातो असे व्हॅलेरियन रॉड्रिग्ज यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
काही अभ्यासक निळ्या रंगाचा संबंध बौद्ध धर्माशीही जोडतात. बौद्ध धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला होता. बौद्ध ध्वजामध्ये निळा रंग प्रामुख्याने दिसतो आणि तो सर्व प्राण्यांप्रती वैश्विक करुणेचे प्रतीक मानला जातो. दक्षिण आशियाई परंपरेत बुद्ध आणि इतर बौद्ध व्यक्तींचे चित्रण अनेकदा निळ्या रंगात केले जाते. यामुळेच कदाचित बाबासाहेबांनी १९४२ साली अनुसूचित जाती महासंघाच्या (SCF) ध्वजासाठी निळ्या रंगाची निवड केली असावी. अनेक आंबेडकरी अभ्यासक दलित परिप्रेक्ष्यातील निळ्या रंगाच्या महत्त्वाचा उगम याच निर्णयाशी जोडतात.
कामगार वर्गाचा रंग
निळा रंग कामगार वर्गाचा विशेषतः शारीरिक श्रम करणाऱ्या कामगारांचा (तथाकथित ‘ब्लू-कॉलर वर्कर्स’) रंग मानला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि राजकारण विशेषतः समाजाच्या याच घटकाला उद्देशून होते. “औद्योगिक कामगार वर्ग किंवा शोषित वर्ग आणि भांडवलदार यांच्यातील भेद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कार्यातून उलगडून दाखवला आहे” असे रॉड्रिग्ज यांनी नमूद केले.
स्वतंत्र दलित अजेंडा
पूर्वीच्या दलित चळवळींमध्ये निळ्या रंगाचा वापर नेहमी केला गेला असे नाही. उदाहरणार्थ, १९२०-३० च्या दशकात पंजाबमध्ये जोर धरलेल्या आद-Ad धर्म चळवळीचा संबंध गडद लाल रंगाशी होता. तसेच समाजसुधारक ज्योतीराव फुले यांचे नाव त्यांच्या प्रसिद्ध पगडीमुळे लाल रंगाशी जोडले जाते.
अधिक वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी नागपूरचीच निवड का केली होती?
मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी असा रंग निवडणे महत्त्वाचे होते की ज्या रंगाचा इतर कोणत्याही स्पष्ट राजकीय विचारसरणीशी संबंध नसणे आवश्यक होते. त्यांनी SCF च्या ध्वजासाठी निळा रंग निवडला, हा रंग स्वायत्त दलित राजकीय अजेंड्याचे प्रतीक होता. “आंबेडकरांनी कम्युनिस्ट (लाल), हिंदू (भगवा), आणि मुस्लिम (हिरवा) यांच्याशी भिन्नता दाखवण्यासाठी निळ्या रंगाची निवड केली… निळा रंग आंबेडकर आणि दलितांच्या दृष्टिकोनातून देशाने कोणत्या दिशेने जावे त्याचे विशिष्ट दर्शन घडवतो,” असे रॉड्रिग्ज यांनी सांगितले. आजच्या काळातील दलित परिप्रेक्ष्यात निळ्या रंगाचे वर्चस्व “आंबेडकरांशी असलेल्या संबंधांचे द्योतक आहे. हे वेळेबरोबर अधिक मजबूत झाले आहे,” असे रॉड्रिग्ज यांनी नमूद केले. उदाहरणार्थ, कांशीराम यांनी त्यांच्या बहुजन समाज पक्षाच्या रंग आणि प्रतीकांच्या निवडीसाठी प्रजासत्ताक पक्षाकडून (SCF चा स्वातंत्र्यानंतरचा उत्तराधिकारी) प्रेरणा घेतली. रॉड्रिग्ज यांच्या मते, “निळ्या रंगाने दलितांमध्ये एकत्रित मजबूत बंध निर्माण केला.”