– सुनील कांबळी
ब्रिटनचे राजघराणे हा जगभर कुतूहलाचा विषय. या घराण्याला वादळी वाद नवे नाहीत. राजपुत्र हॅरीच्या आत्मचरित्रातील गौप्यस्फोटांनी त्यात नवी भर टाकली आहे. त्याच्या प्रकाशनापूर्वीच माध्यमांत प्रसारित झालेले त्यातले दावे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
ज्येष्ठ बंधू, राजपुत्र विल्यमने मारहाण का केली?
राजपुत्र हॅरी आणि अमेरिकी अभिनेत्री मेघन मर्केल यांच्या विवाहावरून राजघराण्यातील वाद काही वर्षांपूर्वीच उघड झाला होता. आता हॅरीने त्यावर अधिक भाष्य केले आहे. ‘‘मेघनवरून वाद झाला तेव्हा विल्यमने माझी काॅलर पकडून ढकलले आणि खाली पाडले. मी क्षणभर तसाच पडून होतो’’, अशी आठवण नोंदवत प्रिन्सने विल्यमबरोबरच्या वादाचा प्रसंग कथन केला आहे. ‘‘मुलांनो, माझ्या आयुष्याची संध्याकाळ खराब करू नका’’, असा सल्ला ब्रिटनचे विद्यमान राजे चार्ल्स यांनी एका बैठकीत देऊन त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ‘‘मी तुझा खरा बाप आहे का कुणास ठाऊक’’, असा जिव्हारी लागणारा विनोद करून चार्ल्स हसायचे, असाही उल्लेख या पुस्तकात आहे.
अर्थात, चार्ल्स यांची पहिली पत्नी डायना आणि मेजर जेम्स ह्युइट यांच्यातील प्रेमसंबंधाच्या चर्चेचा त्यास संदर्भ होता. राजघराण्याकडून सापत्नभावाची वागणूक मिळाल्याचे अनेक दाखले हॅरीने दिले आहेत. त्यामुळेच हॅरीने पत्नी मेघन मर्केलसह राजघराण्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. पुस्तकाचे शीर्षक ‘स्पेअर’ (जास्तीचा, राखून ठेवलेला) हे दुजाभावाच्या अनुभवावरच आधारलेले आहे.
मेघन आणि केट मिडलटन यांच्यातील वाद काय?
हॅरीबरोबरच्या विवाहापूर्वी मेघनचा केट मिडलटन हिच्याशी वाद झाला होता, हे याआधी ओप्रा विन्फ्रे यांनी घेतलेल्या या जोडप्याच्या मुलाखतीतून उघड झाले होते. प्रिन्स हॅरीने पुस्तकात याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. हॅरी आणि मेघनच्या विवाहासाठीच्या प्रिन्सेस शार्लोटच्या कपड्यांवरून हा वाद झाला. ‘‘हे कपडे तिच्या मापाचे नाहीत, ते पुन्हा नीट शिवून घ्यावे लागतील’’, असा संदेश केटने मेघनला धाडला. त्यावर केटला उद्देशून ‘बालबुद्धी’ असा शब्दप्रयोग मेघनने केला. असे शब्दप्रयोग करण्याइतपत आपले घनिष्ठ संबंध निर्माण झालेले नाहीत, अशा शब्दांत केटने तिला फटकारले. त्यामुळे दुखावलेली मेघन हुंदके देत रडत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी केट पुष्पगुच्छ घेऊन घरी आली आणि मेघनची माफी मागितली’’ अशी आठवण हॅरीने नोंदवली आहे.
राजे चार्ल्स यांच्या दुसऱ्या विवाहाबाबत वाद काय?
चार्ल्स यांचा १९९६मध्ये डायना यांच्याशी काडीमोड झाला. त्यानंतर चार्ल्स यांनी कॅमिला पार्कर यांच्याशी दुसरा विवाह केला. त्यास विल्यम आणि हॅरी यांचा विरोध होता. विवाहाआधी या दोघांनी कॅमिला यांच्याशी स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या. ‘‘आपली सावत्र आई आपल्याशी क्रूरपणे वागेल, अशी भीती होती. मात्र, कॅमिला या चार्ल्स यांना आनंदात ठेवणार असतील तिला स्वीकारण्याची तयारीही दर्शवली होती’’, असा उल्लेख या पुस्तकात असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. मात्र, या बैठका कधी झाल्या, हे स्पष्ट झालेले नाही. अखेर २००५ मध्ये चार्ल्स यांनी कॅमिला पार्कर यांच्याशी विवाह केला. चार्ल्स यांचा लेडी डायना यांच्याशी काडीमोड आणि पार्कर यांच्याशी दुसरा विवाह या घटना ब्रिटिश राजघराण्यात वादळी ठरल्या.
डायनाबाबत काय म्हटलेय?
‘‘डायनाचा कार अपघातात मृत्यू झाल्याचे चार्ल्स यांनी कळवले. त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. ती खूप नाराज होती, छळाला सामोरे जात होती. त्यामुळे या साऱ्यापासून मुक्त होण्यासाठी तिने अपघाताचा बनाव रचला असावा आणि ती कुठेतरी दूर राहत असावी, असे वाटले होते’’, असे नमूद करत हॅरीने अंत्यसंस्काराच्या प्रसंगाचा उल्लेख केला आहे.
‘‘आईच्या मृत्यूवेळी भावना व्यक्त करू शकलो नव्हतो. अंत्यसंस्कारावेळी प्रत्येक जण आमच्याशी हात मिळवत होते. जणू काही प्रत्येकजण माझ्या आईच्या परिचयाचा होता. त्यातील बहुतेकांचे हात ओलसर का होते, ते चटकन लक्षात आले नाही. ते अश्रूंमुळे ओलसर होते, हे नंतर लक्षात आले. मात्र, मला अंत्यसंस्कारावेळी एकदाच रडू कोसळले’’ याचे स्मरणही त्याने केले. डायनाचा १९९७ मध्ये पॅरिसच्या एका बोगद्यात कार अपघातात मृत्यू झाला. दहा वर्षांनी म्हणजे २००७मध्ये पॅरिस दौऱ्यावर असताना आपल्या आईचा शेवट घडविणाऱ्या या बोगद्यातून प्रवास करून तिच्या आठवणी जागवल्याचे हॅरीने म्हटले आहे.
तालिबानबाबतचा दावा आणि त्यावरील प्रतिक्रिया काय?
प्रिन्स हॅरी दहा वर्षे ब्रिटिश लष्करात सेवेत होता. या सेवेदरम्यान अफगाणिस्तानात २५ तालिबान्यांना ठार केल्याचा प्रिन्स हॅरीचा दावा वादग्रस्त ठरला आहे. हॅरी यांनी युद्धगुन्हा केला आहे, असा आरोप अफगाणिस्तान सरकारने केला. दुसरीकडे, हॅरीने दावा केलेल्या २५ मृतांच्या संख्येवरच ब्रिटनमधील अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अफगाणिस्तानमधील ब्रिटिश लष्कराचे माजी कमांडर निवृत्त कर्नल रिचर्ड केम्प यांनी हॅरीच्या दाव्यामुळे त्याच्या सुरक्षेला धोका असल्याची भीती व्यक्त केली. तालिबानला पाठबळ देणारे अतिरेकी हॅरीच्या मागावर असतील, असे केम्प यांनी म्हटले आहे. हॅरीचे राजघराण्यासाठी असलेले सुरक्षा कवच २०२० मध्येच काढून घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या सुरक्षेचा धोका अधोरेखित होतो.
खासगी आयुष्याबाबत आणखी गौप्यस्फोट काय?
हॅरीने आपल्या अनेक खासगी गोष्टी पुस्तकातून उघड केल्या आहेत. वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी शरीरसंबंध ठेवून १७व्या वर्षी कौमार्यभंग केल्याचा उल्लेख त्यात प्रामुख्याने आहे. तणावातून मुक्त होण्यासाठी आपण मद्यपान करीत होतो. किशोरवयातच अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचा खुलासाही त्याने केला आहे.
हेही वाचा : विश्लेषण : शिवाजीमहाराजांच्या तलवारीचा इतिहास काय? ती इंग्लंडच्या राजाला कोणी आणि का दिली? वाचा…
राजघराण्याचे मौन?
प्रिन्स हॅरीच्या गौप्यस्फोटांबाबत ब्रिटनच्या राजघराण्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. या गौप्यस्फोटांमुळे राजे चार्ल्स आणि डायना यांच्या नव्वदच्या दशकातील काडीमोडानंतरच्या सर्वांत मोठ्या वादळाला राजघराणे सामोरे जात आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे चार महिन्यांपूर्वी झालेले निर्वाण, त्यांच्या जागी राजेपदी विराजमान झालेले चार्ल्स तृतीय स्थिरावत नाहीत तोच हॅरीने खळबळजनक दावे केल्याने राजघराण्याला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. ‘स्पेअर’चे प्रकाशन १० जानेवारीला होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध वाहिन्यांवर हॅरीच्या मुलाखतींचा धडाका सुरू आहे. राजघराण्याची गुपिते उलघडणाऱ्या या पुस्तकाच्या अधिकृत प्रकाशनानंतर तरी राजघराणे काही भाष्य करते का, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.