लष्कराच्या न्यायालयाने जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यातील अमशीपोरा येथे २०२० मध्ये झालेल्या खोट्या चकमकीत तीन स्थानिक तरुणांची हत्या केल्याबद्दल कॅप्टन भूपेंद्र सिंह ऊर्फ मेजर बशीर खान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर पुन्हा एकदा कॅप्टन भूपेंद्र सिंह चर्चेत आलेले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सेवा देत असताना कॅप्टन भूपेंद्र सिंह यांची स्थानिक लोकांमधली ओळख मेजर बशीर खान या नावाने होती. आपल्याला याबद्दल आश्चर्य वाटू शकते. पण सैन्यातील उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संवेदनशील भागात काम करत असताना अनेक अधिकारी आपली खरी ओळख लपवून त्या भागात ओळख उपनावाने वावरत असतात. जम्मू-काश्मीर देखील त्याला अपवाद नाही.
सैन्यांमधील अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे स्थानिक ओळख धारण करणे, ही सैन्यातली प्रचलित पद्धत नसली तरी सैन्यासाठी अशी क्लृप्ती वर्ज्य नाही. आपली खरी ओळख लपविण्याचा हेतू असा की, प्रतिकूल वातावरण आणि युद्ध क्षेत्रात अधिक सुरक्षितपणे काम करण्याचे स्वातंत्र्य अशा अधिकाऱ्यांना मिळू शकते, अशी माहिती सैन्यातील अधिकारी देतात. जम्मू-काश्मीरमध्ये १९९० दशकात जेव्हा दहशतवाद अधिक उफाळून आला, तेव्हापासून सैन्यातील अधिकारी अशा प्रकारे आपली खरी ओळख लपवून दुसऱ्या नावाने वावरण्यास सुरुवात झाली.
हे वाचा >> विश्लेषण : लष्करात दोषींना शिक्षा कशी ठोठावली जाते? चौकशी कशी होते? जाणून घ्या
बदललेले नाव किंवा ओळख एखाद्या गुप्त अभियानात सैन्यासाठी फायदेशीर ठरते. अशावेळी स्थानिक लोकांमध्ये मिसळून त्यांचा विश्वास संपादन करता येतो. तसेच या नावाचा वापर रेडिओवर माहितीचे आदानप्रदान करत असताना कोड म्हणूनही वापरला जातो. गुप्त मोहिमेवर असलेले किंवा बंडखोरांविरोधात कारवाई करत असताना अनेकवेळेला सैनिक स्थानिक लोकांसारखे दिसण्याचा वागण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते स्थानिक पद्धतीचा पेहराव घालणे, दाढी वाढवणे यासारखे प्रयोग देखील करतात.
सैन्याचे अधिकारी सांगतात की, जम्मू-काश्मीरमध्ये अनेक सैनिक हे दाढी राखतात. तिथल्या लोकांमध्ये जाऊन मिसळतात. त्यांच्याप्रमाणे पेहराव ठेवतात आणि भाषा बोलतात. खोटे नाव धारण करणे अनधिकृत असले तरी सैन्याच्या तुकडीपर्यंतच ती ओळख असते. एखादे उपनाव धारण करत असताना मूळ नावाच्या आद्याक्षरावरूनच ते ठरवले जाते. उदाहरणार्थ कॅप्टन भूपेंद्र सिंह यांना मेजर बशीर खान हे नाव देण्यात आले होते. भूपेंद्र या नावातला पहिला इंग्रजी आद्याक्षर ‘बी’ आणि सिंह आडनावातला पहिला आद्याक्षर ‘एस’ घेऊन बशीर खान नाव तयार करण्यात आले.
भूपेंद्र सिंह ऊर्फ बशीर खान यांचे कोर्ट मार्शल का झाले?
जुलै २०२० मध्ये जम्मूमधील राजौरी जिल्ह्याचे रहिवासी असलेले इम्तियाझ अहमद, अब्रार अहमद व मोहम्मद इब्रार हे तिघे १८ जुलै २०२० रोजी शोपियाँ जिल्ह्यातील एका दुर्गम पहाडी खेड्यात भूपेंद्र सिंह यांनी केलेल्या चकमकीत मारले गेले. सुरुवातीला ते दहशतवादी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणाबाबत शंका व्यक्त करण्यात आल्या. त्यानंतर लष्कराने कोर्ट ऑफ एन्क्वायरीची स्थापन केली. यात कॅप्टन भूपेंद्र सिंह यांनी ‘आफस्पा’ कायद्याद्वारे मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे आढळले. जम्मू-काश्मीर पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. या पथकानेही लष्करातील संबंधित अधिकाऱ्यांनी खोटी चकमक घडवून आणल्याचे निरीक्षण नोंदवले होते आणि कॅप्टन सिंह यांच्यासह तिघांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. तसेच कोर्ट ऑफ एन्क्वायरीने सिंह यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची शिफारस केल्यानंतर लष्कराने त्यांचे कोर्ट मार्शल केले.