केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सर्पदंश हा एक अधिसूचित आजार घोषित करण्याचे आवाहन केले आहे. हा आजार खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही रुग्णालयांनी कायदेशीररीत्या सरकारला कळवणे आवश्यक आहे. सर्पदंश हे देशातील सार्वजनिक आरोग्याचे मोठे आव्हान आहे. दरवर्षी सर्पदंशाची सुमारे तीन ते चार दशलक्ष प्रकरणे नोंदवली जातात आणि अंदाजे ५८,००० लोक दरवर्षी आपले प्राण गमावतात, असे २०२० च्या ‘इंडियन मिलियन डेथ स्टडी’मध्ये नमूद करण्यात आले आहे. हा भारतातील अकाली मृत्यूची कारणे तपासणारा एक मोठा अभ्यास आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणारे मृत्यू निम्मे करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कृती आराखडा (National Action Plan for Prevention and Control of Snakebite Envenoming) लाँच केला होता. ‘NAPSE’ने शिफारस केली होती की, सर्पदंश हा एकअधिसूचित आजार असावा. त्यामागची कारणे काय? अधिसूचित आजार म्हणजे नक्की काय? केंद्राकडून ही मागणी का होत आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
कोणत्या प्रकारचे आजार अधिसूचित मानले जातात?
सामान्यतः ज्या संसर्गामुळे उद्रेक होण्याची शक्यता असते, त्यामुळे मृत्यू होतो आणि ज्यांची सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करण्यासाठी त्वरित तपासणी करणे आवश्यक असते, त्या आजारांना अधिसूचित आजार म्हणून घोषित केले जाते. अधिसूचनायोग्य रोगांची यादी राज्यानुसार वेगळी असली तरीअधिसूचना आणण्यासाठी राज्य सरकारे जबाबदार आहेत. त्यापैकी बहुतेक राज्ये क्षयरोग, एचआयव्ही, कॉलरा, मलेरिया, डेंग्यू व हेपेटायटिस यांसारख्या संसर्गजन्य आजारांना ‘अधिसूचित आजार’ मानतात.
सर्पदंश हा आजार का मानला जातो?
सर्पदंशामुळे तीव्र वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते; ज्यासाठी त्वरित उपाय करणे आवश्यक असते. सर्पदंशामुळे श्वास रोखला जाऊ शकतो, घातक रक्तस्राव होऊ शकतो आणि वेगवेगळ्या उतींचे नुकसान होऊ शकते. मृत्यू आणि गंभीर लक्षणे टाळण्यासाठी सर्पदंशांवर अँटीवेनॉम्सने उपचार करणे आवश्यक आहे.
कोणत्या सापाचा दंश प्राणघातक ठरू शकतो?
भारतात सापांच्या ३१० हून अधिक प्रजाती आहेत. त्यापैकी ६६ विषारी आणि ४२ सौम्य विषारी आहेत. २३ सापांच्या प्रजाती वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण- त्यांच्या विषाने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. परंतु, देशातील जवळपास ९० टक्के सर्पदंश हे ‘बिग फोर’ म्हणजेच भारतीय कोब्रा, कॉमन क्रेट, रसेल वायपर व सॉ-स्केल्ड वायपरमुळे होतात. व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध पॉलीव्हॅलेंट अँटीवेनममध्ये चारही प्रजातींचे विष असते आणि ८० टक्के सर्पदंशांवर ते प्रभावी असते.
केंद्र का करतेय सर्पदंशाला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी?
सर्पदंशांना अधिसूचित आजार घोषित केल्याने सर्पदंशांकडे योग्य रीतीने लक्ष दिले जाणे अपेक्षित आहे आणि त्यामुळे संपूर्ण भारतातील सर्पदंश प्रकरणे आणि मृत्यूंची अचूक संख्या निर्धारित करण्यास मदत होईल. त्यानंतर सरकार या माहितीचा उपयोग सर्पदंशाच्या प्रकरणांचे प्रभावी व्यवस्थापन, प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी करू शकते. त्यायोगे विविध प्रदेशांना पुरेशा प्रमाणात सर्पविष प्रतिबंधक औषधाचे डोस पुरवले जाऊ शकतात आणि ज्या भागात वारंवार सर्पदंश होतात, तेथे योग्य प्रशिक्षण दिले जाऊ शकते.
सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी लिहिले, “सर्पदंशावर पाळत ठेवण्यासाठी सर्व सर्पदंश प्रकरणे आणि मृत्यूची अनिवार्य सूचना आवश्यक आहे. त्यामुळे उच्च जोखमीचे क्षेत्र, सर्पदंशाने बळी पडलेल्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार घटक इत्यादींची पाहणी करण्यास मदत मिळेल आणि त्यामुळे वैद्यकीय व्यवस्थापनात सुधारणा होईल.” NAPSE च्या म्हणण्यानुसार, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान व गुजरात या राज्यांसह सर्वाधिक सर्पदंश दाट लोकवस्ती, कमी उंचीच्या कृषी क्षेत्रामध्ये होतात.
सर्पदंशावर उपचार करताना येणारी आव्हाने
सर्पदंशावर उपचार करताना प्रामुख्याने तीन आव्हाने येतात. ती खालीलप्रमाणे :
उपचार : सर्पदंश झालेल्या व्यक्ती एक तर वेळेवर आरोग्य केंद्रात पोहोचत नाहीत किंवा आरोग्य केंद्रात जाणेच टाळतात. बरेच लोक त्याऐवजी अंधश्रद्धेपोटी इतर उपचारांचे मार्ग अवलंबतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये आरोग्य केंद्रातील कर्मचारी सर्पदंशावर उपचार करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित नसतात. अनेक ठिकाणी सर्पदंशाची पुष्टी करण्यासाठी चाचण्यादेखील उपलब्ध नसतात. अशा या कारणांमुळेच बहुधा सर्पदंशाला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढते.
अँटीवेनम्स : देशात सर्पविष प्रतिबंधक औषधाचा डोस विकसित करण्यासाठी वापरले जाणारे जवळजवळ सर्व विष हे तमिळनाडू, कर्नाटक व केरळ राज्यांमध्ये राहणाऱ्या इरुला जमातीने पकडलेल्या सापांपासून मिळते. हे एक मोठे आव्हान आहे. कारण- जैवरासायनिक घटक आणि त्याच सापांच्या विषाचा प्रभाव भूगोलानुसार भिन्न असू शकतो. इंडियन जर्नल ऑफ मेडिकलमध्ये प्रकाशित २०२० च्या संशोधन अहवालानुसार, “या फरकांमुळे देशातील विशिष्ट भौगोलिक स्थानावरील विषाच्या नमुन्यांविरुद्ध व्यावसायिक एएसव्ही (अँटी-स्नेक व्हेनम) तयार केले जाते.”
अभ्यास हेदेखील दर्शवितात की, विषाची क्षमता वयानुसार बदलते. उदाहरणार्थ, २०२४ च्या अभ्यासानुसार, नवजात रसेल वायपरचे विष सस्तन प्राण्यांसाठी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी जास्त विषारी आहे. मुख्य म्हणजे स्थानिक सापांच्या प्रजातीदेखील आहेत, जसे की बॅण्डेड क्रेट, मोनोक्लड कोब्रा व ईशान्येतील ग्रीन पिट वायपर. या सापांच्या दंशावर व्यावसायिकरीत्या उपलब्ध असलेला प्रतिबंधक औषधाचा डोस उपयुक्त ठरत नाही. या मर्यादांमुळे संशोधक आता कृत्रिमरीत्या तयार केलेल्या अँटीबॉडीज विकसित करीत आहेत, जे विविध सापांच्या प्रजातींमधील विष निष्प्रभ करण्यात मदत करू शकतात. ते विषाशी लढण्यासाठी कृत्रिमरीत्या तयार केलेल्या पेप्टाइड्सचादेखील विचार करीत आहेत.
हेही वाचा : ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
विष संकलन : प्रादेशिक फरक कमी करू शकतील अशा ‘अँटीवेनॉम्स’ विकसित करण्यासाठी देशभरात विभागीय सर्पविष संकलन पेढी / केंद्र स्थापन करण्याची सूचना तज्ज्ञांनी केली आहे. परंतु, वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२, सापांच्या प्रवेशावर मर्यादा घालतो; ज्यामुळे अशा पेढ्या / केंद्रांची स्थापना करणे कठीण होते.