उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेमके कोणत्या मतदारसंघामधून निवडणूक लढवतील. यावरून बरीच राजकीय चर्चा रंगली होती. शिवाय, योगी यंदा अयोध्येमधून निवडणूक लढवतील असंही बोललं जात होतं. मात्र भाजपाने त्यांना गोरखपूरमधून उमेदवारी दिलेली आहे. भाजपाने असा निर्णय का घेतला? यामागे नेमकं काय कारण असू शकतं. हे आता हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहेत.
पक्षाच्या या निर्णयाला अनेक राजकीय पंडितांनी मुख्यमंत्री योगी यांचा वाढता प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न म्हणून देखील पाहिले होते. शिवाय, ब्रँड योगीची तुलना ब्रँड मोदींशी होत असते. अशा परिस्थितीत, अयोध्येसारख्या ठिकाणाहून मुख्यमंत्री योगी यांनी निवडणूक लढवणं हे त्यांना भाजपामध्ये राष्ट्रीय पातळीवर स्थापित करण्यासाठी एक पाऊल ठरेल, असे मानले जात होते. राजकारणात, अंदाज वर्तवणे, भाकीत करणे, विश्लेषण या काही नवीन गोष्टी नाहीत, हे सगळं सुरूच असतं. मात्र शुक्रवारी भाजपाने जेव्हा ९१ उमेदवारांची यादी जाहीर केली, तेव्हा ही गोष्ट एकदम स्पष्ट झाली की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येमधून का लढणार नाहीत आणि का त्यांना त्यांच्या पारंपारिक मतदारसंघ असलेल्या गोरखपूरमधूनच उमेदवारी दिली गेली आहे.
गोरखपूरमधून मुख्यमंत्री योगी यांना उमेदवारी देण्याची दोन महत्त्वाची कारणे समोर आली आहेत. पहिले म्हणजे, गोरखपूर भागात सत्ताविरोधी लाट आणि दुसरे कारण म्हणजे अवध भागात भाजपाला आघाडी मिळण्याची दाट शक्यता.
दोन्ही कारणांचा तपशीलवार विचार करूया –
गोरखपूर भागात भाजपा पिछाडीवर असल्याचे दिसते. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात मुख्यमंत्री योगींच्या या भागात सत्ताविरोधी लाट नक्कीच दिसून येत आहे. याचा पुरावा शुक्रवारच्या यादीत दिसून आला आहे. ९१ उमेदवारांच्या या यादीत सुमारे २० विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. या २० पैकी ११ तर एकट्या गोरखपूर भागातीलच आहेत. इतकंच नाही तर २०१७ च्या लाटेत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागलेल्या जागांवर चार उमेदवारही बदलण्यात आले आहेत.
गोरखपूर भागातील सत्ताविरोधी लाटेचे आणखी काही पुरावे आकडेवरूनही सापडतात. गोरखपूर विभागातील ६२ पैकी ३७ जागांवर भाजपाने आतापर्यंत उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी ४३ टक्के नवे चेहरे आहेत. भाजपाने आतापर्यंत जाहीर केलेल्या २९५ उमेदवारांच्या यादीत एकूण ५६ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे, त्यापैकी ११ तर एकट्या मुख्यमंत्री योगींच्या बालेकिल्ल्यातील आहेत. याशिवाय कुशीनगरसह पूर्वांचलमधील इतर अनेक भागात विद्यमान आमदारांची तिकिटेही कापण्यात आली आहेत.
गोरखपूर आणि पूर्वांचलमध्ये आता केवळ मुख्यमंत्री योगींचाच चेहरा –
आता भाजपाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्याची काय गरज होती? विद्यमान आमदारांविरोधात जनतेत नाराजी असल्याचे पहिले कारण स्पष्ट झाले आहे. दुसरे, वय देखील एक घटक म्हणून मानले जात आहे. जुन्या आमदारांऐवजी नव्या चेहऱ्यांवर पक्षाला निवडणूक लढवायची असल्याचे दिसत आहे. मात्र, कारण काहीही असो, पण एकंदरीत मुद्दा असा आहे की, मुख्यमंत्री योगींचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोरखपूर आणि पूर्वांचलमध्ये आता केवळ मुख्यमंत्री योगींचाच चेहरा यश मिळवून देऊ शकतो. अशा परिस्थितीत पक्षाने गोरखपूरमधून मुख्यमंत्री योगी यांना हटवून अयोध्यतून लढवण्याचा निर्णय घेतला असता, तर निश्चतपणे जेवढ्या जागांचा फायदा अयोध्येत झाला असता, त्यापेक्षा जास्त नुकसान गोरखपूर आणि पूर्वांचलमध्ये पक्षाचे झाले असते. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात ही बाब नक्कीच समोर आली असावी.
…तर गोरखपूर भागात भाजपाचे नुकसान हे निश्चितच होते –
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे तर पूर्वांचलमध्ये भाजपला ६९ जागा मिळाल्या होत्या, तर टाइम्स नाऊ नवभारतच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, २०२२ मध्ये भाजपा आघाडीला पूर्वांचलमध्ये ४८ ते ५२ जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत भाजपाने मुख्यमंत्री योगींना अयोध्येला पाठवले असते, तर गोरखपूर भागात पक्षाचे नुकसान होणार हे निश्चितच होते.
दुसरीकडे, अवध प्रदेशाबद्दल बोलायचे झाले तर, शुक्रवारी जाहीर झालेल्या यादीत भाजपाने बहुतांश विद्यमान आमदारांवर विश्वास व्यक्त केला आहे. म्हणजेच पक्षाच्या दृष्टीने इथे आमदारांचे रिपोर्ट ठीक आहेत. टाईम्स नाऊ नवभारतच्याच सर्वेक्षणाबाबत बोलायचं झालं तर, अवध भागात भाजपाला ९८ पैकी ६४ जागा मिळण्याची शक्यता आहे. एकप्रकारे हा सर्व्हेही भाजपाच्या मूल्यांकनाला पाठिंबा देणारा दिसतो.