करोना काळानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. चीनमधील नागरिक आपल्या भविष्याविषयी चिंतेत आहेत आणि महागड्या वस्तूंऐवजी स्वस्त वस्तू खरेदी करून पैशांची बचत करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे चीनमधील नागरिकांनी लक्झरी ब्रॅण्ड वापरणेही जणू सोडून दिले आहे. चीन एकेकाळी ह्युगो बॉस, बर्बेरी, डायर व लुई व्हिटॉन यांसारख्या लक्झरी ब्रॅण्डचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जात होते. खरे तर, चीन या लक्झरी ब्रॅण्डची प्रमुख बाजारपेठ होता. परंतु, आर्थिक आव्हानांसह फॅशनचे ट्रेंड बदलत गेल्याने आता ही लक्झरी ब्रॅण्ड बाजारपेठ ठप्प पडल्याचे पाहायला मिळत आहे. चीनमधील लोकांमध्ये या ब्रॅण्डच्या बनावटी वस्तूंचा ट्रेंड दिसून येत आहे. त्याला ‘पिंगटी’ असे नाव देण्यात आले आहे. २०२३ पासून यापैकी काही ब्रॅण्डच्या बनावटी वस्तूंची विक्री गगनाला भिडली आहे. यामागील कारण काय आहे? चीनमध्ये बनावटी वस्तूंची मागणी का वाढली? जाणून घेऊ.
बनावटी वस्तूंच्या मागणीत वाढ
चीनमध्ये Gen Z (१९९५ नंतर जन्मलेली पिढी) खरेदीदारांच्या वाढत्या संख्येमुळे या ब्रॅण्डेड वस्तूंच्या प्रतिकृतींची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. परंतु, बर्याचदा या बनावटी वस्तू स्वस्त दरात विकल्या जात नाहीत. बऱ्याच प्रकरणांमध्ये या वस्तू मूळ वस्तूच्या हुबेहूब असल्यामुळे त्यांची ओळख करणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ- Lululemon या ब्रॅण्डच्या लेगिंगची किंमत त्याच्या अधिकृत चिनी वेबसाइटवर ७५० युआन (१०६ डॉलर्स) आहे. परंतु, जर एखाद्याने चीनमधील ई-कॉमर्स साइट्सवर याचा शोध घेतला, तर अगदी हुबेहूब पर्याय मिळतील; ज्यांची किंमत केवळ ३५.२१ युआन (पाच डॉलर्स) असते आणि त्यात चांगल्या गुणवत्तेचाही दावा केला जातो. त्याचप्रमाणे चामड्याच्या वस्तूंचे उत्पादक सिटॉय ग्रुप होल्डिंग्सने त्यांच्या सोशल मीडियावर दावा केला आहे की, त्यांच्या १०० डॉलर्सच्या हॅण्डबॅगची गुणवत्ता एक हजार डॉलर्सपेक्षा जास्त किमतीत विकल्या गेलेल्या हॅण्डबॅगसारखीच आहे.
हेही वाचा : ताजमहालचं वैभव धोक्यात; भिंतींना तडे, पाण्याची गळती अन् बरंच काही, नुकसानाची व्याप्ती किती?
ब्रॅण्ड्सच्या बनावटी वस्तूंची मागणी इतकी वाढली आहे की, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांचा शोध घेतला जात आहे. मार्केट रिसर्च फर्ममध्ये कार्यरत असणार्या लॉरेल गु यांनी सांगितले की, २०२२ ते २०२४ या काळात सोशल मीडियावर बनावटी वस्तूंच्या शोधाचे प्रमाण तिप्पट झाले आहे. बनावटी वस्तू तयार करणारे बहुतेक ब्रॅण्ड म्हणतात की, बनावटी वस्तू आणि मूळ उत्पादनांमध्ये फारच कमी फरक आहे. उदाहरणार्थ- जपानच्या SK-II ची सर्वांत जास्त विक्री होणारी फेशियल ट्रीटमेंट इसेन्सची एक छोटी बाटली जवळपास १,७०० युआनला विकली जाते. त्याची तुलना चीनच्या पर्यायी ‘Chando’शी केली जाते. त्यांच्या उत्पादनात समान घटकांचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे; ज्याची किंमत केवळ ५६९ युआन आहे.
ग्राहकांच्या वर्तनात बदल
चीनमधील ग्राहकांना लक्झरी वस्तूंच्या जागी बनावटी वस्तू का हव्या आहेत, असा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. तज्ज्ञांच्या मते, चीनच्या आर्थिक मंदीमुळे ग्राहकांच्या वर्तनात बदल झाले आहेत. चीनची अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे वेतनात घट झाली होती; ज्यामुळे अनेकांना खरेदीबाबत पुनर्विचार करणे भाग पडत आहे. दक्षिण-पश्चिम चीनमधील चोंगकिंग येथील शिक्षिका झिनझिन यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, पूर्वी त्या एस्टी लॉडरच्या नाईट रिपेअर सीरमच्या चाहत्या होत्या. परंतु, या वर्षी २० टक्क्यांहून अधिक वेतनकपातीमुळे त्यांना त्याचा पर्याय शोधणे भाग पडले. त्यांना उच्च श्रेणीतील स्किनकेअर उत्पादनापेक्षा १०० युआन कमी किमतीचे समान घटक असलेले फेस सीरम मिळाले. झिनझिन या एकट्या नाहीत, त्यांच्यासारखे हजारो लोक आहेत, जे त्यांच्या यादीतील उच्च श्रेणीच्या लक्झरी वस्तूंचा पर्याय शोधत आहेत. १८ ते २४ वयोगटातील लोकांसाठी देशातील बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये १८.८ टक्क्यांच्या उच्चांकावर होता. बेरोजगारी खूप जास्त असल्याने, लोक लक्झरी वस्तूंबद्दलचे प्रेम सोडून बनावटी वस्तूंची निवड करीत आहेत.
लक्झरी शेमिंग
चीनमधील आर्थिक मंदीमुळे ‘लक्झरी शेमिंग’ची सुद्धा चर्चा होत आहे. ‘लक्झरी शेमिंग’ म्हणजेच लोक आर्थिक मंदीच्या काळात उच्च किमतीच्या वस्तू विकत घेण्यास आणि त्या लोकांना दाखवण्यास संकोच करीत आहेत. त्याविषयीचे मत सर्वांत पहिल्यांदा बेन अॅण्ड कंपनीने त्यांच्या जूनच्या अहवालात नोंदवले होते. बेन अॅण्ड कंपनीने त्यांच्या अहवालात लिहिले की, चीनचे आर्थिक वातावरण मध्यमवर्गीय ग्राहकांचा आत्मविश्वास कमी करीत आहे; ज्यामुळे २००८-०९ च्या आर्थिक संकटादरम्यान अमेरिकेत घडलेल्या प्रकाराप्रमाणेच चीनमध्येही ‘लक्झरी शेमिंग’ दिसून येत आहे. त्याव्यतिरिक्त लोकांची मानसिकताही बदलत आहे. लक्झरी हॅण्डबॅग प्रतिष्ठेचा दर्जा दर्शवू शकते ही पारंपरिक मानसिकता आता बदलत आहे,” असे मिंटेलचे वरिष्ठ लक्झरी व फॅशन विश्लेषक ब्लेअर झांग यांनी ‘ब्लूमबर्ग’ला सांगितले. ते पुढे म्हणाले, “सध्याच्या सुप्रसिद्ध ब्रॅण्ड्सवर लोकांचा आंधळा विश्वास राहिलेला नाही. लोकांमध्ये सावधपणे खर्च करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आहे.”
चीनमधील लक्झरी ब्रॅण्ड मार्केटचा शेवट
करोनाच्या आधी चीनमधील लोक सर्व चैनीच्या वस्तूंना प्राधान्य देत होते. त्यानंतर महामारी आली आणि सर्व काही बदलले. करोना संपल्यापासून लक्झरी खर्चात कमालीची घट झाली आहे. ह्युगो बॉस, बर्बेरी, रिचमोंट, स्वॅच व एलव्हीएचएम यांसारख्या लक्झरी विक्रेत्यांच्या विक्रीत चीनमध्ये घसरण झाली आहे. कारण- ग्राहक या ब्रॅण्ड्सपासून दुरावले आहेत. ब्रिटनच्या फॅशन हाऊस बर्बेरीने विक्रीत मोठी घट नोंदवली आहे. स्वॅचने आपल्या आर्थिक प्रकाशनात चीनमधील लक्झरी वस्तूंच्या मागणीत तीव्र घट दर्शवली आहे. त्यात असे म्हटले आहे की, ते चिनी पर्यटकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे मार्क जेकब्स, बर्बेरी व व्हर्सास यांसारख्या इतर ब्रॅण्ड्सनीदेखील खरेदीदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मोठ्या सवलती देण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : मस्क यांचा नवीन निर्णय; ‘एक्स’वर एखाद्याला ब्लॉक केल्यानंतरही दिसणार पोस्ट, काय आहेत धोके?
साथीच्या रोगानंतर अनेक संभाव्य खरेदीदार जपानमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी जात असल्याचे आणि जपानच्या कमकुवत चलनाचा फायदा घेत असल्याचेदेखील चित्र आहे. विक्रेत्यांची आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि ग्राहक पुन्हा लक्झरीकडे वळतील का ते पाहावे लागेल. परंतु, हे कधी घडेल ते सांगता येणे कठीण आहे, असे विक्रेत्यांचे सांगणे आहे. ४५ वर्षीय जेसिका वांगने ‘ब्लूमबर्ग’ला हर्मीस या ब्रॅण्डची बनावटी बॅग खरेदी करताना सांगितले, “हे माझ्यासाठी अपेक्षेपलीकडे होते. याचे चामडे खूप मऊ असून, शिलाईही नजाकतीने केलेली आहे आणि पॅकेजिंगदेखील व्यवस्थित आहे. मी त्या दुकानातून इतर पिशव्याही मागवणार आहे.”