रविवारी कराची विमानतळाजवळ एक स्फोट झाला. हा स्फोट आत्मघातकी बॉम्बरने घडवून आणला आणि यात लक्ष्य करण्यात आलेल्या ताफ्यातील दोन चिनी नागरिकांचा मृत्यू झाला. या ताफ्याला सुरक्षा देणारे पाकिस्तानी पोलीस अधिकारीही या हल्ल्यात जखमी झाले. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानने शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ)ची बैठक आयोजित करण्याच्या एक आठवड्यापूर्वी हा बॉम्बस्फोट झाला आहे. त्या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर उपस्थित राहणार आहेत. बलुच अतिरेक्यांनी चिनी नागरिकांना किंवा पाकिस्तानमधील चीनच्या अनुदानित प्रकल्पांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. बलुच लिबरेशन आर्मीसारख्या संघटना पाकिस्तानमधील चिनी प्रकल्पावर आणि नागरिकांवर हल्ले का करीत आहेत? ते जाणून घेऊ.
हल्ल्यावर चीनची प्रतिक्रिया काय?
रविवारी ज्या ताफ्यावर हल्ला झाला, तो ताफा पोर्ट कासिम इलेक्ट्रिक पॉवर या कंपनीचा होता. पोर्ट कासिम प्रकल्पांतर्गत कराचीजवळ दोन कोळसा ऊर्जा प्रकल्प बांधण्यात येत आहेत; त्यापैकी एक प्रकल्प कार्यरत आहे. हा प्रकल्प ४६ अब्ज डॉलर्सच्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाचा (CPEC) भाग आहे. चिनी दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे, “पाकिस्तानमधील चिनी दूतावास या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. दोन्ही देशांतील निष्पाप बळींप्रति शोक व्यक्त करतो आणि जखमी व मृतांच्या कुटुंबीयांना मनापासून सहानुभूती व्यक्त करतो.” तसेच पाकिस्तानने या हल्ल्याची सखोल चौकशी करून, गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी आणि चिनी नागरिक, संस्था व पाकिस्तानमधील प्रकल्प यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही केले आहे. तसेच पाकिस्तानमधील चिनी नागरिकांना दक्ष राहण्यास आणि लक्ष देण्यास सांगितले आहे. सुरक्षा परिस्थितीसाठी, सुरक्षा उपाय मजबूत करा आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे.
हेही वाचा : भारतविरोधी भूमिका घेणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारत दौर्यावर; या दौर्यामागील त्यांचा उद्देश काय?
पाकिस्तानमध्ये चीनशी संबंधित प्रकल्पांवर हल्ले का होतात?
बलुच लिबरेशन आर्मीने या ताज्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुच लिबरेशन आर्मी हा एक फुटीरतावादी अतिरेकी गट आहे, जो स्वतंत्र बलुचिस्तान, बलुच लोकांसाठी मातृभूमी स्थापन करू इच्छित आहे. बलुचिस्तानची सीमा पाकिस्तानच्या पश्चिमेला अफगाणिस्तान आणि इराणला लागून आहे. गॅस, तेल, तांबे व सोने यांचे साठे असलेल्या पाकिस्तानच्या चार प्रांतांपैकी सर्वांत जास्त संसाधनांनी समृद्ध असे क्षेत्र आहे. बलुचिस्तानमध्ये १९४७ पासून बंडखोरी झाली आहे. त्यानंतरच्या दशकांमध्ये या भागात विकासाचा अभाव राहिला. पाकिस्तानने भारतावर दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आरोपही केला.
चीनशी निगडित प्रकल्पांविरोधातील संतापाचा संबंध पाकिस्तान सरकारच्या विरोधातील मोठ्या असंतोषाशी निगडित आहे. पाकिस्तान सरकारसह चीन बलुचिस्तानच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण करील; पण त्याचा स्थानिकांना काहीही फायदा होणार नाही, अशी त्यांची भावना आहे. चीनशी निगडित प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे अधिक कडक सुरक्षा तपासणी केली जात आहे; ज्यामुळे स्थानिकांचे जीवन कठीण झाले आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये परकीय शक्तींद्वारे समस्या निर्माण केल्या जात आहेत, असा अनेक वर्गांचा दृष्टिकोन आहे. इस्लामाबादस्थित थिंक टँक AIERD चे मुख्य कार्यकारी अधिकारी शकील अहमद रामे यांनी ‘दी इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले, “दहशतवादी परकीय शक्तींचा उद्देश पूर्ण करीत आहेत. दहशतवादी आणि हे गट एकत्र मिळून काम करतात. त्या परकीय शक्ती चीन आणि पाकिस्तान यांच्यात तेढ निर्माण करू इच्छित आहेत.”
हेही वाचा : पर्यावरण बदलामुळे पर्यटकांमध्ये वाढतंय ‘लास्ट चान्स टुरिझम’; कारण काय? काय आहे हा ट्रेंड?
चीन पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक का?
हे प्रकल्प चीनला त्याच्या व्यापार संबंधांना चालना देण्यासाठी आणि मध्य व दक्षिण आशियामध्ये त्यांचा प्रभाव वाढविण्यात मदत करतील. बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर हे या प्रकल्पातील प्रमुख घटकांपैकी एक आहे. बंदरातून अरबी समुद्रात प्रवेश करणे चीनसाठी महत्त्वाचे आहे. कारण- चीनचा सागरी व्यापार मोठ्या प्रमाणावर मलाक्कावर अवलंबून आहे. तर, पाकिस्तानसाठी पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक त्यांच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेकरिता महत्त्वाची आहे.