जगभरात लिथियमची मागणी वेगाने वाढत आहे. अशातच चीन आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लिथियम साठा असलेला देश ठरला आहे. चीनला देशाच्या पश्चिमेला लिथियमचा मोठा साठा सापडल्याने देशातील लिथियमच्या साठ्यात वाढ झाली आहे. चिलीकडे आजही जगातील सर्वाधिक लिथियमचा साठा आहे. मात्र, चीनने लिथियमचा सर्वाधिक साठा असणाऱ्या ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना व बोलिव्हिया या देशांना मागे टाकले आहे. आजच्या काळात लिथियम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे; ज्याचा वापर इलेक्ट्रिक वाहनांपासून सेलफोन संप्रेषण व आण्विक इंधनापर्यंतच्या अनेक उद्योगांमध्ये केला जातो. परंतु, चीनच्या लिथियम साठ्यात वाढ होणे, ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. त्याचे कारण काय? चीनकडे किती लिथियम साठा आहे? त्याचा धोका काय? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चीनला सापडला लिथियमचा साठा

शिन्हुआनुसार, चीनला २,८०० किलोमीटरचा जागतिक दर्जाचा स्पोड्युमिन प्रकारचा लिथियम पट्टा सापडला आहे. सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी डेलीनुसार, स्पोड्युमिन हा एक कठीण खडक आहे, ज्यातून लिथियम काढले जाते. ग्लोबल टाइम्सनुसार, पट्टा पश्चिम कुनलुन-सोंगपान-गंझीपर्यंत पसरलेला आहे. या शोधामध्ये तिबेटमधील झिकुनसाँग-पॅन-गंझी प्रदेशातील खाण आणि किंघाई-तिबेट पठारातील काही लिथियम मीठ तलावांचाही समावेश आहे. या शोधामुळे देशातील लिथियम संसाधनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सर्व जागतिक साठ्याच्या सहा टक्के साठा चीनकडे होता, ज्यात तब्बल १६.५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ग्लोबल टाइम्सनुसार, एका लिथियम बेल्टमध्ये ६.५ दशलक्ष टनांपेक्षा जास्त साठा आहे. संभाव्य साठा ३० दशलक्ष टन इतका मोठा असू शकतो.

शिन्हुआनुसार, चीनला २,८०० किलोमीटरचा जागतिक दर्जाचा स्पोड्युमिन प्रकारचा लिथियम पट्टा सापडला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : डासांच्या निर्मूलनासाठी विषारी वीर्याचा वापर; त्यामुळे जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी कसा होणार?

लिथियम मिठाच्या सरोवरांच्या शोधाचा अर्थ असा आहे की, अर्जेंटिया, बोलिव्हिया, चिली व पश्चिम अमेरिका यांच्यानंतर चीन आता जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मीठ तलाव संसाधनांचे घर आहे. नव्याने शोधलेला हा सॉल्ट लेक लिथियम संसाधनांचा साठा १४ दशलक्ष टनांपेक्षा जास्त असू शकतात. सॉल्ट लेक हा कमी किमतीचा लिथियम स्रोत आहे. ‘एससीएमपी’नुसार, शोध सुचवितो की, क्विंगहाई, सिचुआन व शिनजियांगमध्ये साठे शोधले जाऊ शकतात – सर्व शेजारील प्रदेश ज्यात समान भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये आहेत. ‘चायना डेली’ला चायना जिओलॉजिकल सर्व्हेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ वांग डेंगहॉन्ग यांनी सांगितले आहे की, हे शोध २०२१ मध्ये सुरू झाले. चायना जिओलॉजिकल सर्व्हेला हुनान प्रांत, जिआंगशी आणि इनर मंगोलिया येथे १० दशलक्ष टन लेपिडोलाइट लिथियम धातूचा साठा सापडला आहे. सुमारे १० दशलक्ष टन ब्राइन लिथियम धातू किंघाईमध्ये आणि १० दशलक्ष टन स्पोड्युमिन लिथियम शिनजियांगमध्ये सापडले आहे.

लेपिडोलाइटमधून लिथियम काढण्यात तांत्रिक प्रगती झाल्यामुळे १० दशलक्ष टन नवीन शोधलेली लिथियम संसाधने कमी खर्चात आणि उच्च कार्यक्षमतेने काढली जाऊ शकतात, असे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे. इंडस्ट्री इनसायडर्सनी चायना डेलीला सांगितले की, ईव्ही मार्केटचा विस्तार आणि लिथियमची जागतिक मागणी यांनी चीनच्या औद्योगिक विकासाला मर्यादा घालण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या प्रगतीमुळे चीनमधील लिथियमचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढेल, आयातीवरील त्याचे अवलंबित्व कमी होईल, औद्योगिक साखळीची सुरक्षा सुधारेल, असेही त्यांना नमूद केले. झियामेन युनिव्हर्सिटीच्या ‘चायना सेंटर फॉर एनर्जी इकॉनॉमिक्स रिसर्च’चे संचालक लिन बोकियांग यांनी ‘ग्लोबल टाइम्स’ला सांगितले की, बीजिंगने सॉल्ट लेक आणि लिथियम काढण्याच्या तंत्रज्ञानामध्ये केलेल्या प्रगतीद्वारे हे घबाड मिळविण्यात यश मिळविले आहे.

जगभरात लिथियमची मागणी वेगाने वाढत आहे. अशातच चीन आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लिथियम साठा असलेला देश ठरला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

“लिथियम बॅटरी उद्योगातील चीनची स्पर्धात्मकता त्याच्या संपूर्ण औद्योगिक साखळ्यांमुळे वाढली आहे; ज्यामुळे कमी खर्चात उच्च गुणवत्तेच्या बॅटरीचे उत्पादन करता येते आणि जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मकता सुनिश्चित होते,” असे लिन म्हणाले. “जागतिक बॅटरी उत्पादनाचा एक महत्त्वपूर्ण भाग चीनमध्ये केंद्रित आहे; ज्यामुळे तंत्रज्ञानाच्या प्रगतीला गती मिळते,” असेही त्यांनी पुढे नमूद केले. “बऱ्याच काळापासून देश मोठ्या प्रमाणात आयातीसह परदेशी लिथियम संसाधनांवर जास्त अवलंबून आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे आणि संबंधित उद्योगांचा विकास मर्यादित झाला आहे,” असे वृत्त ‘शिन्हुआ’ने दिले. वृत्तात पुढे सांगण्यात आले की, नवीन शोधांमुळे लिथियम संसाधनांचा पुरवठा वाढवणे आणि जागतिक लिथियम बाजाराच्या विकासास प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे.

भारतासाठी ही धोक्याची घंटा का?

अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनच्या साठ्यात वाढ होणे ही भारतासाठी काळजी करण्यासारखी बाब आहे. २०२३ मध्ये भारताने पहिल्यांदा लिथियमचा मोठा साठा शोधला होता. जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात सुमारे ५.९ दशलक्ष टन लिथियमचे साठे सापडले आहेत. परंतु, साठ्याचे भांडवल करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना अद्याप कोणतेही फळ मिळालेले नाही. नोव्हेंबर २०२३ मध्ये भारताला त्यांच्या पहिल्या लिलावात आवश्यक असणाऱ्या तीनही बोली मिळू शकल्या नाहीत. त्यानंतर १४ मे च्या अंतिम मुदतीसह दुसऱ्या लिलावाचा प्रयत्नदेखील करण्यात आला; मात्र त्यातदेखील कोणत्याही बोली प्राप्त झाल्या नाहीत, असे या प्रकरणाची थेट माहिती असलेल्या स्रोताने सांगितले. माध्यमांशी बोलण्यासाठी अधिकृत नसल्यामुळे ओळख पटवण्यास नकार देत एका स्रोताने सांगितले की, कोणतीही बोली न लागल्यामुळे पुढील शोधासाठी हा ब्लॉक सरकारी यंत्रणेला दिला जाण्याची शक्यता आहे.

अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनच्या साठ्यात वाढ होणे ही भारतासाठी काळजी करण्यासारखी बाब आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : कॉन्सर्टमध्ये जाण्यासाठी ‘युरिन टेस्ट’ करण्याचे आदेश; मलेशियन सरकारच्या या निर्णयामागील कारण काय?

इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लिथियमच्या गरजेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, भारताने परदेशात, तसेच देशांतर्गत मालमत्ता सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनमध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागल्याने चीनचा हात आणखी मजबूत झाला असावा. कारण- चिलीवर चीनचा आधीच मोठा प्रभाव आहे. ‘द डिप्लोमॅट’नुसार, चीनने चिलीमध्ये विशेषत: ऊर्जा क्षेत्रात आधीच मोठी गुंतवणूक केली आहे. चिनी राज्य कंपन्यांनी गेल्या दशकात चीनच्या बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्हअंतर्गत चिलीच्या अनेक ऊर्जा कंपन्यांची खरेदी केली आहे. चिनी कंपन्या आता संपूर्ण क्षेत्राच्या सुमारे दोन-तृतीयांश क्षेत्रावर नियंत्रण ठेवतात. तसेच प्राप्त माहितीनुसार, चीन चिलीकडून करण्यात येणाऱ्या तांब्याच्या संपूर्ण निर्यातीपैकी ७४.१ टक्के आणि लिथियम निर्यातीपैकी ७२ टक्के आयात करतो. महत्त्वाच्या खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील गुंतवणुकीसह या सर्वांमुळे चिलीकडून चीनला मिळणारा आर्थिक फायदा वाढतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why chinas lithium find should ring alarm bells in india rac