ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात कायमच राजकीय आणि सामाजिकदृष्टया संवेदनशील राहिलेल्या ‘हाजीमलंग की श्रीमलंगगड’ या वादाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. या जागेचा उल्लेख हाजीमलंग, मलंगगड, श्रीमलंग, मच्छिंद्रनाथ समाधीस्थळ असा वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येतो. या गडाच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहाच्या शुभारंभाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ‘तुमच्या मनातील भावना पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही’ असे वक्तव्य केले. त्यानंतर विविध स्तरांतून मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याला समर्थन आणि विरोध करणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हा वाद नेमका काय आहे ते पाहू.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमके काय वक्तव्य केले?
ठाणे, रायगड जिल्ह्यातील वारकरी आणि भागवत संप्रदायांतर्फे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने हाजीमलंग डोंगराच्या पायथ्याशी राज्यस्तरीय ‘श्रीमलंगगड अखंड हरिनाम सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगड मुक्ती आंदोलनाच्या विषयाला हात घातला. शिवसेनेचे ठाण्यातील प्रभावशाली नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी काही वर्षांपूर्वी मलंगगडमुक्तीचे आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर, आपण सर्व जण ‘जय मलंग श्रीमलंग’ असे बोलू लागलो त्याचा आनंद आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सोबतच मलंगगडाच्या बाबतीत आपल्या सर्वांच्या भावना मला माहीत आहेत. काही गोष्टी जाहीरपणे सांगू शकत नाही. मात्र आपल्या सर्वांच्या मनात असणारी मलंगगड मुक्तीची भावना पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर हा जुना विषय नव्याने चर्चेत आला आहे.
हेही वाचा : मोफत कायदेशीर मदतीसंदर्भात भारतीय कायदा काय सांगतो? ही मदत कुणाला मिळते? कशी?
मलंगगड, हाजीमलंग, श्रीमलंग की मच्छिंद्रनाथांची समाधी, नेमका हा वाद काय?
ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ तालुक्यात रायगड जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला डोंगर हाजीमलंगचा डोंगर म्हणून ओळखला जातो. हाजीमलंग, मलंगगड, श्रीमलंग आणि मच्छिंद्रनाथांची समाधी अशा वेगवेगळ्या नावांनी या जागेचा उल्लेख केला जातो. मुस्लीम बांधवांच्या मते येथे हाजी अब्दुर्रहमान मलंग साह बाबांची कबर आहे. आठशे वर्षांपासून येथे दर्गा असल्याचा दावा मुस्लीम बांधव करतात. पेशव्यांच्या काळात येथे चादर चढवण्यात आल्याचेही पुरावे दिले जातात. अर्थात हा दावा या भागात कार्यरत राहिलेल्या हिंदू धर्मीयांना मान्य नाही. येथील समितीत हिंदू ब्राह्मण कुटुंबांचा समावेश आहे. येथील ट्रस्टची हिंदू देवतांची मंदिरेही आहेत. तर हिंदू बांधव नाथ पंथातील मच्छिंद्रनाथांची ही समाधी असल्याचा दावा करतात. या समाधीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप हिंदू संघटनांकडून वारंवार केला जातो. असे असले तरी हिंदू आणि मुस्लीम धर्मीयांसोबत इतर धर्मीयही या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात.
हाजीमलंग किंवा मलंगगड हा वाद नेमका कधी उफाळून आला आणि त्यात शिवसेनेची भूमिका काय होती?
हाजीमलंग हा श्रीमलंगगड असून येथे हिंदूंना वहिवाट असावी यासाठी शिवसेनेचे ठाण्यातील नेते आनंद दिघे यांनी १९९० च्या दशकात येथे मलंगगड मुक्तीचे आंदोलन केले. ‘श्रीमलंग, जय मलंग, आईभवानी शक्ती दे, मलंगगडाला मुक्ती दे’ अशा घोषणा देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘चलो श्रीमलंगगड’ या आवाहनाला त्या वेळी शिवसैनिकांनी मोठा प्रतिसाद दिला. ‘हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट’ अशी घोषणाही त्या वेळी गाजली. हिंदू बांधवांकडून येथे मच्छिंद्रनाथांच्या समाधीची पूजा व आरती केली जाऊ लागली. १९९६ वर्षात आनंद दिघे यांनी त्यांच्या आंदोलनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रित केले होते. दिघे यांच्यानंतर शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त झालेले एकनाथ शिंदे यांनीही हा मुद्दा जागवत ठेवला. एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी तेथे जाऊन दर्शन घेत आरती केली. दिघे यांच्या या भूमिकेनंतर त्यांना अंबरनाथ, कल्याण आणि ठाणे जिल्ह्यांत मोठा जनाधार मिळाला. जिल्ह्यात शिवसेनेची प्रतिमा हिंदुत्ववादी संघटना म्हणून समोर आली. दिघे यांच्या ‘धर्मवीर’पर्यंतच्या प्रवासात मलंगमुक्तीचे आंदोलन निर्णायक ठरले. एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीदेखील हा विषय कायम केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका वेळोवेळी घेतल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांची तुलना शिशुपालाबरोबर; कोण होता शिशुपाल? काय आहे त्याच्या १०० अपराधांची कथा?
विकास, मग धर्मसभा आता हरिनाम सप्ताह हा प्रवास काय सांगतो?
आनंद दिघे यांच्या आंदोलनानंतर खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे अनेक नेते हाजीमलंग येथे येऊन गेले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हाजीमलंगच्या विकासावर लक्ष्य केंद्रित केले आहे. येथे भाविकांसाठी डोंगरावर जाण्यासाठी प्रशस्त पायऱ्या, हाजीमलंग डोंगराच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी रस्ता, पाणीपुरवठा योजना अशी अनेक कामे शिंदे यांनी केली आहेत. येथे फ्युनिक्युलर ट्रेनचेही काम प्रगतिपथावर आहे. गेल्या वर्षात हिंदुत्ववादी संघटनांच्या पुढाकाराने येथे भव्य धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातील कट्टर हिंदुत्ववादी वक्त्यांनी हजेरी लावली होती. शिंदे यांनी या सभेसाठी पाठबळ दिले होते. त्यानंतर आता राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हाजीमलंगच्या पायथ्याशी मोठा सोहळा केला गेला. या सप्ताह सोहळ्यातील स्वागतोत्सुक ही जबाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वीकारली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे मोठे पाठबळ या सोहळ्याला मिळाले. ठाणे जिल्ह्यातील हिंदुत्ववादी आणि शिवसैनिकांसाठी नेहमीच जिव्हाळ्याचा राहिलेला हा विषय वेगवेगळ्या मार्गांने ज्वलंत ठेवण्याचे काम शिंदे पिता-पुत्रांनी केलेले दिसते.
हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केलेल्या मलंगगडाशी संबंधित ‘मच्छिन्द्रनाथ’ कोण होते?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हाजीमलंगबाबत भूमिका का जाहीर केली?
देशभर अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनवरून वातावरण ढवळून निघाले आहे. अशात त्यालाच पूरक अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेत हाजीमलंग वादावर थेट वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेला हाजीमलंग आणि दुर्गाडी येथील घंटानाद आंदोलनामुळे जिल्ह्यात वेळोवेळी चांगले पाठबळ मिळाले. गेल्या काही वर्षांत धर्माच्या विषयावर देशभर सुरू असलेल्या विविध आंदोलनांवरून भाजपला चांगले समर्थन मिळाले. हाजीमलंगचा मुद्दाही संवेदनशील असला तरी अशाच प्रकारातील आहे. त्यामुळे शिंदे यांनी ठरवून या विषयावर भूमिका मांडल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात आगरी-कोळी समाजात वारकरी संप्रदाय मोठा आहे. वारकरी, माळकरी, भजन संप्रदायासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात शिंदे यांनी एक प्रकारे ‘मलंगमुक्ती’ची नव्याने दिलेली हाक हिंदुत्वाची उजळणी करण्याचा प्रयत्न होता का अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.