– हृषिकेश देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची पद्धतच आता पडली आहे. खरे तर निकालानंतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्याची औपचारिकता पूर्ण केली जाते. पंजाबचेच उदाहरण घ्यायचे झाले तर सत्तेसाठी प्रबळ दावेदार असलेल्या आम आदमी पक्षाने खासदार भगवंत मान यांचे नाव जाहीर केले. पाठोपाठ राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हेच पक्ष सत्तेत आल्यास पुढचे मुख्यमंत्री असतील असे स्पष्ट केले.

निवडीमागची कारणे
चन्नी यांच्या निवडीची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. अर्थात ही निवड तितकी सोपी नव्हती. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे या पदासाठी इरेला पेटले होते. माजी क्रिकेटपटू, समालोचक असलेल्या सिद्धू यांचे वक्तृत्व ही जमेची बाजू… त्यांच्या सारख्या व्यक्तीला समजावणे काँग्रेससाठी मोठा प्रश्न आहे. याखेरीज सुनील जाखड हेही स्पर्धेत होते. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर चन्नी यांना सूत्रे दिली त्यावेळी आपल्याला ४२ आमदारांचा पाठिंबा होता असे वक्तव्य जाखड यांनी केले होते. जाखड हे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. राज्यातील हिंदू मतदारांची (जवळपास ३८ टक्के) संख्या पाहता जाखड हे प्रबळ दावेदार मानले जातात. मात्र राज्यातील ३२ टक्के दलित मतदार पाहता काँग्रेसने पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री असलेल्या ५८ वर्षीय चन्नी यांच्याच नावावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले आहे.

पंजाबमधील राजकीय स्थिती
देशात सर्वाधिक ३२ टक्के दलित मतदार हे पंजाबमध्ये आहेत. राज्यातील विधानसभेच्या ११७ जागांपैकी ३४ मतदारसंघ हे राखीव आहेत. त्यामुळे चन्नी यांचे नाव पुढे करून काँग्रेसने आम आदमी पक्षाला शह देण्याचा प्रयत्न चालविला आहे. आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान हे जाट शीख आहेत. तर अकाली दल-बहुजन समाज पक्ष सत्तेत आल्यास सुखबिरसिंग बादल हे मुख्यमंत्री होतील हे स्पष्टच आहे. तेही जाट शीख आहेत. जाट शीख जवळपास १८ टक्के आहेत. त्यामुळे दलित समाजाला आकृष्ट करण्याच्या दृष्टीने ही काँग्रेसची खेळी आहे.

चन्नी यांची प्रतिमा
पंजाबमध्ये भौगोलिकदृष्ट्या माझा, माळवा आणि दोआब असे तीन विभाग आहेत. त्यात माळवा विभागात राज्यातील जवळपास ६९ जागा आहेत. तर दोआब प्रांतात २३ जागा आहेत. चन्नी हे माळवा प्रांतातील चमकौर साहिब या मतदारसंघातून तीनदा विजयी झाले आहेत. विरोधी पक्षनेते, अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी प्रमुख खात्यांचा कारभार सांभाळला आहे. त्यामुळे त्यांना अनुभव आहे. यावेळी चन्नी चमकौर साहिबबरोबरच भदौर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. एक सामान्य कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर अल्पावधीतच अनेक घोषणा करून त्यांनी राज्यात काँग्रेसची प्रतिमा उंचावली आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाला पसंती मिळाली.

आव्हाने कोणती?
सर्वेक्षणानंतर काँग्रेसने चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे जाहीर केले असले तरी सिद्धू यांच्या सारख्या महत्त्वाकांक्षी राजकारण्याची समजूत काढणे मोठे आव्हान आहे. राहुल गांधी यांनी चन्नी-सिद्धू आणि जाखड यांच्या एकत्र घेऊन ही घोषणा करत एकी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. देशात काँग्रेस मोजक्याच राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे पंजाब गमावून चालणार नाही. काँग्रेसने चन्नी यांची नाव घोषित करत तूर्त विरोधकांना शह दिला आहे. आता सत्ता राखण्याचे आव्हान आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why congress chose charanjit singh channi as the punjab cm candidate scsg 91 print exp 0122