विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या उपउपान्त्यपूर्व सामन्यात पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा ६-१ असा धुव्वा उडवून दिमाखात उपान्त्यपूर्व फेरी गाठली. परंतु पोर्तुगालच्या या निर्भेळ यशापेक्षाही चर्चा रंगली, ख्रिस्तियानो रोनाल्डोला या सामन्यात सुरुवातीपासून खेळवले नाही, याचीच. रोनाल्डोऐवजी गोन्सालो रामोस या २१ वर्षीय खेळाडूला संधी मिळाली. त्याने हॅटट्रिक साधत या संधीचे सोने केले. परंतु ३७ वर्षीय रोनाल्डोला त्यामुळे पोर्तुगालच्या संघात भविष्य राहिलेले नाही, असे मानावे का, पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सांतोस आणि रोनाल्डो यांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे रोनाल्डोशिवाय पोर्तुगालच्या संघाची आखणी त्यांनी केलेली असावी का, अशा अनेक मुद्द्यांचा या निमित्ताने परामर्श घ्यावा लागतो.
रोनाल्डोला सुरुवातीस न खेळवण्याचा निर्णय धक्कादायक होता का?
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा चाहता वर्ग जगभर आहे. या चाहत्यांसाठी स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोचे सुरुवातीपासून न खेळणे निश्चितच धक्कादायक ठरले. युरो २००४मधील साखळी टप्प्यानंतर प्रथमच एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धेत मोक्याच्या सामन्यात रोनाल्डोचे नाव सुरुवातीच्या ११ खेळाडूंमधून वगळण्यात आले होते. दक्षिण कोरियाविरुद्ध ६५व्या मिनिटाला सांतोस यांनी रोनाल्डोला माघारी बोलावले, त्यावेळी तो निर्णय रोनाल्डोला पटला नव्हता हे स्पष्ट दिसून आले. तरीदेखील बाद फेरीच्या सामन्यात स्वित्झर्लंडसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध रोनाल्डोला सुरुवातीस वगळण्याचा निर्णय धाडसीच होता. रोनाल्डोला वगळल्यामुळे समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांचा महापूर लोटला. त्याला ७०व्या मिनिटाला उतरवले गेले, त्यावेळी प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले. रोनाल्डोच्या लोकप्रियतेची ती पावती होती.
पोर्तुगालच्या प्रशिक्षकांनी कोणता खुलासा केला?
रोनाल्डोला सुरुवातीस वगळण्याचा निर्णय पूर्णतः डावपेचात्मक (टॅक्टिकल) होता, असा खुलासा प्रशिक्षक सांतोस यांनी सामन्यानंतर केला. ‘रोनाल्डो आजही आमचा सर्वोत्तम कर्णधार आहे. माझे-त्याचे संबंध खूप जुने आहेत. पण माझा निर्णय पूर्णतः व्यावसायिक होता. व्यक्तिगत संबंधांची व्यावसायिक निर्णयांशी गल्लत मी कधीच करत नाही,’ असे सांतोस यांनी बजावले.
हेही वाचा- अग्रलेख : वलयकोषातला आत्मानंदी..
रोनाल्डोच्या अनुपस्थितीत पोर्तुगालचा खेळ कसा झाला?
रोनाल्डोच्या ऐवजी उतरवण्यात आलेल्या गोन्सालो रामोसने पोर्तुगालचे गोलांचे खाते उघडले. पूर्णतः अशक्यप्राय वाटणाऱ्या कोनातून त्याने केलेला गोल रोनाल्डोचीच आठवण करून देणारा होता. पण पोर्तुगालचे सर्वच खेळाडू आणि विशेषतः आघाडीची आणि मधली फळी निराळ्याच उत्साहात आणि निर्धाराने खेळताना दिसली. रामोस याने तर हॅटट्रिक साधली. विख्यात फुटबॉलपटू पेले यांच्यानंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत हॅटट्रिक साधणारा तो सर्वांत लहान वयाचा फुटबॉलपटू ठरला.
रोनाल्डोला वगळावे का लागते?
रोनाल्डो हा बराचसा स्वयंभू फुटबॉलपटू आहे. त्याच्याकडे तुफान ऊर्जा, असीम महत्त्वाकांक्षा, आदर्श तंदुरुस्ती आणि थक्क करणारे कौशल्य आहे. तो कोठूनही कसाही गोल करू शकतो. कोणत्याही पोझिशनवर खेळू शकतो. परंतु फुटबॉलमध्ये प्रशिक्षकाच्या मताला सर्वाधिक वजन असते. प्रशिक्षकाच्या योजनेबरहुकूम साऱ्यांनाच खेळावे लागते. या चौकटीत रोनाल्डो स्वतःला सामावून घेऊ शकत नाही. याचा परिणाम असा होतो, की एखादे वेळी त्याच्या जोरावर पोर्तुगालला सामना जिंकताही येतो. परंतु इतर वेळी रोनाल्डो फिका पडला किंवा त्याला प्रतिस्पर्ध्यांनी रोखून धरले, तर त्याचा विपरीत परिणाम इतरांच्या कामगिरीवर होतो. मँचेस्टर युनायटेडमध्ये तेथील प्रशिक्षक एरिक तेन हाग यांनी याच कारणास्तव रोनाल्डोला खेळवणे बंद केले. त्यामुळे वैतागून रोनाल्डोने क्लबलाच गुडबाय केला. रोनाल्डोच्या अहंकाराला दरवेळी चुचकारत बसणे शक्य नाही, असे मत जगभरच्या विश्लेषकांनी व्यक्त केले.
विश्लेषण: गोलधडाका, विजयनृत्य आणि पेलेंना पाठिंबा… ब्राझीलने कशी जिंकली फुटबॉलरसिकांची मने?
मग रोनाल्डो आता संपला का?
रोनाल्डोकडील अनुभव आणि कौशल्याच्या शिदोरीकडे दुर्लक्ष खचितच करता येत नाही. पोर्तुगालचे प्रशिक्षक सांतोस हे जाणतात. युरो २०१६, विश्वचषक २०१८, युरो २०२० या अलीकडच्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये रोनाल्डोच पोर्तुगालचा आधारस्तंभ होता. परंतु रोनाल्डोला पर्याय उपलब्ध करण्यात सांतोस यशस्वी ठरले आणि स्वित्झर्लंडविरुद्धचा सामना याचा खणखणीत पुरावा होता. रोनाल्डोला यापुढे मोजक्याच संधी मिळतील, पण तो संपला असे थेट म्हणता येणार नाही.