Cyclone Biparjoy live updates : अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरात आणि महाराष्ट्रातील किनारीपट्टी लगतच्या भागातील दैनंदिन कामात व्यत्यय आणायला सुरुवात केली आहे. बिपरजॉयचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. सौराष्ट्र आणि मुंबईच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात उंच लाटा आणि किनारी प्रदेशात जोरदार वारा वाहू लागला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमधील कच्छ आणि पाकिस्तानमधील कराची येथे पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी गुजरात राज्य काय प्रयत्न करत आहेत? यावर नजर टाकू.
अरबी समुद्रात सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात सर्वाधिक काळ टिकलेल्या चक्रीवादळांमध्ये आता बिपरजॉय वादळाचा समावेश झाला आहे. अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व भागात दि. ६ जून रोजी सकाळी ५.३० वाजता बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाले. चक्रीवादळ सक्रीय होऊन सात दिवस झालेले आहेत आणि अजूनही ते किनारपट्टीला धडकलेले नाही. हे चक्रीवादळ १५ जूनला धडकणार असल्याने त्याचा एकूण कालावधी दहा दिवस होऊन ते सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ म्हणून नोंदले जाईल.
याआधी २०१९ साली अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार चक्रीवादळाचा कार्यकाळ नऊ दिवस, १५ तास इतका होता. बिपरजॉय दहा दिवसांचा कालावधी पूर्ण करत असल्यामुळे ते सर्वाधिक टिकलेले चक्रीवादळ म्हणून गणले जाऊ शकते, अशी माहिती पीटीआयने दिली. जून महिन्यात गुजरात राज्याजवळ जाणारे २५ वर्षातील हे पहिलेच वादळ आहे. तर १८९१ पासून ते आतापर्यंत तीव्र चक्रीवादळ या श्रेणीत मोडणारे आजवरचे पाचवे वादळ असून या वादळाचा वेग ताशी ८८ ते ११७ किमी एवढा आहे.
हे वाचा >> Video : मुंबईकरांनो काळजी घ्या! आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, ‘बिपरजॉय’मुळे वरळी सीफेसला उधाण
वादळाची हानीकारक क्षमता
बिपरजॉय वादळ अधिक विनाशकारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सौराष्ट्रला मागे टाकून हे वादळ गुरुवारी दुपारपर्यंत कच्छ आणि मांडवी तसेच गुजरातच्या जखाऊ बंदरावर धडकू शकते. वादळाच्या वाऱ्याचा वेग जास्तीत जास्त प्रतिताशी १२५ ते १३५ किमीपर्यंत वाढू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. हवामान विभागाचे प्रमुख मृत्यूंजय महापात्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, वादळाची हानिकारक क्षमता अधिक मोठी असू शकेल. चक्रीवादळ धडकल्यामुळे कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगरच्या काही भागात १५ जून रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. चक्रीवादळाचा वेग हा धोक्याची घंटा असल्याची सूचना तज्ज्ञांनी दिली आहे.
समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान ३१ अंश सेल्सियस झाल्यामुळे आणि उच्चस्तरीय हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे श्रेणी एक मधील वादळ (चक्रीवादळाच्या ताकदीचे) असून चक्रीवादळाच्या निर्मितीला १२६ हून अधिक तास होऊन गेले आहेत. अरबी समुद्रातील आतापर्यंत श्रेणी एकमधील वादळे ही जास्तीत जास्त १२० तासापर्यंत सक्रीय राहिलेली आहेत, अशी माहिती दक्षिण कोरियामधील जेजू राष्ट्रीय विद्यापीठातील टायफून रिसर्च सेंटरचे संशोधक विनित कुमार सिंह यांनी दिली.
मंगळवारी गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीकडे जात असताना अतितीव्र असलेल्या या चक्रीवादळाची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊन त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होईल. सौराष्ट्र-कच्छ भागात बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मुंबई आणि ठाणे भागात हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून मोकळ्या जागेत जोरात वारा वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. १६ जून रोजी बिपरजॉय वादळ राजस्थानच्या नैऋत्य भागात जाऊ शकते, असेही हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुजरातने कोणते खबरदारीचे उपाय योजले
गुजरातच्या किनारी भागातून आतापर्यंत ८,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच, दीड ते दोन लाख लहान आणि मोठे जनावरे सुरक्षित स्थळी हरविण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली. सरकारी यंत्रणांनी किनारपट्टीच्या भागातील लोकांना किनारपट्टीवरून १० किमीच्या अंतरापर्यंत दूर केले आहे. कच्छच्या व्यतिरिक्त किनारपट्टीलगतच्या पोरबंदर, देवभूमी द्वारका, जामनगर, जुनागढ आणि मोरबी जिल्ह्यातील लोकांनाही सुरक्षित स्थळी हलविले आहे.
भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी द्वारका किनारपट्टीच्या ४० किमी अंतरावरील तेल काढण्याच्या ठिकाणाहून ५० लोकांचा बचाव केला. वादळाची तीव्रता वाढण्याचा अंदाज लक्षात घेऊन रात्रीच या लोकांना धोकादायक ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले, अशी माहिती मेरिटाईम एजन्सीने मंगळवारी दिली.
रेल्वेकडूनही खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. रेल्वेने आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला असून गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. तसेच सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या लोकांसाठी अन्न आणि औषधांचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती गुजरात मदत आयुक्त आलोक पांडे यांनी दिली. लष्कर आणि नौदलदेखील येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेऊन चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी काय तयारी करण्यात आली आहे याचा आढावा घेतला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि काही खासदारांनी चक्रीवादळ धडकणाऱ्या जिल्ह्यातील प्रशासनाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली.
सोमवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय बैठक घेऊन आढावा घेतला. लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे आणि चक्रीवादळापासून कमीत कमी नुकसान होण्यासंबंधी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिले. तसेच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून केंद्रकडून हरएक प्रकारची मदत दिली जाईल, असे आश्वासनही मोदी यांनी दिले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये काय परिस्थिती
हवामान विभागाने मुंबईत आज तुरळक पाऊस पडेल असा इशारा दिला होता. तसेच ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे आज मुंबईच्या काही भागात तुरळक पाऊस पडला.