करोनाकाळात डॉ. सायरस पूनावाला हे नाव घराघरात पोहोचले. पुण्यामधील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला आणि कंपनीचे सीईओ अदर पूनावाला यांनी करोनाप्रतिबंधक लसनिर्मिती करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. करोनाकाळात आणि त्याआधीपासून पूनावाला विविध आजारांवरील लसनिर्मिती करत आले आहेत. या कामगिरीमुळे सायरस पूनावाला यांना २०२२ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. देशासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या पूनावाला यांचा सरकारसोबत संघर्ष सुरू आहे. संघर्षाचे कारण ठरत आहे, मुंबईतील लिंकन हाऊस. २०१५ साली डॉ. सायरस पूनावाला यांनी ७५० कोटी रुपये मोजून अमेरिकेकडून हे लिंकन हाऊस विकत घेतले होते. मात्र आठ वर्षांनंतरही त्यांना गृहप्रवेश करता आलेला नाही. या कारणामुळेच संतप्त झालेल्या पूनावाला यांनी केंद्र सरकार ‘राजकीय आणि समाजवादी दृष्टिकोन’ बाळगून घराचा ताबा देत नाही, असा आरोप ब्लुमबर्गशी बोलताना केला. लिंकन हाऊस आणि त्याचा इतिहास, अमेरिकेने हे घर सायरस पूनावाला यांना का विकले? पूनावाला यांना त्याचा ताबा का मिळत नाही? या प्रश्नांचा घेतलेला हा मागोवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिंकन हाऊस कुठे आणि कसे आहे?

लिंकन हाऊस हा बंगला (राजवाडा) मुंबईच्या मलाबार हिल या परिसरात आहे. समुद्राला लागून असलेला दक्षिण मुंबईतील हा परिसर गर्भश्रीमंतांच्या वास्तव्यासाठी ओळखला जातो. उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला व मुकेश अंबानी यांचे टोलेजंग बंगले याच परिसरात आहेत. लिंकन हाऊस ब्रिच कँडी रुग्णालयाच्या अगदी शेजारी आहे. ५० हजार स्क्वेअर फूट परिसरात पसरलेली ही वास्तू ग्रेड तीनची हेरिटेज प्रॉपर्टी मानली जाते. केंद्र सरकारने हेरिटेज वास्तूंची ग्रेड एक, दोन आणि तीनमध्ये विभागणी केलेली आहे. जेणेकरून त्या त्या वास्तूचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महत्त्व जाणून त्याचे संवर्धन करता येईल. ग्रेड तीनच्या वास्तू स्थापत्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून शहरासाठी महत्त्वाच्या असतात. हेरिटेजच्या विविध ग्रेडमुळे सदर वास्तूंमध्ये बदल करायचे की नाही? याचेही नियम ठरलेले आहेत. मुंबईतील ग्रेड तीनच्या इतर प्रॉपर्टीमध्ये काही प्रमाणात पुनर्विकास झालेला आहे.

हे वाचा >> शरद पवार म्हणतात सायरस पूनावाला आणि मला कधीच ‘एवढे’ मार्क मिळाले नाहीत; “आम्ही दोघे अभ्यास सोडून

लिंकन हाऊसचा इतिहास

संयुक्त महाराष्ट्र होण्याआधी मुंबई आणि गुजरातचा काही भाग हा बॉम्बे प्रांतात येत होता. आता गुजरातमध्ये असलेले वांकानेरदेखील बॉम्बे प्रांतात येत होते. १९३३ मध्ये वांकानेरचे शेवटचे महाराज महाराणा अमरसिंह झल्ला यांनी ‘वांकानेर हाऊस’ या नावाने या वास्तूची उभारणी केली. १९५७ मध्ये वांकानेरच्या राजाने हा बंगला अमेरिकन सरकारला ९९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिला. वांकानेरच्या संस्थानिकांना कर भरण्यासाठी आर्थिक मदत व्हावी, यासाठी हा बंगला भाडेपट्ट्याने देण्यात आला होता. अमेरिकेने या ठिकाणी स्वतःचे दूतावास कार्यालय स्थापले आणि बंगल्याचे नाव ‘लिंकन हाऊस’ असे ठेवले.

अमेरिकेने लिंकन हाऊस का विकले?

२०११ साली अमेरिकेने दूतावास लिंकन हाऊसमधून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हलविले. त्यामुळे अमेरिकेने लिंकन हाऊस ८५० कोटींना विकण्याचा निर्णय घेतला. २०१५ साली डॉ. पूनावाला आणि अमेरिकन सरकारमध्ये लिंकन हाऊसचा करार अस्तित्वात आला आणि पूनावाला यांनी ७५० कोटींमध्ये हा बंगला विकत घेतला. २०१५ साली मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील हा सर्वात मोठा करार होता. पूनावाला यांनी आपल्या कुटुंबासमवेत राहण्यासाठी या बंगल्याची खरेदी केली होती.

पूनावाला यांचा गृहप्रवेश कुठे रखडला?

बंगल्याची जागा सरंक्षण खात्याची असल्याचा आक्षेप घेण्यात आल्यामुळे पूनावाला यांचा करार रखडला आहे. भाडेपट्ट्याचे हस्तांतरण होण्याआधी सरंक्षण खात्याचा हिरवा कंदील मिळणे आवश्यक असल्याचे करारानंतर सांगण्यात आले. अमेरिकेने या जागेचा वापर करणे बंद केल्यानंतर २० दिवसांत तशी नोटीस देऊन सूचित करणे बंधनकारक होते, मात्र अमेरिकन सरकारने तशी नोटीस दिली नाही, असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला गेला. २०१५ साली या कराराची बातमी सार्वजनिक झाल्यानंतर मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने अशी नोटीस वेळेत मिळाली नसल्याचे सांगितले होते.

आठ वर्षांपासून पूनावाला आणि अमेरिकन सरकार हे संयुक्तपणे केंद्र सरकारकडे हा करार अमलात यावा, यासाठी पाठपुरावा करत आहेत. अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेणार असल्याचे समजते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कराराला मान्यता देणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.

कोण आहेत डॉ. सायरस पूनावाला?

डॉ. सायरस पूनावाला यांनी पुण्यामध्ये १९६६ साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. ‘सीरम’ ही विविध आजारांवरील लस निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. ‘सीरम इन्स्टिट्यूट’कडून पोलिओ, डायरीया, हेपिटायटस, स्वाईन फ्ल्यू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो, त्यांपैकी ६० टक्क्यांहून अधिक लसी या ‘सीरम’मध्ये तयार केल्या जातात. ‘सीरम इन्स्टिट्यूट’ ही करोनाप्रतिबंधक कोव्हिशिल्ड लशीच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचली असली तरी मागील सहा दशकांहून अधिक काळापासून सायरस पूनावाला हे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.