संघटित गुन्हेगारी जगतात पाच दशकांहून अधिक काळ दहशत पसरविणारा दाऊद इब्राहिम कासकर याच्या मृत्यूची वार्ता पुन्हा पसरली आहे. दाऊदच्या मृत्यू झाल्याच्या बातम्या याआधीही झळकल्या होत्या. त्याबाबत काही काळ चर्चा झाली आणि सारे शांत झाले. आताही तसेच झाले आहे. कदाचित आपण आहोत हे दाखविण्याच्या नादात पसरविली गेलेली ही खबर तर नव्हती ना, दाऊदच्या मृत्यूला अवास्तव महत्त्व का दिले जाते, एका कुख्यात गुंडाच्या मृत्यूचा इतका बागुलबुवा का, दाऊदला मोठे कोणी केले याचा हा आढावा…

कोण आहे दाऊद इब्राहीम?

डोंगरीतल्या पाकमोडिया स्ट्रीटवर राहणाऱ्या दाऊदचे वडील इब्राहिम कासकर मुंबई पोलिसाच्या गुन्हे अन्वेषण शाखेत हवालदार होते. वडिलांचा फायदा उठवित दाऊद सुरुवातीला व्यापाऱ्यांकडून हप्ते गोळा करता करता छोट्या-मोठ्या तस्करीत गुंतला होता. हाजी मस्तान, युसुफ पटेल, करीम लाला यांची मक्तेदारी असलेल्या मुंबापुरीत हाजी मस्तानचा ‘बच्चा’ म्हणून दाऊदची ओळख गुन्हेगारी जगतात होऊ लागली होती. फेब्रुवारी १९७४ मध्ये दाऊदने सात-आठ साथीदारांच्या मदतीने कर्नाक बंदर येथे व्यापाऱ्याला लुटले. त्यात अटक होऊन दाऊद व साथीदारांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. मात्र उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. चोरीच्या पैशाच्या वाटपावरून दाऊद व साथीदारांमध्ये फूट पडली व क्षुल्लक बाबींवरून त्याचे पर्यवसान नंतर रक्तपातात होऊ लागले. एकमेकांचे कट्टर वैरी हाजी मस्तान व युसुफ पटेल हे एकत्र आले. दाऊद व त्याचा भाऊ शब्बीर या दोघांसाठी काम करू लागला. करीमलालाची पठाण टोळी विरुद्ध दाऊदची कोकणी मुसलमान टोळी असा संघर्ष सुरू झाला. शब्बीरची हत्या व या हत्येचा बदला म्हणून भर न्यायालयात पठाण टोळीच्या अमीरजादाची हत्या यातून दाऊदची दहशत निर्माण होऊ लागली. अनेक गिरणी कामगारांची मुले दाऊद टोळीत भरती होऊ लागली. मुंबईतील रस्त्यावरील रक्तरंजित टोळीयुद्धीची तेव्हा सुरुवात होती.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : विश्लेषण : प्रसूतीनंतर महिलांना दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका? काय सांगते ‘लॅन्सेट’ संशोधन?

टोळीयुद्धाचा भडका…

हाजी मस्तान व युसुफ पटेल यांच्यातील रक्तपाताने मुंबईला हादरे बसू लागले होते. क्रॉफर्ड मार्केटमध्ये हे दोघे एकमेकांसमोर आले तेव्हा हाजी मस्तानने युसुफ पटेलला गोळ्या घातल्या. जमिनीवर लोळण घेतल्याने युसुफ पटेल बचावला. मात्र मुंबईत सुरू झालेले टोळीयुद्ध पुढे तीन ते चार दशके चालू होते. दाऊदच्या वाढत्या दहशतीमुळे अनेकांनी शरणागती पत्करली होती. दुसरीकडे अमर नाईक, अरुण गवळी टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. समवयस्क म्होरक्यांच्या या टोळ्यांमध्ये हद्दीसाठी संघर्ष सुरू झाला होता. चेंबूरचा राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन दाऊदला येऊन मिळाल्याने दाऊद टोळी अधिकच मजबूत झाली होती. वाढते टोळीयुद्ध आणि पोलिसांचा ससेमिरी चुकविण्यासाठी १९८६ मध्ये दाऊद दुबईला पळून गेला. तेव्हा दुबईला जाणेच सोपे होते. तेथून मग तो अमली पदार्थ तस्करी, सट्टा चालवू लागला. दुबईपेक्षा दाऊदने पाकिस्तानमध्ये आश्रय घेणे पसंत केले. कराचीतील क्लिफ्टन परिसरात दाऊदचा व्हाईट हाऊस या नावे आलिशान बंगला आहे, असा गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे. मात्र पाकिस्तान तो अद्याप मानायला तयार नाही.

दाऊदची बेनामी संपत्ती किती?

दाऊदची मुंबईसह दुबई, ब्रिटन व कराचीत करोडो रुपयांची बेनामी मालमत्ता आहे, असे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे. पाकिस्तानमधील मालमत्तेची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेने संकलित केली आहे. कराची व इस्लामाबाद येथे दाऊद कुटुंबीयांच्या नावे असलेली मालमत्ता : मोईन पॅलेस, क्लिफ्टन,, ६/ए खय्याम टंझीम, डिफेन्स हौसिंग, १७, सी.पी. बाझार सोसायटी, अब्दुल्लाह शाह गाझी साह की मज्जा, आठवा मजला मेहरान स्क्वेअर, आलिशान बंगला, क्लिफ्टन (सर्व कराची), आयएसआय सेफ हाऊस, भौबन हिल, हाऊस नंबर २९, मार्गल्ला रोड, पी-६/२ (दोन्ही इस्लामाबाद). भारतीय तपास यंत्रणेने ही माहिती पाकिस्तान सरकारला डॉसिअरद्वारे सादर केली आहे. तरीही पाकिस्तान सरकार ती मानायला तयार नाही. दाऊदच्या कथित मृत्यूची वार्ताही अशाच रीतीने मान्य केली जाणार नाही, हेही तितकेच खरे. दाऊदच्या मृत्यूची वार्ता आली तरी तो कदाचित जवळच्या कुठल्यातरी देशात असल्याची खबर पसरविली जाईल. गुप्तचर यंत्रणा काय खेळ करतील याची कल्पनाच न केलेली बरी.

हेही वाचा : विश्लेषण : ‘काशी – तामीळ संगम’… उत्सव की भाजपचा राजकीय कार्यक्रम?

मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंध..

मुंबईत १२ मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट दाऊदच्या इशाऱ्यावरूनच झाले हे न्यायालयीन निकालातही स्पष्ट झाले आहे. त्यात तो फरारी प्रमुख आरोपी आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारीया हे बॉम्बस्फोट तपासाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्या पुस्तकातही त्याचा उल्लेख केला आहे. पाकिस्तानला जे हवे होते ते दाऊदने घडवले होते. पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजेच आयएसआयचा हात या बॉम्बस्फोटात असल्याचे मारीया यांनी पुस्तकात स्पष्ट म्हटले आहे. आयएसआयने दाऊद व त्याच्या साथीदारांच्या मदतीने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यानंतर छोटा राजनने मात्र दाऊदपासून फारकत घेऊन स्वतंत्र टोळी बनविली. मुस्लिम व हिंदू डॉन अशी विभागणी झाली. त्यानंतर तब्बल दीड शतके मुंबईच्या रस्त्यावर रक्तपात सुरू होता.

टोळीयुद्धाचा खात्मा

दाऊदची कथित दहशत मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पार मोडीत काढली. बिल्डरांना खंडणीसाठी धमकावणे, गोळीबार आदी घटनांनी कहर गाठला होता. परंतु चकमकींमुळे विविध टोळ्यांचे हजारच्या आसपास गुंड ठार करून मुंबई पोलिसांनी गुंड टोळ्यांची खालची फळी संपवून टाकली. आता मुंबईपुढे संघटित गुन्हेगारीचे नव्हे तर दहशतवादी कारवायांची टांगती तलवार आहे. २६ नोव्हेंबर २००८ चा हल्ला हा त्याचाच परिपाक. स्थानिक गुंडाच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते असे आजही बोलले जाते. पण ते गुलदस्त्यातच राहिले. आताही टोळ्यांच्या कारवाया सुरू आहेत. फक्त त्यांनी आपली पद्धत बदलली आहे. यापैकी काहीजण स्वत:च बिल्डर झाले आहेत.

हेही वाचा : विश्लेषण: नव्या उपाययोजनांनंतरही नक्षलवाद वाढतो आहे का?

दाऊद टोळीचे काय?

दाऊद टोळी अद्यापही बोगस चलन, शस्त्रे व अमली पदार्थांच्या तस्करीतून सक्रिय असल्याचे ग्लोबल टेररिस्ट इंडेक्सच्या दहाव्या आवृत्तीत नमूद करण्यात आले आहे. संघटित गुन्हेगाराची सूत्रे हलविणारी दाऊद टोळी आता बोगस भारतीय चलनाच्या तस्करीत माहीर आहे. अल कायदा तसेच विविध देशांतील दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेली दाऊद टोळी आजही भारतात बोगस चलनाचा पुरवठा करते, असे या अहवालात म्हटले आहे. संघटित गुन्हेगारीतून पाय काढून घ्याव्या लागलेल्या दाऊद टोळीचा आता दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. अमली पदार्थांच्या तस्करीतही दाऊद टोळी सक्रिय असल्याचा हा अहवाल सांगतो. मात्र भारतीय तपास यंत्रणांनी चांगल्याच मुसक्या आवळल्यामुळे दाऊद टोळीलाही पूर्वीप्रमाणे खुलेआम सक्रिय राहण्यावर बंधने आली आहेत हे मात्र निश्चित. दाऊद टोळीचा जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंत पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा दाऊदला जिवंत ठेवणार हेही तितकेच खरे आहे.

nishant.sarvankar@expressindia.com