बदलती जीवनशैली, कामाचे बदलते स्वरूप, आहारामधील बदल यामुळे वेगवेगळे आजार जडण्याचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह हा आजारही त्यापैकीच एक. जगभरात या आजाराची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान मुलांमध्येही हा आजार आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक लहान मुलांना मधुमेह-१ (टाईप १ चा मधुमेह) हा आजार झालेला आहे. JAMA नेटवर्क या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार २०१९ साली इतर देशांच्या तुलनेत भारतात लहान मुलांना मधुमेह होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. याच पार्श्वभूमीवर या अहवालात नेमके काय आहे? भारतात मुलांना बालपणीच मधुमेह का होतोय? हे जाणून घेऊ या…
२०१९ साली जगात ५,३९० बालकांचा मधुमेहामुळे मृत्यू
भारताला मुधमेह या आजाराची राजधानी म्हटले जाते. म्हणजेच भारतात मधुमेह आजार होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. JAMA नेटवर्क या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात तर काही धक्कादायक तथ्ये मांडण्यात आली आहेत. २०१९ साली जगभरात दोन लाख २७ हजार ५८० बालकांना मधुमेह झाल्याचे समोर आले. त्यापैकी ५,३९० बालकांचा मधुमेहामुळे मृत्यू झाला; तर पाच लाख १९ हजार ११७ लहान मुलांना आपले आरोग्यदायी जीवनाचे एक वर्ष (highest disability-adjusted life years (DALY) गमावावे लागले. या अहवालानुसार १९९० पासून लहान मुलांना मधुमेह होण्याच्या प्रमाणात ३९.४ टक्के वाढ झाली आहे. या अहवालात संशोधकांनी लहान मुलांना होणारा मधुमेह, तसेच मधुमेहामुळे लहान मुलांचे होत असलेले मृत्यू थांबवण्यासाठी तातडीने उपाय करणे गरजेचे आहे. मृत्युदर, तसेच या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी किफायतशीर धोरण राबवायला हवे, असेही या अहवालात नमूद केलेले आहे.
लहान मुलांना मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले?
मधुमेहाची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी एकूण २०४ देश आणि प्रदेशांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात १९९० ते २०१९ या काळात मधुमेहामुळे होणारे मृत्यू, मधुमेहाचे रुग्ण, तसेच लहान मुलांच्या आरोग्यदायी आयुष्यावर पडणाऱ्या परिणामांचा (DALYs)अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात एकूण एक लाख ४४ हजार ८९७ छोट्या मुलांच्या आरोग्याबाबतची माहिती गोळा करण्यात आली. त्यात सात लाख १० हजार ९७४ मुलींचा समावेश होता. या अभ्यासानुसार १० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मधुमेह होण्याच्या प्रमाणात सर्वाधिक वाढ (५२.०६ टक्के) झाली आहे; तर एक ते चार वर्षे वय असणाऱ्या लहान मुलांमध्ये मधुमेह होण्याचे प्रमाण सर्वांत कमी (३०.५२) टक्के आहे. भारतात लहान मुलांना मधुमेह होण्याचे प्रमाण १९९० साली १०.९२ टक्के होते. २०१९ साली हे प्रमाण ११.८६ टक्के झाले आहे.
या अभ्यासानुसार मधुमेहाशी संबंधित कारणामुळे मृत्यू झालेल्या लहान मुलांचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झालेले आहे. १९९० साली लहान मुलांच्या मृत्यूचा आकडा ६,७१९ एवढा होता. २०१९ साली हा आकडा ५,३९० पर्यंत खाली आला होता. तसेच मधुमेहामुळे होणारा मृत्युदरही ०.३८ टक्क्यावरून ०.२८ टक्क्यापर्यंत खाली आला आहे.
जगभरात मधुमेहाच्या आजाराची स्थिती काय?
२०१९ साली दक्षिण आशियामध्ये लहान मुलांना मधुमेह, मधुमेहाशी संबंधित आजारामुळे लहान मुलांचे मृत्यू, आरोग्यदायी आयुष्यावर होणारे परिणाम (DALYs ) यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१९ साली मधुमेह असलेल्या सहा टक्के मुलांचे मृत्यू ते राहत असलेल्या वातावरणामुळे झाला आहे. मधुमेही मुलांवर तापमानाचाही परिणाम झाला आहे. २०१९ साली खूप उष्ण वातावरण असल्यामुळे तीन टक्के मधुमेही मुलांचा मृत्यू झाला. ज्या भागात तापमान जास्त असते, त्या भागातील मधुमेहींना जास्त धोका असतो. तसे ‘डाउन टू अर्थ’ या २०१७ साली नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात सांगण्यात आले आहे.
मधुमेह होण्याचे प्रमाण का वाढत आहे?
मधुमेह आजार होण्याचे प्रमाण काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. मात्र, हा आजार वाढण्याचे नेमके कारण सांगणे कठीण आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार- करोना महासाथीमुळे लहान मुलांना मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले असावे. मानवाच्या शरीरात असे काही सूक्ष्म जंतू असतात; जे आपले वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण करतात. मात्र, मागील काही वर्षांत लॉकडाऊन, तसेच करोना महासाथीमुळे लोकांशी प्रत्यक्ष संपर्क होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्या काळात लहान मुले बाहेरच्या वातावरणातही आलेली नव्हती. त्यामुळे या मुलांची रोगप्रतिकारशक्ती तेवढ्या प्रमाणात वाढलेली नसावी. परिणामी लहान मुलांना मधुमेहासारखे आजार होण्याचा धोका वाढला आहे.
फास्ट फूड, प्रदूषणामुळे मधुमेह?
बॉम्बे हॉस्पिटलमधील मधुमेह रोगतज्ज्ञ राहुल बाक्सी यांनी बीबीसीला मधुमेहाचे प्रमाण वाढण्याचे नेमके कारण सांगितले आहे. “भारतात मधुमेह वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बदलती जीवनशैली, शहरांकडे स्थलांतर, कामाचे अनियमित तास, एका जागेवर बसून राहण्याची सवय, तणाव, प्रदूषण, जेवणाच्या सवयीत बदल, आहारात फास्ट फूडचा समावेश या प्रमुख कारणांचा समावेश आहे,” असे बाक्सी यांनी सांगितले.
टाईप १ चा मधुमेह होण्याचे कारण काय?
कॅन्सास हेल्थ सिस्टम युनिव्हर्सिटीच्या क्रे डायबेटिस सेल्फ मॅनेजमेंट सेंटरचे संचालक डॉ. डेव्हिड रॉबिन्स यांनीदेखील मधुमेह हा आजार का वाढतोय, याबद्दल सांगितले आहे. “पर्यावरणातील काही घटकांमुळे टाईप १ हा मधुमेह होतो. याचे काही पुरावेदेखील उपलब्ध आहेत. त्यामध्ये लहानपणापासून गाईचे दूध घेणे, आईचे दूध कमी मिळणे, प्रदूषण यामुळे टाईप १ चा मधुमेह होण्याची शक्यता असते,” असे रॉबिन्स यांनी सांगितले.
टाईप १ चा मधुमेह काय आहे?
२०४० सालापर्यंत जगातील सर्वच देशांत टाईप १ च्या मधुमेहाचे प्रमाण वाढणार असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. मेयो क्लिनिकच्या मते- टाईप १ च्या मधुमेहात स्वादुपिंडाची इन्सुलिन या घटकाची निर्मिती करण्याची क्षमता कमी किंवा नाहीशी होते. इन्सुलिनमुळे आहाराच्या माध्यमातून शरीरात जाणारी साखर पेशींमध्ये जाते. त्यानंतर साखरेचे ऊर्जेमध्ये रूपांतर होते. मात्र, स्वादुपिंडाने इन्सुलिन तयार न केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी इन्सुलिनच्या गोळ्या घ्याव्या लागतात. लहान मुले आणि प्रौढ व्यक्तींनाही हे औषध घेता येते.
… तर मधुमेहावर नियंत्रण मिळवणे शक्य
दरम्यान, मधुमेह होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. तहाण लागणे, लवकर थकवा येणे, वारंवार शौचास येणे, वजन कमी होणे ही काही मधुमेह या आजाराची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे आहे. लवकर उपचार घेतल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.