गौरव मुठे
अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी एंटरप्रायझेसने ‘फॉलो-ऑन समभाग विक्री’ अर्थात ‘एफपीओ’ प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. बोली लावलेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. प्रतिकूल बाजारस्थितीतही ‘एफपीओ’ मार्गी लावण्यात यशस्वी झालेल्या अदानी समूहाने ‘एफपीओ’ मागे का घेतला आणि तो मागे घेऊनदेखील समभागातील घसरण का थांबलेली नाही, याची कारणे समजून घेऊया.
अदानी एंटरप्रायझेसच्या ‘एफपीओ’ला किती प्रतिसाद मिळाला होता?
अदानी एंटरप्रायझेसचा ‘एफपीओ’ गेल्या महिन्यात २७ ते ३१ जानेवारी दरम्यान खुला होता. पहिल्या दिवशी कंपनीच्या ‘एफपीओ’ला अल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र कंपनीने गुंतवणूकदारांना साद घातल्यानंतर अखेरच्या दिवशी शेवटच्या तासात ११२ टक्क्यांहून अधिक मागणी नोंदविणारा प्रतिसाद मिळाला. किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांच्यासाठी राखीव हिश्शाच्या तुलनेत २.२९ कोटी समभागांसाठी म्हणजे केवळ फक्त ११ टक्के समभागांसाठी बोली लावली. तर कर्मचाऱ्यांसाठी राखीव हिश्श्यापैकी केवळ ५२ टक्के समभागांसाठी बोली लावण्यात आली. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या १.२८ कोटी समभागांपैकी १.२४ कोटी समभागांची बोली लावण्यात आली. त्याला ९७ टक्के प्रतिसाद मिळाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेल्या हिश्श्यासाठी सर्वाधिक ३२६ टक्के प्रतिसाद लाभला. त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ९६ लाख समभागांच्या तुलनेत ३.१३ कोटी समभागांसाठी मागणी नोंदवण्यात आली. तर सुकाणू गुंतवणूकदारांच्या माध्यमातून अदानी एंटरप्रायझेसने ५,९८५ कोटी रुपयांचा निधी उभारला होता. त्यामध्ये अबूधाबीस्थित इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने सर्वाधिक बोली लावली. त्यांनी सुमारे ३,२०० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची बोली लावली.
अदानी एंटरप्रायझेसने ‘एफपीओ’ मागे घेण्याबाबत काय कारण दिले?
‘एफपीओ’च्या माध्यमातून देशाच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी २०,००० कोटी रुपये उभे करणारी ही समभाग विक्री प्रतिकूल बाजारस्थितीमुळे मागे घेत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. अमेरिकी संस्था ‘हिंडेनबर्ग’च्या संशोधन अहवालातील, विविध प्रकारच्या अनियमितता आणि लबाड्यांच्या आरोपांनी अदानी समूहातील सर्वच कंपन्यांच्या समभागांची मोठी वाताहत झाली. त्यामुळे समूहातील अभूतपूर्व परिस्थिती आणि सध्याची बाजारातील अस्थिरता लक्षात घेता ‘एफपीओ’मधून मिळविलेला निधी परत करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. शिवाय ‘एफपीओ’ प्रक्रियेत सहभागी झालेल्या गुंतवणूकदार समुदायाच्या हितरक्षणाचे कंपनीचे यामागे उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे. गुंतवणूकदारांचे हितरक्षण सर्वाेच्च प्राधान्य आहे. त्यांना कोणत्याही संभाव्य आर्थिक नुकसानीपासून वाचवण्यासाठी संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याचे खुद्द अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी सांगितले.
‘एफपीओ’ गुंडाळल्याचा काय परिणाम होणार?
अदानी एंटरप्रायझेसच्या समभागांना अखेरच्या दिवशी शेवटच्या तासात ११२ टक्क्यांहून अधिक मागणी नोंदविणारा प्रतिसाद मिळाला. कंपनीने या माध्यमातून ४ कोटी ५५ लाख समभागांची विक्री प्रस्तावित केली होती, पण त्या तुलनेत गुंतवणूकदारांकडून अखेरच्या दिवशी किंचित जास्त म्हणजे ४.६२ कोटी समभागांसाठी बोली लावण्यात आली. किरकोळ गुंतवणूकदारांनी समभागाकडे पाठ फिरवली. मात्र ‘एफपीओ’ यशस्वी करण्यासाठी अदानी समूहाने गुंतवणूकदारांना साद घातली आणि त्याला गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या हिश्श्यासाठी ३२६ टक्के अधिक प्रतिसाद दिला. मात्र प्रतिकूल परिस्थितीत अदानींवर विश्वास दाखवूनदेखील कंपनीने ‘एफपीओ’ गुंडाळल्यामुळे परदेशी आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार नाराज होण्याची शक्यता आहे. शिवाय यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत अधिक साशंक होऊ शकतील. ‘एफपीओ’ गुंडाळल्यानंतरदेखील अदानी एंटरप्रायझेसच्या समभागातील घसरण थांबलेली नाही. पडझड अशीच कायम राहिल्यास देशांतर्गत गुंतवणूकदार देखील समभागाकडे पाठ फिरवू शकतात.
‘एफपीओ’ मागे घेऊनदेखील समभागात पडझड का?
अदानी एंटरप्रायझेसने ‘एफपीओ’साठी ३,११२ ते ३,२७६ रुपयांची ‘ऑफर प्राइस’ अर्थात विक्री किमतीचा पट्टा निश्चित केला होता. तसेच किरकोळ गुंतवणूकदारांना प्रति समभाग ६४ रुपयांची अतिरिक्त सवलतदेखील कंपनीने जाहीर केली होती. मात्र अदानी समूहावरील आरोपांमुळे अदानी एंटरप्रायझेसचा समभाग ‘एफपीओ’साठी निश्चित केलेल्या ३,११२ रुपयांच्या किमान विक्री किमतीच्याही खाली आला आणि त्यातील घसरण अजूनही शमलेली नाही.
ब्लूमबर्गने दिलेल्या अहवालानुसार, क्रेडिट स्वीस आणि सिटीग्रुप यासारख्या जागतिक वित्तसंस्थांनी हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर अदानीच्या वित्तपुरवठ्याची छाननी वाढवण्याचे संकेत दिले आहेत. याचबरोबर संकटग्रस्त अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग तारण ठेवून कर्ज देण्यावर मर्यादा घालण्याचे पाऊल उचलले आहे. समूहाच्या आर्थिक आरोग्याविषयीच्या नकारात्मक बातम्यांमुळे समभाग आणि रोख्यांच्या किमती घसरल्या आहेत. जागतिक पातळीवर कंपनीची पत आणखी खालावण्याच्या भीतीने समूहातील अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सच्या समभागातील घसरण अधिक वाढली आहे. गेल्या दोन सत्रात अदानी एंटरप्रायझेसचा समभाग मुंबई शेअर बाजारात ५४ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तर समूहातील इतर कंपन्यांच्या समभागात देखील १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
gaurav.muthe@expressindia.com