हवाई वाहतूक क्षेत्रातील आकासा एअर कंपनीसमोर सध्या वैमानिक संकट निर्माण झाले आहे. कंपनीच्या सेवेतील ४५० पैकी ४० वैमानिक बाहेर पडले आहेत. यावरून सुरू झालेल्या लढाईत दिल्ली उच्च न्यायालयाने कंपनीला दिलासा दिला आहे. नियमांचे पालन न करता कंपनीच्या सेवेतून बाहेर पडणाऱ्या वैमानिकांवर कारवाई करण्याची मुभा उच्च न्यायालयाने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने दिली आहे. आकासाच्या बाबतीत निर्माण झालेला हा तिढा केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण हवाई क्षेत्रासमोर निर्माण झाला आहे. नेमके काय आहे हे संकट, यावर विश्लेषणात्मक दृष्टिक्षेप.
संकटाची सुरुवात कशी?
मागील आठवड्यात आकासा एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन कंपनी गुंडाळली जाणार नसल्याची हमी दिली. कंपनीची आर्थिक स्थिती भक्कम असून, दीर्घकाळ विकासाची उद्दिष्टे आहेत. राकेश झुनझुनवाला यांच्या पाठिंब्यावर या कंपनीची सुरुवात झाली. मात्र, एकाच वेळी ४० वैमानिक नोकरी सोडून गेल्याने कंपनी अडचणीत आली. हे वैमानिक सहा महिन्यांचा नोटीस कालावधी पूर्ण न करता निघून गेले होते. त्यामुळे कंपनीला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात एकूण सहाशे उड्डाणे रद्द करावी लागली. पुढील काही काळात ही संख्या सातशेवर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.
हेही वाचा – विश्लेषण : बिहारच्या जातनिहाय सर्वेक्षणातून नव्या राष्ट्रीय राजकारणाची नांदी?
कंपनीचा आक्षेप काय?
आकासा एअरचे अनेक वैमानिक नोटीस कालावधी पूर्ण न करता प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये गेले. यात प्रामुख्याने एअर इंडिया एक्स्प्रेसचा समावेश आहे. आकासाकडे असलेल्या बोइंग-७३७ प्रकारातील विमाने या कंपनीकडे आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांना तिथे संधी मिळाली. आकासा एअर ही १३ महिन्यांपूर्वी स्थापन झालेली कंपनी आहे. वैमानिकांनी करारानुसार नोटीस कालावधी पूर्ण करून जावे, अशी कंपनीची मागणी होती. अखेर कंपनीने आपल्याला झालेला तोटा आणि मानहानी यासाठी वैमानिकांकडून प्रत्येकी २१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली.
नेमके दुखणे काय?
मागील काही वर्षांत प्रत्येक विमान कंपनीमधून वैमानिक सोडून जाण्याचे प्रमाण कायम आहे. यासाठी व्यवस्थापनातील अनेक त्रुटींकडे बोट दाखविले जाते. नवीन वैमानिकांची भरती करण्याऐवजी उपलब्ध मनुष्यबळातच कामकाज चालविण्यावर व्यवस्थापनाचा भर असतो. याचवेळी यामागे तांत्रिक कारणही आहे. अनेक विमान कंपन्यांनी बी-७३७ मॅक्स ही विमाने खरेदी केली. गतकाळात या विमानांमध्ये अनेक समस्या आढळून आल्या होत्या. ही विमाने चालविणाऱ्या वैमानिकांची संख्या कमी आहे. याचवेळी इतर वैमानिक ही विमाने चालविण्यास इच्छुक नाहीत, अशा कोंडीत हवाई वाहतूक क्षेत्र अडकले आहे.
प्रतिस्पर्धी कंपन्यांची प्रतिक्रिया काय?
आकासा एअरमध्ये वैमानिक संकट निर्माण झाल्यानंतर त्याचा फायदा प्रतिस्पर्धी कंपन्यांनी घेतला. यामुळे कंपनीचा हवाई वाहतूक बाजारपेठेतील हिस्सा सप्टेंबरमध्ये ४.२ टक्क्यांवर आला. हा हिस्सा जुलैमध्ये ५.२ टक्के होता. हवाई वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी इंडिगो आणि टाटा समूहाच्या मालकीच्या कंपन्यांना याचा फायदा झाला. परंतु, बाजारहिश्श्यात मागे असलेल्या स्पाईसजेटनेही आकासाला मागे टाकले. एका कंपनीचा तोटा तो आपला फायदा असे चक्र सध्या हवाई वाहतूक क्षेत्रात दिसत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील व्यवसायाचा चांगल्या पद्धतींना हरताळ फासला जात आहे.
हेही वाचा – विश्लेषण : एमआरएनए संशोधनासाठी वैद्यकशास्त्राचे नोबेल… करोनाकाळात ते कसे निर्णायक ठरले?
जागतिक पातळीवर स्थिती कशी?
वैमानिकांची संख्या कमी असणे ही केवळ भारतीय हवाई क्षेत्रापुरती मर्यादित समस्या नाही. अनेक कंपन्या शेकड्याने विमानांची खरेदी करीत आहेत. परंतु, ती चालविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ भरताना दिसत नाहीत. त्यामुळे सर्वच कंपन्यांमध्ये थोड्याफार फरकाने ही समस्या आहे. जागतिक पातळीवर विमाने रद्द होण्याची संख्या ही वास्तवात खूप अधिक असून, ती कमी दाखविली जाते, असा आक्षेपही तज्ज्ञांकडून घेतला जातो. यामागील प्रमुख कारण हे पुरेसे वैमानिक नसणे हेच आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर ही परिस्थिती गंभीर स्वरुपाची असल्याचे समोर येत आहे.
उपाय काय?
आकासा एअरसमोर निर्माण झालेले संकट भविष्यात कोणत्याही हवाई वाहतूक कंपनीसमोर उभे राहू शकते. यामुळे सर्वच कंपन्यांनी गांभीर्याने या समस्येचा विचार करायला हवा. हवाई वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांनी एकमेकांचे वैमानिक आणि इतर कर्मचारी यांची भरती करताना काही ठरावीक निकषांचे पालन करायला हवे. नियमानुसार दुसऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची भरती करून प्रत्येक कंपनी हवाई वाहतूक क्षेत्रात सकारात्मक चित्र निर्माण करू शकते. याचवेळी अपुऱ्या मनुष्यबळावर तोडगा काढण्यासाठी प्रत्येक कंपनीनेच दीर्घकालीन उपाययोजना करायला हव्यात. आकासा एअरसमोर निर्माण झालेले संकट भविष्यात कोणत्याही हवाई वाहतूक कंपनीसमोर उभे राहू शकते.
sanjay.jadhav@expressindia.com