इंग्लंड विरुद्ध इराण सामना  सुरू होण्यापूर्वी एका घडामोडीने फुटबॉल विश्वात खळबळ उडवून दिली. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन या सामन्यात ‘वन लव्ह’ असा संदेश कोरलेली दंडपट्टी (आर्मबँड) घालून खेळणार होता. परंतु अशा प्रकारे दंडपट्टी घालून उतरणाऱ्या कर्णधारांना पिवळे कार्ड दाखवले जाईल, असा इशारा जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने दिल्यामुळे या निर्णयातून इंग्लंडसह वेल्स, बेल्जियम, स्वित्झर्लंड, जर्मनी, डेन्मार्क आणि नेदरलँड्स या देशांच्या फुटबॉल संघटनांनी माघार घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे एलजीबीटी समर्थक आणि युरोपातील फुटबॉलप्रेमींनीही नाराजी व्यक्त केली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘वन लव्ह’ संदेश काय आहे?

एलजीबीटीक्यू समुदायाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आणि सर्वसमावेशकतेचा पुकार करण्यासाठी सप्तरंगी पार्श्वभूमीवर हृदयाची आकृती आणि १ हा आकडा अशा प्रकारचे डिझाइन असलेल्या दंडपट्ट्या घालण्याची सुरुवात नेदरलँड्सच्या फुटबॉल संघटनेने केली. त्यांचा रोख केवळ एलजीबीटीक्यू समुदायाकडे नव्हता, तर लैंगिक प्राधान्याबरोबरच वर्ण, वंश, धर्म आदि मुद्द्यांवर भेदाभेद असू नये, असे त्या मोहिमेचे उद्दिष्ट होते. या डिझाइनमध्ये एलजीबीटीक्यूविषयी थेट उल्लेख नाही. परंतु कतारमध्ये समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता नाही आणि याच्या समर्थनार्थ होणाऱ्या प्रतीकांना वा निषेध-निदर्शनांना स्वीकारले जात नाही. त्यामुळे एलजीबीटीक्यू समुदायाविषयी प्रातिनिधिक स्वरूपात वापरल्या जाणाऱ्या सप्तरंगयुक्त वन लव्ह दंडपट्टीचे महत्त्व होते. वास्तविक अशा प्रकारे दंडपट्ट्या २०२०पासून नेदरलँड्समध्ये तेथील स्थानिक स्पर्धांत वापरल्या जातात. सप्टेंबर २०२२पासून नॉर्वे, स्वीडन, फ्रान्ससह नऊ देशांनी अशा प्रकारच्या दंडपट्ट्या वापरण्याचा निर्णय घेतला होता.  

वन लव्ह दंडपट्ट्या कतारमध्ये  वापरण्याचा आग्रह का?

समलैंगिकता आणि समलैंगिक विवाहांना कतारमध्ये मान्यता नाही. एलजीबीटीक्यू समुदायातील कित्येकांचा त्या देशात वर्षानुवर्षे छळ सुरू असल्याचा आरोप पाश्चिमात्य संघटना आणि विचारवंत करतात. या समुदायाप्रति पाठिंबा व्यक्त करण्यासाठी विश्वचषक स्पर्धेदरम्यान विविध मार्गांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचे ठरले. यातूनच अनेक फुटबॉल संघटनांनी ट्रेनिंग पोशाख, दंडपट्टीच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. 

‘फिफा’चा अटकाव का?

फिफातर्फे संचालित स्पर्धेत प्रत्यक्ष सामन्यादरम्यान खेळाडूंच्या पोशाखावर, बुट-मोज्यांवर आणि कर्णधारांच्या दंडपट्ट्यांवर राजकीय संदेश दर्शवणारे चिन्ह वा प्रतीक वा डिझाइन वापरण्यावर निर्बंध आहेत. साहित्यसाधनांविषयी फिफाच्या नियम ४.३ अन्वये, ‘पोशाख, बूट वा इतर कोणत्याही साधनांवर अवमानास्पद, धोकादायक, शिष्टसंमत नसलेला संदेश ज्यात राजकीय, धार्मिक, वैयक्तिक संदेशाचाही समावेश आहे… खेळाच्या नियमांच्या चौकटीत बसत नसल्यास त्याच्या प्रदर्शनावर आणि वापरावर बंदी असेल.’ मात्र, त्याचबरोबर सामाजिक आशय असलेले संदेश दंडपट्टीवर वागवण्यास बंदी नाही, असेही फिफाने स्पष्ट केले आहे. वर्णद्वेषाविरोधात फिफाने अनेक वर्षे मोहीम चालवली. याअंतर्गतच, एका गुडघ्यावर बसून व एक हात वर करून केल्या जाणाऱ्या मूकनिषेधाला फिफाची संमती आहे. 

इंग्लंड आणि इतर संघांची माघार का?

वन लव्ह दंडपट्टी घालून खेळणाऱ्यांना सुरुवातीसच पिवळे कार्ड दाखवले जाईल, अशा इशारा फिफाने दिला. अशा प्रकारे कार्ड दाखवले गेल्यास, संपूर्ण सामन्यात कर्णधाराच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. सामन्यादरम्यान काही कारणास्तव दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यास, मैदानही सोडावे लागू शकते. त्याचा फटका संघाला बसू शकतो. बाद फेरीच्या सामन्यांमध्ये पाठोपाठच्या सामन्यांत पिवळे कार्ड मिळाल्यास, पुढील सामन्याला मुकावे लागते. त्यामुळे अशी जोखीम पत्करण्यापेक्षा काही बाबतींत दंड भरून, पण दंडपट्टीवरील संदेशाबाबत आग्रह सोडून देण्याचा निर्णय युरोपिय संघांनी घेतला. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did fifa stop european teams from using one love armbands print exp scsg