अनिश पाटील
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर मुंबईत रविवारी गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिष्णोई टोळी पुन्हा चर्चेत आली आहे. पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये सक्रिय असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीने कॅनडामध्येही पसारा वाढवलाय. ही टोळी आता देशात इतरत्रही पाय पसरवण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा लॉरेन्स बिष्णोई कोण आहे, त्याची टोळी कशी काम करते, याचा आढावा.
सिद्धु मुसेवाला हत्येत बिष्णोई टोळीचा हात?
प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवाला याच्या हत्येत लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हात होता. २०२२मध्ये घडलेल्या या प्रकरणानंतर ही टोळी चांगलीच चर्चेत आली होती. या हत्येत राज्यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांचीही नावे चर्चेत आली होती. पंजाबमधील गँगस्टर बिष्णोईचा कॅनडास्थित साथीदार गोल्डी ब्रार याने सिद्धु मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. या हत्येनंतर बिष्णोई टोळी प्रथम देशपातळीवर चर्चेत आली.
आणखी वाचा-इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याचा मुलगा लढवणार लोकसभा निवडणूक, कोण आहेत सरबजित सिंग खालसा?
बिष्णोई टोळीकडून यापूर्वीही सलमानला धमकी?
अभिनेता सलमान खानला बिष्णोई टोळीकडून यापूर्वीही धमकावण्यात आले होते. या टोळीने सलमानची माहिती काढण्यासाठी त्यांचे हस्तकही मुंबईत पाठवले होते. धमकी प्रकरणी सलमानच्या वतीने प्रशांत नरेंद्र गुंजाळकर (४९) यांनी वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली होती. ते सलमानचे मित्र असून त्यांची आर्टीस्ट मॅनेजमेंटची कंपनी आहे. २०२२ मध्ये जून महिन्यात सलमान यांना अज्ञात व्यक्तीने धमकीचे पत्र लिहून सिद्धु मुसेवाला प्रमाणे जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला गेला. त्यापाठोपाठ लॉरेन्स बिष्णोईने एका नवीन मुलाखतीत सलमान खानला पुन्हा एकदा धमकी दिली. प्रसिद्धीसाठी नव्हे तर, एका हेतूसाठी आम्ही त्याला मारणार आहोत. प्रसिद्धी किंवा पैशासाठी कोणाला मारायचे असते तर, आम्ही शाहरुख किंवा बॉलिवूडमधील इतर कोणत्याही बड्या व्यक्तीला मारले असते, असेही लॉरेन्सने मुलाखतीत सांगितले होते. या मुलाखतीनंतर पोलिसांकडून सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत असताना, सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील कार्यालयात धमकीचा ईमेल होता. त्यामध्ये, ‘गोल्डी भाई को सलमानसे बात करनी है. तसेच, बिष्णोई याची मुलाखत बघितली असेलच.. प्रकरण मिटवायचं आहे. समोरासमोर बसून बोलायचे आहे. आता सांगितले आहे, पुढच्या वेळी झटका देऊ’ अशा आशयाचा हिंदी मजकूर त्यात होता. त्यानुसार, सलमानने रोहित गर्ग, गोल्डी भाई आणि लॉरेन्स बिष्णोई विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
कोण आहे लॉरेन्स बिष्णोई?
लॉरेन्स बिष्णोईचा जन्म पंजाबमधील सधन, उच्चभ्रू कुटुंबातला आहे. अबोहर इथल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्याने शिक्षण घेतले. त्याने विधि शाखेची पदवी घेतली आहे. त्याच्या कुटुंबाची वडिलोपार्जित शेकडो एकर जमीन आहे. लॉरेन्सचे वडील लविंदर हे पोलीस हवालदार पदावर कार्यरत होते. त्याच्या वडिलांना लॉरेन्सला पोलीस अधिकारी बनवायचे होते. पण लॉरेन्सने वेगळा मार्ग निवडला. महाविद्यालयात असतानाच त्याने विद्यार्थी संघटना स्थापन केली होती. त्या माध्यमातून पुढे त्याने टोळी उभी केली. चंडीगडमध्ये शिक्षणासाठी गेल्यावर लॉरेन्सने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत.
आणखी वाचा-विश्लेषण: ट्रम्प यांच्याविरोधातील ‘हश मनी’ खटला काय आहे? ट्रम्प यामुळे अडचणीत येतील का?
लॉरेन्स बिष्णोई टोळी कोठे सक्रिय आहे?
लॉरेन्सविरोधात पंजाब, दिल्ली, राजस्थान इथे गुन्हे नोंद आहेत. भरतपूर कारागृहानंतर त्याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. पण तेथूनही त्याच्या कारवाया सुरूच आहेत. या टोळीची सध्या देशभर चर्चा सुरू असल्यामुळे तिच्या नावाने धमकावण्याचे प्रकारही सुरू आहेत.
सलमानच्या घराबाहेर गोळीबार कोणी केला?
लॉरेन्स बिष्णोईचा धाकटा भाऊ अनमोल बिष्णोईने अपलोड केलेल्या कथित फेसबुक पोस्टमधून खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली गेली आहे. पंजाबी गायक सिद्धु मूसवालाच्या हत्येत सहभागी असलेल्या अनमोलने हा गोळीबार सलमान खानसाठी ‘पहिला आणि शेवटचा इशारा’ असल्याचे म्हटले आहे. ‘यापुढे भिंतींवर किंवा रिकाम्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत’, अशी धमकी सलमानला उद्देशून देण्यात आली आहे. अनमोल कॅनडामध्ये लपून बसल्याचा संशय आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मुंबईतील गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते फेसबुक पोस्टची चौकशी करत आहेत. फेसबुक पोस्ट सकाळी साडेअकराच्या सुमारास नजरेस आली आहे. ‘आम्हाला शांतता हवी आहे. दडपशाहीविरुद्धचा एकमेव निर्णय जर युद्ध असेल, तर तसे असू द्या. सलमान खान, आम्ही तुम्हाला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केले. जेणेकरून, तुम्हाला आमच्या क्षमतांची कल्पना येईल. आमची परीक्षा घेऊ नका. तुमच्यासाठी हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे. यापुढे भिंतींवर किंवा रिकाम्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत,’ असे या पोस्टमध्ये नमूद केले आहे. बिष्णोई गट आणि गुंड गोल्डी ब्रार, रोहित गोदारा आणि कला जठारी यांच्या नावांचा शेवटी उल्लेख आहे. अनमोल याच्यावर १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सीसीटीव्हीमध्ये कोण आढळले?
सीसीटीव्ही चित्रीकरणानुसार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी एक विशाल ऊर्फ विकास ऊर्फ कालू मंगेराम धनक असल्याचा संशय आहे. विशाल हा बिष्णोई टोळीच्या रोहित गोदाराचा विश्वासू असून गुरूग्राम येथील महावीरपूरा येथील रहिवासी आहे. अनमोलने फेसबुकवर केलेल्या धमकीच्या पोस्टमध्येही रोहित गोदाराच्या नावाचा उल्लेख केला आहे. विशाल हा शूटर असून त्याने गेल्या महिन्यात हरियाणा येथील गुरूग्राम परिसरात सचिन नावाच्या व्यक्तीचा गोळी झाडून खून केला होता.