प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतील चुरस वाढत असतानाच भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने तडकाफडकी निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अश्विनने ब्रिस्बेन येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला. अश्विनचे भारतीय क्रिकेटला अमूल्य योगदान असून निवृत्त कधी व्हायचे हा निर्णय घेण्याचा हक्क त्याने कमावला आहे, असे भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. मात्र, प्रत्यक्षात अश्विनच्या निर्णयाने भारतीय संघातील सहकाऱ्यांनाही धक्का बसला होता, अशी माहिती आहे. अश्विनने महत्त्वाच्या मालिकेदरम्यान निवृत्ती का स्वीकारली आणि याचा भारताला फटका बसणार का, याचा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अश्विनच्या निवृत्तीमागे काय कारण?

‘भारतीय क्रिकेटपटू म्हणून आज माझा अखेरचा दिवस आहे. माझ्यात क्रिकेट अजूनही शिल्लक आहे. मात्र, आता मी केवळ क्लब स्तरावर खेळू इच्छितो,’ असे म्हणत अश्विनने १८ डिसेंबर रोजी निवृत्ती जाहीर केली. त्याने स्पष्ट कारण देणे टाळले. मात्र, परदेशात सातत्याने संधी न मिळणे आणि अधूनमधून डोके वर काढणारी गुडघ्याची दुखापत ही अश्विनच्या निवृत्तीमागील प्रमुख कारणे असण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही परदेश दौऱ्यांत भारतीय संघ व्यवस्थापनाने एकमेव फिरकीपटूच्या स्थानासाठी अश्विनपेक्षा डावखुऱ्या रवींद्र जडेजाला प्राधान्य दिले होते. जडेजा अधिक सरस फलंदाज असल्याने त्याला पसंती मिळत होती. तसेच अलीकडच्या काळात ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरनेही प्रभावित केल्याने अश्विनसमोरील स्पर्धा वाढली. त्याला अंतिम ११ खेळाडूंतील स्थान टिकवणे अवघड जाऊ लागले.

आणखी वाचा-सुरक्षित घरे, मदतीसाठी हेल्पलाइन, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारची योजना काय?

सहकाऱ्यांना धक्का का?

भारतीय संघाने नव्या आंतरराष्ट्रीय हंगामाची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेने केली. भारताने दोन सामन्यांच्या या मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले आणि यात अश्विनची भूमिका निर्णायक ठरली. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघ अडचणीत सापडलेला असताना अश्विनने ११३ धावांची शानदार खेळी केली होती. तसेच दुसऱ्या डावात त्याने ८८ धावांत ६ गडी बाद केले. त्याने दोन कसोटीत मिळून ११ बळी मिळवले. त्यामुळे ३८ वर्षीय अश्विनमध्ये अजून बरेच क्रिकेट शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ०-३ असे सपशेल अपयश आले. यात अश्विनने तीन सामन्यांत नऊ बळी मिळवले होते. ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. यात तीन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी असून अखेरचे दोन सामने मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहेत. या दोनही मैदानांवरील खेळपट्ट्यांकडून फिरकीला साहाय्य मिळते. त्यामुळे या सामन्यांत अश्विन महत्त्वाची भूमिका बजावू शकेल अशी संघ व्यवस्थापन आणि सहकाऱ्यांची धारणा होती. मात्र, या सामन्यांपूर्वीच अश्विनने निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेतल्याने भारतीय संघातील सहकाऱ्यांना धक्का बसला.

२०२३ मध्येच निवृत्तीचा विचार…

गेल्या वर्षी (२०२३) मायदेशात झालेल्या बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या कसोटी मालिकेदरम्यान अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा सर्वप्रथम विचार केला होता. त्या वेळी तो गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. मात्र, त्याने आणखी काही काळ खेळत राहण्याचा निर्णय घेतला. यंदा ऑस्ट्रेलियासाठी रवाना होण्यापूर्वी अश्विनने आपण निवृत्तीबाबत विचार करत असल्याची कल्पना कुटुंबीयांना दिली होती. ऑस्ट्रेलियात कामगिरी कशी होते ते पाहून तो पुढील निर्णय घेणार होता. अखेर ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या (मंगळवारी) खेळानंतर अश्विनने निवृत्तीचा निर्णय मनाशी पक्का केला आणि अखेरच्या दिवसानंतर तो जाहीर केला.

आणखी वाचा-भारतात डायबेटिससाठी पहिल्या जैविक बँकेची सुरुवात, याचे फायदे काय? देशातील मधुमेहाचे संकट किती मोठे?

भारतीय संघाला कधी कल्पना दिली?

‘पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीदरम्यान अश्विनने माझ्याबरोबर चर्चा केली होती. आपण निवृत्तीचा विचार करत असल्याचे त्याने मला सांगितले होते. मी त्याला ॲडलेड येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी मनधरणी केली. मात्र, आता त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे,’ असे ब्रिस्बेन कसोटीनंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला. अश्विनने आपल्या अन्य सहकाऱ्यांना निवृत्तीची कल्पना ब्रिस्बेन कसोटीदरम्यानच दिली. मात्र, त्याही आधी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर अश्विनने संघ व्यवस्थापनाशी संवाद साधला होता. बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या मालिकेत आपल्याला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळणार नसेल, तर आपण ऑस्ट्रेलियात जाऊ इच्छित नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते. त्या वेळी आपण तुझा विचार करत असल्याचे संघ व्यवस्थापनाने त्याला सांगितले होते. मात्र, पहिल्या कसोटीनंतर पुन्हा तिसऱ्या कसोटीसाठी संघातून वगळण्यात आल्यानंतर त्याने निवृत्ती स्वीकारली.

‘सेना’ देशांत समाधानकारक नाही…

‘सेना’ देश अर्थात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे खेळलेल्या सामन्यांत अश्विनला आपल्या अलौकिक प्रतिभेला न्याय देता आला नाही. दक्षिण आफ्रिकेत सात कसोटीच्या १३ डावांत ११ बळी, इंग्लंडमध्ये सात कसोटीच्या ११ डावांत १८ बळी, न्यूझीलंडमध्ये एका कसोटीत तीन बळी आणि ऑस्ट्रेलियात ११ कसोटीच्या १९ डावांत ४० बळी अशी त्याची कामगिरी राहिली. मायदेशात मात्र अश्विनने आपला वेगळा दरारा निर्माण केला होता. त्याने भारतात खेळलेल्या ६५ कसोटीच्या १२७ डावांत ३८३ बळी मिळवले. त्यामुळे विशेषत: घरच्या मैदानांवर खेळताना भारताला अश्विनची उणीव जाणवेल, हे निश्चित.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did ravichandran ashwin suddenly retire while series against australia was underway print exp mrj