Balasaheb Thackeray Sharad Pawar Friendship बाळासाहेब ठाकरे या नावाच्या भोवतालचे वलय बरेच मोठे आहे. एक राजकारणी, एक कलाकार … याशिवाय दिलखुलास मित्र आणि उमदा विरोधक .. या शब्दांत खुद्द शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल आपल्या आत्मचरित्रात भावना व्यक्त केल्या आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवारा यांच्याच शब्दात सांगावयाचे झाले तर ‘आयुष्यभर आम्ही एकमेकांचे कडवे राजकीय विरोधक राहिलो, पण मैत्रीचं नातं मात्र मनापासून जोपासलं. राजकारणाच्या आखाड्यात विरोधकांचा मुलाहिजा न ठेवता त्यांना लोळवणारे बाळासाहेब, खासगीत मैत्रीच्या नात्याला हळुवारपणानं जोपासताना मी अनुभवले आहे.’ या भावना व्यक्त करणारे केवळ शरद पवारच नाहीत तर बाळासाहेबांची एक उत्तम मित्र अशी ओळख सांगणारे  अनेक मान्यवर आहेत. बाळासाहेबांनी एखाद्याला आपलं मानलं की ती व्यक्ती कायमस्वरूपी त्यांचीच होऊन जात असे. त्यांच्या मैत्रीचे दाखले अनेक आहेत. याच दाखल्यांपैकी प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आर. के. लक्ष्मण आणि बाळासाहेबांच्या मैत्रीचे 

व्यंगचित्रकार आणि अखेरपर्यंत मैत्री 

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले, तत्पूर्वी ते बराच काळ रुग्णालयात होते. त्याच कालखंडात ३ नोव्हेंबर रोजी बाळ ठाकरे यांच्या डॉक्टरांनी मुंबईहून पुण्याला फोन केला. फोनवर प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पत्नी कमला होत्या, डॉ. म्हणाले बाळासाहेबांना त्यांचा आवाज एकदाच ऐकायचा आहे.” या दिवशी दुपारनंतर पुण्याहून आपल्या ६० वर्षांपेक्षा अधिक जुन्या मित्राची आणि सहकारी व्यंगचित्रकाराच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी २०१० साली पक्षाघातानंतर बोलणेही कठीण झालेल्या ९१ वर्षीय लक्ष्मण यांनी फोन केला, आपल्या या मित्राच्या चौकशीला उत्तर देताना ८६ वर्षीय बाळासाहेब म्हणाले, ‘मी मार्गस्थ होताना, बरा आहे. “तुम्ही बरे व्हाल आणि निश्चितपणे आमच्या पुण्याच्या घरी याल” असे कमला लक्ष्मण म्हणाल्या. “मी तशी फक्त इच्छा करू शकतो,” बाळासाहेबांनी उत्तर दिले, परंतु पुन्हा त्यांनी निरोप घेण्याचा आग्रह धरला.

अधिक वाचा: नुकत्याच जन्माला आलेल्या ‘इस्रायल’चे महत्त्व सुएझ कालव्याने कसे सिद्ध केले?

‘द कॉमन मॅन’चे मनमिळाऊ जन्मदाते आर.के. लक्ष्मण आणि बाळासाहेबांची मैत्री कोणालाही असामान्य वाटावी अशीच होती. अखेरच्या श्वासापर्यंत ही मैत्री टिकली. बाळासाहेब आणि आर.के. लक्ष्मण यांची भेट १९४६ साली  फ्री प्रेस जर्नलच्या कार्यालयात पहिल्यांदा झाली, बाळासाहेब त्या  काळात फ्री प्रेस जर्नलमध्ये रुजू झाले होते, जिथे  लक्ष्मण आधीपासून कार्यरत होते. त्यांच्या वयाच्या विशीत त्यांनी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून सुरुवात केली, त्यानिमित्ताने ते दोघे कॅफेत जात, बराच काळ लोकांना बघत, हसत. दोघेही व्यंगचित्रकार होते, त्यांचे हे नाते बहरले आणि हास्याचे  समीकरणच तयार झाले, असे कमला यांनी नमूद केले होते. सुमारे पाच वर्षे बाळासाहेब आणि लक्ष्मण यांनी सोबत काम केले होते. १९५० साली लक्ष्मण यांनी टाइम्स ऑफ इंडियात काम करण्यास सुरुवात केली त्यांनी रोजचे पॉकेट व्यंगचित्र साकारण्यास सुरुवात केली, त्याच वेळी बाळासाहेब यांनीही फ्री प्रेस जर्नल सोडले, या वृत्तपत्राची इच्छा त्यांनी कम्युनिस्ट शिकवणुकीचे पालन करावे अशी असल्याने दोघांनीही तेथील काम सोडले. परंतु त्यांची मैत्री मात्र वर्षानुवर्षे कायम राहिली. बाळासाहेबांनी स्वतःचे मार्मिक साप्ताहिक सुरू केले. “या सर्व कालखंडात, त्यांना लक्ष्मण यांचा अभिमान होता, त्यांनी त्यांचे लाड केले. लक्ष्मण हे एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत हे बाळासाहेबांना माहीत होते, १९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करण्याची घोषणा केली तेव्हा त्यांनी थेट दक्षिण भारतीयांना लक्ष्य केले. पण यामुळे त्या दोघांच्या मैत्रीत काहीही बदल झाला नाही. “त्यांच्या नात्यात कोणतेही राजकीय धागेदोरे जोडलेले नव्हते,“लक्ष्मण यांना राजकारणी बाळासाहेबांपेक्षा व्यंगचित्रकार बाळ जास्त आवडायचे. त्याने व्यंगचित्रकार म्हणून काम चालू ठेवले असते तर त्याला ते आवडले असते, परंतु त्याने मला सांगितले की कदाचित हे त्याचे आंतरिक आवाहन आहे, आपण ते टाळू शकत नाही. त्याला नेहमी वाटायचे की जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्ही ते केलेच पाहिजे,” कमला लक्ष्मण यांनी स्पष्ट केले होते. किंबहुना बाळासाहेबांनी व्यंगचित्रकार न राहिल्याची खंत लक्ष्मण यांना बोलून दाखविण्याचेही त्यांनी सांगितले. इतकचं नाही तर आदल्याच वर्षी लक्ष्मण यांची प्रकृती खालावल्यामुळे खुद्द बाळासाहेबांनी पुणे गाठले होते… 

शरद पवार आणि बाळासाहेब 

बाळासाहेब ठाकरे या आपल्या मित्रांच्या प्रति असलेल्या नाजूक भावनांचे उदाहरण देताना शरद पवार यांनी एक प्रसंग आपल्या पुस्तकात नमूद केला आहे. बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य होतं, जे जगाला फारसं परिचित नाही, त्यांचा औषधी वनस्पतींचा दांडगा अभ्यास होता. मातोश्रीच्या मागच्या बाजूला त्यांनी अनेक औषधी वनस्पतींचे संगोपन केले होते. कोणाला काही दुखापत असल्याचे कळताच ते आपल्याच अंगणातील औषध सांगायचे, द्यायचे. २००४ साली शरद पवार यांना कर्करोगांने गाठल्यावर बाळासाहेबांनी त्यांना एक पत्र लिहिले होते, पत्राची सुरुवात ‘प्रिय शरद’, अशा मायन्याने झाली, या पत्रात शरद पवारांनी काय खावं, कशा पद्धतीने जीवनशैली पाळावी, याबाबत खास ठाकरे शैलीत हुकूम दिलेला होता. त्यातलं शेवटचं वाक्य ‘तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असा आदेश मी तुम्हाला देतो आहे, असे होते. 

अधिक वाचा: Indira Gandhi:इंदिरा गांधी गुंगी गुडिया ते दुर्गा: अटलजी खरंच म्हणाले होते का दुर्गा? नेमका वाद काय आहे?

शरद पवार आणि त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. याविषयी आपल्या आत्मचरित्रात नमूद करताना शरद पवार सांगतात, सुप्रिया सुळे यांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय झाला, त्या वेळेस सुप्रियाच्या विरोधात उमेदवार कोण असणार हे जाणून घेण्यासाठी मी बाळासाहेबांना फोन केला. मी त्यांना सांगितलं, ‘सुप्रिया राज्यसभेसाठी निवडणूक लढवते आहे. युतीतर्फे कोण उमेदवार असेल?” बाळासाहेब उत्तरले, ‘शरद बाबू, असं विचारताना तुम्हाला काही वाटत कसं नाही? सुप्रिया सहा महिन्यांची असल्यापासून माझ्या अंगा खांद्यावर खेळलेली आहे. आज तिला संधी आल्यावर मी तिच्या विरोधात उमेदवार देईन, असं तुम्हाला कसं वाटलं?” मी प्रश्न केला, ‘तुमचं ठीक आहे. पण भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेईल?” यावर त्यांचं उत्तर होतं “कमळाबाईला कसं पटवायचं, ती माझी जबाबदारी!”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did shiv sena chief balasaheb thackeray say to sharad pawar that how to convince kamalabai is my responsibility svs
Show comments