मोहन अटाळकर
दक्षिण व उत्‍तर भारताला जोडणारी अकोला ते खंडवा ही मीटरगेज रेल्‍वे बंद होऊन सात वर्षे झाली आहेत. या रेल्‍वेमार्गाचे काम का रखडले, त्‍याविषयी.

अकोला-खंडवा रेल्‍वेमार्गाच्‍या कामातील अडथळे कोणते?

राजस्‍थानमधील जयपूर ते तेलंगणातील काचीगुडा या रेल्‍वेस्‍थानकादरम्‍यान एकेकाळी मीटरगेज रेल्‍वे धावत होती. या रेल्‍वेमार्गाचे टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने ब्रॉडगेजमध्‍ये रूपांतर झाले. पण, अकोला ते खंडवा या मार्गाचे ब्रॉडगेज रूपांतरण अनेक कारणांमुळे रखडले. हा रेल्‍वेमार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्‍पातून जात असल्‍याने ब्रॉडगेज झाल्‍यास वेगवान रेल्‍वेगाड्या वन्यप्राण्यासाठी कर्दनकाळ ठरतील, अशी भीती वन्‍यजीवप्रेमींनी व्‍यक्‍त केली. या रेल्‍वेमार्गाला स्‍वयंसेवी संस्‍थांनी विरोध दर्शविला. हे प्रकरण न्‍यायालयात गेले. नंतर सरकारने रेल्वेमार्ग मेळघाटमधून जुन्या मार्गाने न जाता तुकईथड, खिकरी, खकनार, उसरनी, जामोद, सोनाला, हिवरखेड, अकोट या नवीन पर्यायी मार्गाने केला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल

मीटरगेज रेल्‍वेमार्गाचा इतिहास काय?

दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा सर्वांत जवळचा मार्ग म्हणून जयपूर-काचिगुडा रेल्‍वेमार्गाची ओळख होती. १८५७ ते १८८० च्या दरम्यान ब्रिटिशांनी दिल्लीला दक्षिणेला जोडण्यासाठी जयपूर, अजमेर, चित्तोड, मंदसौर, रतलाम, इंदूर, खंडवा, अकोला मार्गे हैदराबादपर्यंत मीटर गेज रेल्‍वेमार्ग तयार केला होता. दिल्ली, नसीराबाद, नीमच, महू, अकोला आणि इतर ठिकाणच्या छावण्या एकमेकांशी जोडणे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सैनिकांना तातडीने पाठवणे हा त्याचा उद्देश होता. १८८१ मध्ये या मार्गावर प्रवासी गाड्या धावू लागल्या. तेव्हापासून ३० सप्टेंबर २००६ पर्यंत अकोला ते अजमेर या रेल्वे विभागात मीटरगेज गाड्या धावत होत्या. टप्‍या-टप्‍प्‍याने या रेल्‍वेमार्गाचे ब्रॉडगेज रूपांतरण हाती घेण्‍यात आले. या रेल्वे मार्गातील पूर्णा ते अकोलापर्यंतचे ब्रॉडगेजचे काम २००८ मध्ये पूर्ण झाले.

आणखी वाचा- चीनकडून हाँगकाँगची गळचेपी? नवीन सुरक्षा कायद्याविषयी जगभर निषेधसूर का?

पर्यायी मार्गाची सूचना कशामुळे?

रेल्वे मंत्रालयाने अकोला ते खंडवा अशा १७६ कि.मी. रेल्वेमार्गाला मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला होता. हे विस्तारीकरण मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून होणार असल्याने तेथील वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे हे विस्तारीकरण पर्यायी मार्गाने व्हावे, अशी मागणी होत होती. मुळातच हा गाभा अबाधित व सुरक्षित ठेवण्यासाठी येथील १६ गावे आणि या गाभ्याबाहेरील सहा गावे इतर ठिकाणी पुनर्वसित करण्यात आली आहेत. ही गावे या रेल्वे मार्गाच्या दहा किलोमीटर परिघातील होती. भारतीय वन्यजीव संस्थेनेदेखील या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रूपांतर पर्यायी भागातून करावे, अशी सूचना केली होती.

विरोधाच्‍या पार्श्‍वभूमीवर तोडगा कसा निघाला?

अकोला-खंडवा रेल्‍वेमार्गाच्‍या ब्रॉडगेज रूपांतरणाला विरोध होत असताना केंद्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने २०१५ मध्ये त्रिसदस्यीय समिती गठित केली होती. या समितीने दोन पर्यायी मार्ग वन्यजीव उपाययोजनांसह डिसेंबर २०१७ मध्ये केंद्र शासनाकडे प्रस्‍ताव पाठवला. त्यानंतर याच मुद्द्यावरून राजकारण सुरू झाले. तेव्हापासून हा प्रकल्प रखडला होता. अखेर ११ जून २०२२ रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ‘वेस्टर्न झोन काऊन्सिल’ची २५वी बैठक पार पडली. त्यात अकोट-खंडवा हा नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग मेळघाटमधून जुन्या मार्गाने न जाता तुकईथडवरून खिकरी, खकनार, उसरनी, जामोद, सोनाला, हिवरखेड मार्गे अडगाव या नवीन पर्यायी मार्गाने केला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

आणखी वाचा-बलुचिस्तान प्रांताला पाकिस्तानपासून अलग का व्हायचे आहे? ग्वादार बंदरावर बलुचिस्तानींनी हल्ला का चढविला?

अकोला-खंडवा रेल्‍वेमार्गाची सद्यःस्थिती काय?

२०१७ मध्‍ये अकोला खंडवा मीटरगेज रेल्‍वेमार्ग बंद करण्‍यात आला. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्‍ये रूपांतर करण्‍याचे काम टप्प्‍या-टप्‍प्‍याने सुरू आहे. त्‍यापैकी मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पामुळे अकोट ते आमला खुर्द हा टप्‍पा सर्वाधिक माघारला होता. मीटरगेज असताना अकोला ते खंडवा हे अंतर १७४ किलोमीटर होते. आता प्रस्तावित ब्रॉडगेज मार्ग व्याघ्र प्रकल्पाबाहेरून २९ किलोमीटरचा वळसा घेऊन जाणार असल्याने हे अंतर आता २०३ किलोमीटर होणार आहे. सध्या या मार्गासाठी भूसंपादन केले जात आहे.

रेल्‍वेमार्गाचे काम केव्‍हा पूर्ण होणार?

अकोट ते अडगाव आणि तुकईथड ते आमला खुर्द या रेल्‍वेमार्गाचे काम सुरू करण्‍यात आले आहे. अकोट ते आमला खुर्द या रेल्‍वेमार्गासाठी ७०२ हेक्‍टर जमीन अधिग्रहण करणे आवश्‍यक असून १८९ हेक्‍टर जमीन संपादित करण्‍यात आली आहे. ५१३ हेक्‍टरचे भूसंपादन प्रगतीपथावर आहे. तुकईथड ते खकणार या १८.४४ किलोमीटर रेल्‍वेमार्गासाठी ४५६ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्‍यात आली आहे. हे काम पूर्ण करण्‍यासाठी १८ महिन्‍यांचा कालावधी देण्‍यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया बघता या रेल्‍वेमार्गाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण होऊ शकेल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली जात आहे.

mohan.atalkar@expressindia.com