मनुष्य हा मुळातच सौंदर्याचा उपासक आहे. सौंदर्य साधना करण्याचे तंत्र मनुष्यात उपजत असते. सुंदर दिसावे, इतरांपासून वेगळे आकर्षक दिसावे ही भावना प्रत्येक माणसात असते; मग ती स्त्री असो वा पुरुष. या सौंदर्य साधनेच्या उपासनेत कोणीही मागे नाही, म्हणूनच उपजत सौंदर्य खुलविण्यासाठी माणूस विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतो. ह्याच सौंदर्य प्रसाधनातील लिपस्टिक ही स्त्रियांच्या जिवाभावाचा विषय आहे, काही जणी चेहऱ्याच्या कांतीनुसार तर काही कपड्यांना मॅचिंग लिपस्टिक लावतात. आज लिपस्टिक सौंदर्यात भर घालत असली तरी इतिहासात लिपस्टिक ही स्त्री स्वातंत्र्याचे प्रतिनिधित्व करणारी ठरली होती. आजच्या आधुनिक जगात लिपस्टिक ही अनेक रंगात, अनेक रूपात उपलब्ध आहे. सौंदर्य खुलविणाऱ्या या लिपस्टिकचा इतिहास हजारो वर्षे मागे जातो. मराठीत या लिपस्टिकला ओष्ठशलाका असे संबोधले जाते. सौंदर्यात अनेक रंगांची उधळण करणाऱ्या या रंग शलाकेचा इतिहास चक्क पाच हजार वर्षे मागे जातो, त्याविषयी!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगातील सर्वात प्राचीन लिपस्टिक ५००० वर्षांपूर्वी निर्माण झाली.
लिपस्टिकची सर्वात जुनी पाळेमूळे इजिप्त-सुमेरियन संस्कृतीत सापडतात. सुमेरियन संस्कृतीतील स्त्री-पुरुषांनी ओठांना रंगाने आकर्षक बनवण्याची प्रथा रूढ केली असे मानले जाते. त्याकाळी रत्नांचा चुरा करून तो ओठांवर लावण्यात येत असे. अशा लिपस्टिकचे पुरावे मोठ्या प्रमाणात इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीत सापडतात. इजिप्तमधील तत्कालीन समाज जांभळ्या, काळ्या, गडद हिरव्या आणि लाल रंगांचा वापर ओठ रंगवण्यासाठी करत होता आणि हा रंग मिळविण्यासाठी इजिप्शियन लोक वेगवेगळ्या पद्धती वापरत होते. इजिप्तमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या कोचिनीअल किड्याला चिरडून त्यापासून लाल रंग तयार करण्यात येत असे. अशा स्वरूपात किडयापासून तयार करण्यात येणारा रंग सौंदर्यवती राणी क्लिओपात्रा वापरत होती.

लिपस्टिकचे विविध रंग कसे तयार केले जात?
लाल व गडद हिरवा हे क्लिओपात्राचे आवडते रंग होते. या शिवाय शिसे, ब्रोमिन मॅनसाइट आणि आयोडिन अशा घातक पदार्थांपासून देखील इजिप्त मध्ये लिपस्टिक तयार करण्यात येत होती. इजिप्त शिवाय प्राचीन काळी ग्रीसमधील महिला काही रत्नं कुटून त्याची वस्त्रगाळ पावडर बनवायच्या व त्याचा उपयोग ओठ रंगविण्यासाठी करत होत्या. सुमेरियन-इजिप्त संस्कृतींना समकालीन सिंधू संस्कृतीत ओठ रंगविण्याची परंपरा असल्याचे मुबलक पुरावे उपलब्ध आहेत, तर भारतीय संस्कृत साहित्यात या लिपस्टिकचा उल्लेख अधर राग म्हणून केला जातो. पारंपरिकरित्या जपानमध्ये जाड व गडद रंगाचा वापर ओठांसाठी वापरण्यात येत होता.

प्राचीन युरोपात लिपस्टिक ठरली होती घातक
आज कुठल्याही भीतीशिवाय वापरण्यात येणारी लिपस्टिक ही नेहमीच सुरक्षित मानली जात होती असे नाही. मध्ययुगीन काळात लिपस्टिक ही प्रकृतीसाठी घातक मानली जात होती. असे असले तरी लिपस्टिकमुळे इतिहासात दगवल्याच्या घटना फारशा उपलब्ध नाहीत. तरी देखील इतिहासात लिपस्टिक घातक का ठरली? ती खरंच घातक होती का? की हा संबंध प्रतीकात्मक आहे. हे जाणून घेणे गरजेचे आहे.

प्राचीन ग्रीक संस्कृतीत ओठांवर लाल रंग या वेश्या लावत असत. लाल रंग हा डाय, वाईन तसेच मेंढयाच्या घामापासून, माणसाच्या लाळे पासून, मगरीच्या मलमुत्रापासून तयार करण्यात येत होता. वेश्या या जर ओठावर रंग न लावता समाजात वावरल्या तर तो गुन्हा मानला जात होता. परंतु इतर स्त्री वर्गाला हा रंग वापरण्यास बंदी होती. या मागे लिपस्टिकमध्ये वापरण्यात येणारे घटक हे मुख्य कारण असावेत, असे अभ्यासक मानतात. नंतर रोमन साम्राज्यात राजाश्रय लाभल्यामुळे लिपस्टिकला चांगले दिवस आले. परंतु या काळात लिपस्टिक सामाजिक दर्जा व फॅशन यांचे प्रतिनिधित्व करणारी ठरली होती. रोमन साम्राज्यात लिपस्टिक ही गेरू,लोह धातू, आणि वनस्पती यांच्या एकत्रित माध्यमातून तयार करण्यात येत होती. परंतु युरोपात लिपस्टिकचा उपयोग हा इसवी सनाच्या पाचव्या शतकात कमी झाल्याचे दिसते.

मध्ययुगीन युरोपात लिपस्टिक वापराविषयी असलेल्या समजुती.
प्राचीन काळातील भारत, इजिप्तसारख्या संस्कृतींमध्ये लिपस्टिक किंवा ओठ रंगविण्याची परंपरा अस्तित्वात असली तरी युरोपात मात्र मध्ययुगीन काळात लिपस्टिक वापरणे निषिद्ध समजले जाई. १० व्या ते १३ व्या शतकात युरोपात लिपस्टिक ही धार्मिक नियमांच्या अंतर्गत निषिद्ध मानली जावू लागली. लिपस्टिक वापरणाऱ्या स्त्रियांवर अनिष्ट शक्तींचा प्रभाव असल्याचे समजण्यात येत होते. या काळात लिपस्टिकच्या वापरावर चर्चने पूर्णपणे बंदी घातली होती. ओठ रंगविणाऱ्या स्त्रियांचा संबंध हा तांत्रिक जादू-टोणा करणाऱ्या विधींशी असल्याचे ते मानत होते. चर्चच्या मते सैतानाला आमंत्रित करण्यासाठी लिपस्टीकचा वापर होई. त्यामुळे मध्ययुगीन युरोपात वेश्या सोडल्यास इतर स्त्रियांना लिपस्टिक वापरने वर्ज्य होते.

इंग्लंडमध्येही लिपस्टिकविरोधात कडक नियम
१७ व्या शतकात इंग्लंडमध्ये लिपस्टिक वापरू नये यासाठी कडक नियम केले होते. तरीही स्त्रिया खाजगीत घरगुती रंगांचा वापर ओठ रंगविण्यासाठी करत होत्या. परंतु नंतरच्या काळात हीच लिपस्टिक युरोपियन समाजात स्टेटस् चा मुद्दा ठरली. उच्चभ्रू समाजात गडद लाल रंगाची लिपस्टिक लावून वावरणे हे मानाचे मानले जावू लागले होते. १९ व्या शतकात मोठ्या प्रमाणात लिपस्टिक वापरण्यास सुरुवात झाली.

अमेरिकेतील लिपस्टिक
अमेरिकेत लिपस्टिक घरी बनविण्याची प्रथा होती. त्यात मधमाशीचे मेण, ठेचलेले किडे, ऑलिव्ह ऑइल यांचा वापर केला जात होता. परंतु ही लिपस्टिक खवट होत होती त्यामुळे तशा प्रकारची लिपस्टिक लावणाऱ्या स्त्रियांच्या जीवाला धोका निर्माण होत होता. १९३८ साला मध्ये अमेरिकेत कॉमेटिक्स अॅक्ट पारित करण्यात आला. या कायद्याच्या अंतर्गत सौंदर्य प्रसाधनांमध्ये कुठल्याही प्रकारचे विषारी पदार्थ वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती.

आधुनिक लिपस्टिक
आज प्रसिद्ध असलेली लिपस्टिक १८८४ साली ‘Guerlain’ या फ्रेंच परफ्यूम कंपनीने पहिल्यांदा बाजारात आणली. ही लिपस्टिक बनवण्यासाठी हरणाची चरबी, मेण आणि एरंडेल तेलाचा वापर केला होता. ही लिपस्टिक रेशीम कागदाच्या आवरणात गुंडाळली जात होती. ‘मौरीस लेव्ही’या उद्योजकाने १९१५ साली लिपस्टिकची ट्यूब फिरवली की लिपस्टिकचं आतील टोक बाहेर येतं ही कल्पना पहिल्यांदा मांडली. त्याने दंडवर्तुळाकर धातूच्या नळीत बसवलेली २ इंच आणि ५ सेंटीमीटर आकारातील लिपस्टिक बाजारात आणली. लिपस्टिक वापरण्याची ही साधी सरळ पद्धत स्त्रियांना पसंत पडली.

लिपस्टिक स्त्रीवादाचे खरे प्रतीक
१९२० सालापर्यंत लिपस्टिकने महिलांच्या दैनंदिन जीवनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले होते. १९२३ सालामध्ये, जेम्स ब्रूस मेसन ज्युनियर यांनी स्विव्हल अप ट्यूब बनवली. त्या काळातील फॅशन आयकॉन हे चित्रपट तारे होते. लिपस्टिकमध्ये प्लम्स, ऑबर्गिन, चेरी, गडद लाल आणि तपकिरी रंगांना या काळात सर्वाधिक मागणी होती. १९२० सालामध्येच स्त्रीवादाची पहिली लाट आली. त्या काळी लिपस्टिक हे स्त्रीवादाचे खरे प्रतीक मानले गेले. ६० % किशोरवयीन मुली लिपस्टिक लावतात, तर ५०% किशोरवयीन मुली त्यांच्या पालकांशी लिपस्टिकसाठी भांडतात असा दावा १९५० च्या दशकातील एका सर्वेक्षणात करण्यात आला होता.

दुसरे महायुद्ध व लिपस्टिक
दुस-या महायुद्धाच्या वेळी काही देशातील नर्सेस लाल रंगाची लिपस्टीक लावून रुग्णाची सेवा करत होत्या कारण लाल रंगाची लिपस्टीक लावलेली स्त्री पाहिल्यावर सैनिक शांत होतात अशी समजूत होती. दुसऱ्या महायुद्धाच्या संकटातून जात असताना, १९४० च्या दशकात महिलांनी युद्धाच्या सीमेवर पुरुषांसोबत कष्टकरी नोकर्‍या स्वीकारल्या. सर्व साहित्याचा पुरवठा कमी होता, आणि लिपस्टिकसाठी, धातूच्या नळ्या तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिक आणि कागदाने बदलल्या गेल्या. साहित्याच्या कमतरतेमुळे, या काळातील मेकअप सर्जनशील आणि हवादार होता. युद्धाच्या कठीण काळात समाजाचे (पुरूषांचे) मनोबल वाढवण्यासाठी महिलांना ओठांवर लाल रंगाचे लावण्यास प्रोत्साहित केले गेले

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did the church ban the use of lipstick svs