तिबेटी बौद्ध पंथाचे चौदावे दलाई लामा ‘तेन्झिन ग्यात्सो’ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात दलाई लामा हे एका लहान मुलाच्या ओठाचे चुंबन घेत आहेत. आणि त्याला आपल्या जिभेला त्याच्या जिभेने स्पर्श करण्यास सांगत आहेत. यामुळे दलाई लामा यांच्यावर प्रचंड टीका सुरू झाली. त्यांचे हे कृत्य ‘घृणास्पद’ असल्याचा आरोप झाला. या टीकेनंतर दलाई लामा यांनी माफीही मागितली. त्याच निमित्ताने त्यांच्या या कृत्याला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का? हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न…
दलाई लामा हे नक्की कोण आहेत?
हिमालयाच्या उत्तरेस तिबेटचे पठार आहे. हा देश स्वतंत्र होऊ पाहतो आहे, त्यासाठी गेली अनेक वर्षे त्यांचा लढा सुरू आहे. चीनने तिबेटवर अधिकार सांगितला असून त्यावरून वाद सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात तिबेटचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिबेटच्या इतिहासाविषयी माहिती तिबेटी, चिनी व बौद्ध साहित्यातून मिळते. तिबेटवर आदिम काळापासून नेमक्या कोणत्या राजसत्तेचे आधिपत्य होते याची ठोस माहिती पुराव्याअभावी उपलब्ध नाही. पुरातत्त्वीय व साहित्यिक पुराव्यांच्या आधारे इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात ‘चिअँग’ जमातीचे वर्चस्व या पठारावर होते. या जमातीने आपला स्वतःचा बोन या नावाचा निसर्गपूजेवर आधारित धर्म प्रचलित केला होता. हे लोक निसर्गपूजेसमवेत भुताखेतांचीही आराधना करीत होते. किंबहुना भारतातून तेथे गेलेल्या बौद्ध धर्मावर त्या भागातल्या स्थानिक पूजाविधींचा प्रभाव आजही प्रकर्षाने जाणवतो.
आणखी वाचा: विश्लेषण: क्लिओपात्रा खरंच गाढविणीच्या दुधाने अंघोळ करायची का?
बौद्ध धर्माला राजाश्रय
स्थानिक कथांनुसार ‘चिअँग’ जमातीतील ‘पुग्याल’ हा तिबेटचा पहिला राजा असावा असे मानले जाते. बौद्ध धर्माशी संबंधित साहित्यानुसार न्यात्रीत्सेन पो (न्यात्रीसेन पो) हाच ऐतिहासिकदृष्ट्या पहिला राजा होता. याच्या पिढीतील राजांनी बौद्ध धर्माचा स्वीकार मोठ्या प्रमाणात केला. किंबहुना यासाठी भारतातून बौद्ध धर्माचे अभ्यासक, पंडित यांना आमंत्रण देऊन या धर्माची तिबेटमधील मुळे खोलवर रुजवण्यात आली होती. याच वंशातील सातव्या शतकात गादीवर आलेल्या ‘त्रिसाँग देत्सेन’ या राजाने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला व चीनशी असलेले आपले संबंध हे राज्यविस्तारापुरतेच मर्यादित ठेवले. त्याच्या राज्यकाळात भारतातून बौद्ध गुरू पद्मसंभव यांस बोलावून तिबेटमध्ये तांत्रिक बौद्ध धर्माच्या पीठाची निर्मिती करण्यात आली होती. त्यांनी मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा तिबेट व चीनमध्ये प्रसार केला. त्यामुळे इसवी सनाच्या सातव्या शतकापासून तिबेटमध्ये बौद्ध धर्म पूर्णतः रुजलेला दिसतो.
दलाई लामांना सर्वमान्यता
पंधराव्या शतकात तिबेटवर मंगोलियाचे वर्चस्व असताना या वंशातील राजपुत्र आल्तन खान याने ‘सोनाम ग्यात्सो’ या लामाला ‘ता’ अथवा ‘दलाई’ हा किताब दिला. दलाई लामा या शब्दाचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. म्हणूनच त्या भागातील तांत्रिक बौद्ध पंथावर मंगोलिया व चीन येथील धार्मिक विधींचा प्रभाव आहे. १६४२ मध्ये संपूर्ण तिबेटवर मंगोलियनांचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यांच्या काळात दलाई लामा या पदाला धर्मप्रमुख म्हणून मान्यता देण्यात आली. यानंतर तिबेटमध्ये या पदाचे महत्त्व वाढत गेले. राजाचे प्रमुख सल्लागार म्हणून दलाई लामा कार्य करू लागले. कालांतराने राजाचे पद नामधारी राहिले व सगळी सत्ता दलाई लामांकडे एकवटली. तिबेटमध्ये दलाई लामा हे बोधिसत्व अलोकितेश्वराचा अवतार आहेत अशी मान्यता असल्यामुळे त्यांचे वर्चस्व सर्वमान्य होते. सध्या असलेले चौदावे दलाई लामा ‘तेन्झिन ग्यात्सो’ हे १९३९ मध्ये या पदावर आरूढ झाले होते.
आणखी वाचा: विश्लेषण: आधुनिक फॅशन ट्रेण्डमध्ये ‘इंडिगो ब्लू’ आला कुठून?
दलाई लामांच्या कृतीमागे वज्रयान या तांत्रिक बौद्ध तत्त्वज्ञानाची काही भूमिका आहे काय?
सर्वसाधारणपणे आपल्याला बौद्ध धर्मातील हीनयान व महायान याच संप्रदायांविषयी माहिती असते. परंतु इसवी सनाच्या चौथ्या शतकानंतर बौद्ध धर्मात वज्रयान या तत्त्वज्ञानाला सुरुवात झालेली दिसते. या तत्त्वज्ञानाची पाळेमुळे महायान या संप्रदायात आढळतात. मूळचे बौद्ध तत्त्वज्ञान साधे, सोप्पे असले तरी काळाच्या ओघात निर्माण झालेल्या वज्रयान या संप्रदायात तांत्रिक विधींचा सहभाग होता. किंबहुना या पंथाची ओळख तांत्रिक पंथ म्हणूनच आहे. तांत्रिक विधींमध्ये पंच-मकारांचा समावेशही होता व आहे हे येथे विसरून चालणार नाही. या पंथाचा पगडा हा बंगाल,ओदिशा, तिबेट या भागावर प्रामुख्याने आढळतो. याशिवाय जपान, चीनसारख्या आग्नेय आशियात याच पंथाचा प्रभाव आहे. म्हणूनच वज्रयान या बौद्ध पंथात बुद्ध, बोधिसत्व यांच्या समवेत देवीपूजेला अधिक प्राधान्य देण्यात आले. किंबहुना देवीच्या उपासनेचे महत्त्व पुरुष देवतांपेक्षा अधिक आहे.
दलाई लामांनी असे का केले?
आता प्रश्न आहे तो दलाई लामांचा आणि त्यांनी केलेल्या कृतीचा. दलाई लामा हे स्वतः तांत्रिक बौद्ध पंथाशी संबंधित आहे. तिबेटमध्ये हीनयान किंवा महायान नाही तर वज्रयान पंथाचा प्रभाव आहे. तिबेटमधील जनसमुदाय हा बोधिसत्व अवलोकितेश्वरास प्रधान मानतो. या तांत्रिक पंथानुसार त्यांनी केलेल्या कृतीत काहीही गैर नाही. तिबेटमधील दंतकथेनुसार एका दुष्ट राजाचा पुनर्जन्म होऊ नये म्हणून एकमेकांना भेटताना जिभेचा स्पर्श करण्याची पद्धत आहे. परंतु ही एकच प्रथा आहे असे नाही, वज्रयान पंथानुसार समाजात जे निषिद्ध आहे त्याचा त्यांना निषेध नाही. हेच सिद्ध करणारी वज्रयान पंथाशी संलग्न कथा महाराष्ट्राच्या इतिहासातदेखील आहे.
महाराष्ट्र व तांत्रिक तिबेटी बौद्ध धर्म यांच्यात दुवा सांगणारा नेमका संदर्भ काय?
महाराष्ट्र व तांत्रिक तिबेट बौद्ध धर्म यांच्यात दुवा सांगणारा संदर्भ ‘लीळाचरित्रा’त येतो. बौद्ध वज्रयान पंथातील चौऱ्यांशी सिद्धांपैकी आदिसिद्ध म्हणून ज्यांची ख्याती आहे ते म्हणजे ‘लुइपा’. त्यांचा या ग्रंथात लुइपाइ म्हणून संदर्भ येतो. या संदर्भानुसार ते अमंगळ आहेत. लुइ म्हणजे किडे. लुइपा हे किडे ठेचून खात असत. त्याच्या तोंडावर नेहमी माश्या घोंगावत असत. ते बाहेरून अमंगळ असले तरी प्रचंड सामर्थ्यशाली होते. त्यांच्या सामर्थ्याची कल्पना असल्याने तत्कालीन राजाचा प्रधान हा त्यांचा शिष्य होता. कथेनुसार एकदा राजा आणि प्रधान यांची स्वारी रस्त्यावरून जात असताना. वाटेत लुइपा दिसताच प्रधानाने घोड्यावरून उतरून लुइपा यांना वंदन केले. हे पाहताच राजा हसला. त्याने तोंडावर माश्या घोंगावणाऱ्या लुईपांची चेष्टा केली. हे ऐकताच लुइपा संतापले. ते उद्गारले ‘हां राया, जाये: येती बार तुं हास्या: अब हुं हांसुं: तरि ताऱ्हा सबही परिवारु हांसे:’ त्यांच्या या उद्गारामुळे राजाचा सारा परिवार अविरत हसत राहिला. हसणे थांबण्याचे नावच घेईना. पोटातील आतडी पिळवटून ते हसत राहिले. शेवटी राजाने क्षमायाचना केल्यानंतर हा प्रकार थांबला. त्यानंतर राजा लुईपांचा शिष्य झाला. परंतु ही दीक्षा मिळविण्याकरिता राजाला कुंभाराच्या घरात भिक्षा मागण्याचा आदेश लुइपा यांनी दिला होता. लोकलज्जेस्तव राजाने ही भिक्षा रात्री अंधारात जाऊन मागितली व प्रामाणिकपाने घडला तो प्रकार लुइपा यांना सांगितला. हे ऐकताच लुइपा तिथून निघून गेले. लुइपा यांच्याकडून सिद्धी मिळविण्याकरिता राजा व प्रधान हे त्यांचा मागे गेले. लुइपा प्रथम मद्यालयात गेले. तेथे त्यांनी मद्य प्राशनानंतर प्रधानास गहाण ठेवले व नंतर वेश्यागमन केले, तेथे राजास गहाण ठेवले. तब्बल १२ वर्षांनंतर त्यांची सुटका केली. त्या वेळेस कथेनुसार त्या दोघांना सिद्धी प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. यावरूनच तांत्रिक बौद्ध पंथातील वेगळेपणाची प्रचीती येते.
सध्या चौदाव्या दलाई लामांनी ज्या मंदिरात ही कृती केली ते तिबेटी पंथाचे बौद्ध मंदिर धरमशाला (हिमाचल प्रदेश) येथे आहे. हे मंदिर लुइपा या परंपरेशी संलग्न आहे. अनेकांना दलाई लामा ही कृती करत असताना सभोवतालच्या लोकांनी विरोध का केला नाही हा प्रश्न पडला होता. त्याचे उत्तर कदाचित या परंपरेत आहे.