भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुव विल्मोर या नासाच्या अंतराळवीरांना घेऊन बोइंग कंपनीचे ‘स्टारलायनर’ हे यान ५ जून रोजी अंतराळात झेपावले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून एक किंवा दोन आठवड्यांत ते परततील अशी अपेक्षा होती. मात्र आता एक महिना होत आला असून अद्याप ‘स्टारलायनर’ पृथ्वीवर परतले नाही. हे दोन्ही अंतराळवीर अद्याप का परतले नाहीत, त्यांच्या मार्गात काय अडचणी आल्या आहेत, याविषयी…

नासाचे अंतराळवीर पृथ्वीवर परत कधी येणार?

अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’मध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी दुसऱ्यांदा अंतराळा भरारी घेतली. त्यांचे सहकारी बुव विल्मोर यांच्यासह बोइंगच्या स्टारलायनर अंतराळ यानातून ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानका’मध्ये (आयएसएस) पोहोचले. गेल्या महिन्यात ५ जून रोजी स्टारलायनर अंतराळात झेपावले. ‘आयएसएस’मध्ये राहून आठ ते १५ दिवसांत नासाच्या शास्त्रज्ञांची ही जोडगोळी पृथ्वीवर परतणार होती. मात्र आता तब्बल एक महिना होत आला असून हे दोन्ही शास्त्रज्ञ परतले नाहीत. त्यांच्या उपकरणांमध्ये समस्या झाल्या होत्या, मात्र नासा आणि बोइंग यांनी उपकरणांच्या समस्यांचे निवारण केल्यामुळे ते मार्गावर आले आहे. पृथ्वीवर अवतरणाच्या तीन तारखा जाहीर करण्यात आल्या, मात्र नासाकडून त्या रद्द करण्यात आल्या. या अंतराळवीरांना घरी कधी परत आणायचे हे ठरवण्यासाठी आता नासा सर्व तांत्रिक अडचणींचा उच्चस्तरीय आढावा घेत आहे. ‘‘दोन्ही अंतराळवीर अंतराळात अडकले नाहीत. त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी कोणतीही घाई नाही. प्रथम अधिकच्या चाचण्या केल्या जाणार आहे,’’ असे नासाचे व्यावसायिक क्रू कार्यक्रम व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच यांनी सांगितले.

हेही वाचा >>>राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शहीद अब्दुल हमीद यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन: काय होते अब्दुल हमीद यांचे शौर्य?

परतीचा प्रवास पुढे का ढकलण्यात आला?

नासाच्या दोन्ही अंतराळवीरांचा परतीचा प्रवास थांबवण्यात आला, त्या वेळी नासाने सांगितले की, त्यांच्या अंतराळ यानाच्या प्रणोदन प्रणालीमध्ये (प्रोपल्शन सिस्टीम) निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे. अंतराळयान पुढे ढकलण्याचे काम प्रोपल्शन सिस्टीम ही यंत्रणा करत असते. थ्रस्टर्समध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी, प्रोपल्शन सिस्टीममध्ये वापरण्यात येणाऱ्या हेलियमच्या वायूगळतीमुळे स्टारलायनर पृथ्वीवर परतण्यास विलंब झाला, असे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. प्रोपल्शन सिस्टीम कॅप्सूलला जोडलेली आहे, परंतु ती तपासणीसाठी पृथ्वीवर परत येत नाही. कारण पुन्हा पृथ्वीवर आल्यास परत जाताना ती जळून जाण्याची भीती असते. त्यामुळे अंतराळवीर जोडगोळीच्या पृथ्वीवरील अवतरणासाठी आम्ही घाई करू शकत नाही, असे संशोधकांनी सांगितले. परिभ्रमण प्रयोगशाळेत असतानाच एका अंतराळवीराच्या स्पेससूटमधून पाणीगळती झाल्यानंतर सोमवारचा स्पेसवॉक रद्द करण्यात आला. गळतीची छाननी होत असताना मंगळवारसाठी नियोजित स्पेसवॉक जुलैअखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे विल्यम्स आणि विल्मोर यांचा अंतराळातील मुक्काम वाढलेला आहे.

हेही वाचा >>>अयोध्येत जानेवारीत बांधलेला ‘राम पथ’ खचला; रस्ता का खचतो आणि ते टाळण्यासाठी काय करावं?

अंतराळ प्रवासात काय समस्या आल्या?

अवकाशयानाची दिशा किंवा उंची यामध्ये आवश्यक सुधारणा करणारे यंत्र म्हणजे थ्रस्टर. कॅप्सूलच्या २८ पैकी पाच थ्रस्टरमध्ये बिघाड झाला आहे. अंतराळ स्थानकावर थ्रस्टर बंद झाले. एक थ्रस्टर सोडून इतर सर्व पुन्हा सुरू करण्यात आले आणि नंतर करण्यात आलेल्या चाचणीमध्ये ते कार्यरत झाले, असे नासाने सांगितले. एक सदोष थ्रस्टर बंद करण्यात आला आहे. परतीची तारीख निश्चित करण्यापूर्वी थ्रस्टरच्या अधिक चाचण्या केल्या जातील, असे स्टिच यांनी सांगितले. अंतराळात वावरताना यानाला दिशा देण्यासाठी हेलियम वायूचा वापर केला जातो. पृथ्वीवर परतताना वातावरणात शिरतानाची यानाची गती कमी करण्यासाठीही हेलियम वायू महत्त्वाचा असतो. मात्र ‘स्टारलायनर’ यान प्रक्षेपित करतानाच हेलियमची लहानशी गळती झाली होती. मात्र त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे नासाच्या तंत्रज्ञांनी सांगितल्याने उड्डाण करण्यात आले. मात्र यान अंतराळ स्थानकात पोहोचेपर्यंत आणखी चार वेळा हेलियमची गळती झाली आहे. मात्र शास्त्रज्ञांनी सांगितले की हेलियमचा पुरेसा पुरवठा असून चिंता करण्याचे कारण नाही. या सर्व समस्यांचे निराकरण केल्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यात येणार आहे.

पुढे काय होणार?

न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात थ्रस्टर चाचणी करण्यात येत असून त्यासाठी आणखी काही आठवडे लागतील, असे स्टिच यांनी सांगितले. कॅप्सूल ४५ दिवसांपर्यंत अंतराळ स्थानकात राहू शकते, कारण अंतराळ यानात बॅटरी आहेत. मात्र ४५ पेक्षा अधिक दिवसांपर्यंत ते वाढवले जाऊ शकते, असे शास्त्रज्ञांनी नुकतेच सांगितले. विल्मोर आणि विल्यम्स अंतराळ स्थानकात काम आणि संशोधन करत आहेत. बोइंग कॅप्सूलवरील यंत्रणा तपासण्याचे कामही ते नियमित करत आहेत. दोघांनाही अंतराळ स्थानकात काम करण्याचा अनुभव असल्याने अडचणी येणार नाहीत, असे नासाने सांगितले. विल्यम्स व विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्याची क्षमता स्टारलायनरमध्ये आहे, असे नासाने स्पष्ट केले. अंतराळ स्थानकात आणीबाणीची परिस्थिती आली तर या दोन अंतराळवीरांना स्टारलायनरमध्ये बसून पृथ्वीवर परतता येईल, असेही नासाच्या संशोधकांनी स्पष्ट केले.

sandeep.nalawade@expressindia.com