अमोल परांजपे
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे घर आणि कार्यालयात काही सरकारी गोपनीय कागदपत्रे आढळून आली आहेत. या कागदपत्रांची संख्या फार मोठी नाही आणि ती खरोखर किती महत्त्वाची आहेत, हेदेखील समोर आलेले नाही. मात्र या घटनेमुळे अमेरिकेच्या राजकारणात लहानसे वादळ निर्माण केले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन समर्थकांच्या हाती अचानक हुकमाचा पत्ता लागला आहे. यानिमित्ताने अमेरिका, तिथले नेते आणि विशेष म्हणजे ‘गोपनीय’ वैगरे असलेल्या कागदपत्रांची सुरक्षा हे मुद्दे चर्चेत आले आहेत.
बायडेन यांच्याकडे कागदपत्रे कशी आणि कधी सापडली?
बायडेन यांच्या डेलावेअर येथील घरातील वाचनालय आणि गॅरेजमध्ये ‘गोपनीय’ शेरा मारलेली सरकारी कागदपत्रे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे ही कागदपत्रे दुसऱ्या-तिसऱ्या कुणाला नव्हे, तर खुद्द बायडेन यांच्याच खासगी वकिलांना सापडली. ही कागदपत्रे मिळाली होती २ नोव्हेंबर २०२२ रोजी, म्हणजे अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका होण्यापूर्वी. मात्र त्यानंतर दोन-अडीच महिने ही माहितीदेखील ‘गोपनीय’ ठेवण्यात आली. ९ जानेवारीला सर्वप्रथम याची वाच्यता झाली आणि ११ तारखेला बायडेन प्रशासनाने याला दुजोरा दिला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, १२ तारखेला बायडेन यांच्या वॉशिंग्टनमधील कार्यालयातून (पेन बायडेन सेंटर) आणखी काही गोपनीय कागदपत्रे सापडली आहेत.
ही कागदपत्रे कोणती आहेत, त्यांचे महत्त्व किती आहे?
बायडेन यांचे घर आणि कार्यालयात सापडलेली कागदपत्रे ते अमेरिकेचे उपाध्यक्ष असतानाच्या काळातील आहेत. २००९ ते २०१६ अशी आठ वर्षे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात बायडेन उपराष्ट्राध्यक्ष होते. म्हणजे त्यावेळी काही महत्त्वाची कागदपत्रे असू नये तिथे गेली होती आणि तब्बल सहा वर्षांपेक्षा अधिक काळ ती तिथेच होती, हे स्पष्ट आहे. ही कागदपत्रे नेमकी कोणत्या विभागाची आहेत, किती महत्त्वाची आहेत, देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली गेली आहे का आदी मुद्दे तपासाअंती स्पष्ट होतील आणि कदाचित जगासमोर येतील. मात्र या घटनेने बायडेन यांची डोकेदुखी वाढविली आहे, हे नक्की.
कागदपत्रांबाबत बायडेन प्रशासनाची भूमिका काय?
या प्रकाराची चौकशी करण्याची घोषणा ‘व्हाइट हाऊस’ने केली. विधि खात्याचे शिकागोस्थित वकील जॉन लाऊख यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी होणार होती. मात्र त्यानंतर अमेरिकेचे महाधिवक्ता मेरिक गारलँड यांनी विशेष पथकामार्फत चौकशी केली जाईल, असे जाहीर केले आहे. मेरिलँड येथील ट्रम्प यांनी नियुक्त केलेले सरकारी वकील रॉबर्ट हर यांच्या नेतृत्वाखाली आता ही चौकशी होईल. हर हे लवकरच लाऊख यांच्याकडून तपासाची सूत्रे हाती घेतील. तपासयंत्रणेतील बदलास वेगळा राजकीय अर्थही आहे. कारण विधि खात्याने ट्रम्प यांच्या फ्लोरिडामधील बंगल्यामध्ये सापडलेल्या ३०० गोपनीय कागदपत्रांबाबत बरीच हवा निर्माण केली होती. आता बायडेन यांना त्याच स्थितीतून जावे लागू शकेल.
यावर रिपब्लिकन पक्षाचे काय म्हणणे आहे?
अर्थातच, या घटनेमुळे रिपब्लिकन नेत्यांना आणि खास करून ट्रम्प समर्थकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या नसत्या तरच नवल. अथक परिश्रम करून ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज’ या कनिष्ठ प्रतिनिधीगृहाचे सभापती झालेले केविन मॅकार्थी यांनी ‘काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांबाबत याच खुर्चीत बसलेल्या व्यक्तीकडून चिंता व्यक्त केली गेली होती. आता उपाध्यक्ष बायडेन यांच्याकडील कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी उघड्यावर पडून होती, हे समोर आले आहे’ असे सांगत मॅकार्थी यांनी आपला हेतू स्पष्ट केला आहे. बायडेन यांच्याकडील कागदपत्रांमुळे किती नुकसान झाले आहे, याची गुप्तचर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी ‘हाऊस इंटेलिजन्स कमिटी’चे सदस्य आणि ओहायोचे रिपब्लिकन प्रतिनिधी माईक टर्नर यांनी केली आहे.
‘उपाध्यक्ष’ बायडेन यांना भेटणारेही चौकशीच्या फेऱ्यात?
‘व्हाइट हाऊस’ने ज्यावेळी बायडेन यांच्याकडे कागदपत्रे सापडल्याचे मान्य केले, त्यावेळी त्यांना उपाध्यक्ष असताना आणि त्यानंतर बायडेन यांच्या डेलावेअरमधील निवासस्थानी कुणीकुणी भेट दिली होती, याची माहिती आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र प्रवक्त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. आता रिपब्लिकन पक्षाचे नेते नेमका हाच मुद्दा उचलून धरत आहेत. काँग्रेसमधील रिपब्लिकन सदस्यांनी बायडेन यांना भेटणाऱ्यांची यादी तपासण्याची मागणी केली आहे. यातून गोपनीय कागदपत्रे तिथे कशी पोहोचली आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला किती धोका आहे, हे समोर येईल असे त्यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेच्या राजकारणात ‘गोपनीय कागदपत्रां’चे स्थान काय?
वॉशिंग्टनमध्ये ‘गोपनीय’ या शब्दाचा दुसरा अर्थ ‘वाद’ असा आहे. यापूर्वी हिलरी क्लिंटन अध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात असताना आपल्या खासगी ईमेल सर्व्हरवरून गोपनीय माहिती पाठविल्याचा आरोप झाला. हा मुद्दा डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलून धरला आणि त्याचा त्यांना फायदाही झाला. पुढे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ट्रम्प यांनी स्वत: तेच केले. ‘व्हाइट हाऊस’ सोडताना गोपनीय कागदपत्रे स्वत:सोबत नेली. याचा परिणाम म्हणून त्यांच्यावर गुन्हेगारी खटला चालण्याची शक्यता आहे. आता बायडेनदेखील चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
सरकारी सुरक्षा यंत्रणा अपुरी आहे का?
या घटनांमुळे एक मुद्दा मात्र अधोरेखित झाला आहे, तो म्हणजे अमेरिकेतील गोपनीय कागदपत्रांची हाताळणी. अध्यक्ष, उपाध्यक्षांना असलेले अमर्याद अधिकार आणि त्याचा गैरवापर हा मुद्दाही यामुळे ऐरणीवर आला आहे. गोपनीय शेरा मारलेली कागदपत्रे खरोखर किती महत्त्वाची असतात, हा विषय बाजूला ठेवला तरी ती इतस्तत: विखुरलेली असणे धोकादायक आहेच.
amol.paranjpe@expressindia.com