-सुनील कांबळी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरपोच खाद्यपदार्थ सुविधा पुरविणाऱ्या झोमॅटो कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी कपातीबाबत तंत्रज्ञान, ई-कॉमर्स क्षेत्रातील बड्या कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या झोमॅटोचा हा निर्णय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पुरेसा सूचक आहे.

झोमॅटो किती कर्मचारी कपात करणार? 

कामगिरीवर आधारित मूल्यमापन करून तीन टक्के कर्मचारी कपात करण्याची घोषणा झोमॅटोने शनिवारी केली. म्हणजे सुमारे १०० कर्मचाऱ्यांना कमी केले जाईल. उत्पादन, विपणनासह सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. मात्र, ही कामगिरी आधारित नियमित कर्मचारी कपात असून, त्यात वेगळे काही नाही, असे कंपनीने म्हटले आहे. 

झोमॅटोचे मनुष्यबळ किती? 

सध्या देशभरात झोमॅटोचे ३८०० कर्मचारी आहेत. करोना उद्रेकामुळे व्यवसायावर विपरित परिणाम झाल्याने झोमॅटोने मे २०२०मध्ये ५२० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. ती एकूण मनुष्यबळाच्या १३ टक्के होती. या तुलनेत आताची कर्मचारी कपात कमी आहे. मात्र, बड्या कंपन्यांकडूनही रोजगार संधी कमी होत असताना झोमॅटोकडून हे पाऊल उचलले जाणे हे अर्थव्यवस्थेबाबत सूचक मानले जाते.  

वरिष्ठांमध्येही राजीनामासत्र? 

कर्मचारी कपातीची घोषणा होण्याआधी झोमॅटोचे सहसंस्थापक मोहित गुप्ता यांनी शुक्रवारी राजीनामा दिला होता. झोमॅटोच्या वरिष्ठांमधील महिनाभरातील ही तिसरे पदाधिकारी ठरले. त्याआधी राहुल गुंजू आणि सिध्दार्थ झावर या वरिष्ठांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे कर्मचारी कपातीची शक्यता मानली जात हाेती. ती खरी ठरली.

तोटा कमी करण्यात यश किती?

सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत झोमॅटोचा निव्वळ तोटा २५१ कोटी रुपये नोंदविण्यात आला. वर्षभरापूर्वी हा तोटा ४३० कोटी रुपये होता. कार्यसंचालनातून मिळणारे उत्पन्न वर्षभरापूर्वीच्या १०२४ कोटींवरून १६६१ कोटींवर पोहोचले. म्हणजे त्यात ६२ टक्के वाढ झाली. मात्र, ती कमीच असल्याचे मानले जाते.

खाद्यपदार्थ पुरवठा सेवेला फटका? 

सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत महागाईत मोठी वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे मागणी कमी होऊन किरकोळ क्षेत्र, ई-कॉमर्स कंपन्यांना फटका बसला. खाद्यपदार्थ पुरवठादार कंपन्यांनाही त्याचा फटका बसला. झोमॅटोचाही विकासवेग मंदावला. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत झोमॅटोच्या व्यवसायात केवळ २२ टक्के वाढ झाली. ती अपेक्षेहून कमी असल्याने खर्चकपात करण्यासाठी झोमॅटोने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला. 

कर्मचारी कपात आणखी कुठे? 

याआधी ट्विटरने ३७०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आणखी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे संकेत ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी दिले आहेत. त्यापाठोपाठ मेटाने (फेसबुक-व्हाॅट्सॲप) ११ हजार, तर ॲमेझाॅनने १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ऑनलाइन शिकवणीतील नवतंत्रज्ञानाधारित कंपनी बायजूने सुमारे अडीच हजार कर्मचारी कपात करण्याची घोषणा गेल्या महिन्यातच केली होती. खर्चकपात करण्यासाठी पाच टक्के (एकूण मनुष्यबळ ५० हजार) कर्मचारी कमी करणार असल्याचे कंपनीने म्हटले होते. ‘सिस्को’नेही सुमारे चार हजार कर्मचारी कमी करणार असल्याचे म्हटले आहे. त्यात आता झोमॅटोचीही भर पडली आहे. तंत्रज्ञान कंपन्यांपासून सुरू झालेली कर्मचारी कपातीचे लोण अन्य क्षेत्रांत पसरणार का, अशी भीती निर्माण झाल्याने अर्थव्यवस्थेत चिंतेचे मळभ दाटले आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did zomato announce second lay off in two years print exp scsg