डासांना असणारी रक्ताची लालसा सक्रिय राहणे किंवा त्याचे शमन करण्यासाठी संप्रेरकांची (हार्मोन्स) जोडी एकत्रितपणे कार्य करते, असे अलीकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनात लक्षात आले आहे.
महत्त्वाचा रक्तशोषक कीटक म्हणून डास ओळखले जातात. चावा घेण्याची आणि रक्त शोषण करण्याची कीटकांची प्रवृत्ती यावरही आजवर अनेकदा संशोधन झाले आहे. परंतु, कीटकांना रक्ताची ही लालसा का असते, हा प्रश्न मात्र आतापर्यंत गूढ आणि अनुत्तरित राहिला होता. मात्र अलीकडेच ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’ (PNAS) मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन प्रबंधामध्ये या प्रश्नाचा उलगडा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. डासांमध्ये रक्ताची लालसा सक्रिय होण्यासाठी किंवा ती दडपली जाणे वा तिचे शमन होण्यासाठी दोन हार्मोन्स एकत्रितपणे कार्यरत असतात, असे लक्षात आले आहे. याच हार्मोन्सच्या कार्यांमुळे डास मानवी रक्ताकडे आकर्षित होतात. प्रस्तुत संशोधनाचा घेतलेला हा सविस्तर आढावा.
डासांच्या रक्तशोषणाबद्दल हे संशोधन काय सांगते?
अंटार्क्टिका खंडाचा अपवाद वगळता इतर सर्व खंडांमध्ये डासांच्या सुमारे ३,५०० प्रजाती आहेत. या प्रजातींच्या माद्या त्यांच्या अंड्यांच्या पोषणासाठी प्राण्यांचे रक्त पितात किंवा त्याचा वापर करतात. परंतु, मादीने अंडी घातल्यानंतर तिची रक्ताची भूक कमी होते.
अथेन्समध्ये असलेल्या जॉर्जिया विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ मायकेल स्ट्रँड यांना हे चक्र नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेबद्दल जाणून घ्यायचे होते. त्यांच्या संशोधनादरम्यान, त्यांनी एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले की, आपली गरज भागवण्यासाठी प्राण्याच्या शोधात असताना विशिष्ट डासांच्या आतड्यातील F(NPF) या संप्रेरकाची पातळी वाढली आणि अंडी घातल्यानंतर जेव्हा गरज पूर्ण झाली त्यावेळी संप्रेरकाची पातळी कमालीची खाली आली.
या निरीक्षणाने स्ट्रँड यांना डासांच्या एन्टरोएंडोक्राइन पेशींचे विश्लेषण करण्यास प्रवृत्त केले, जे आतड्यांतील संप्रेरक निर्मितीसाठी जबाबदार असतात. स्ट्रँड व त्यांच्या सहकाऱ्यांना असे आढळून आले की, रक्त शोषण करण्यापूर्वी कीटकांची NPF पातळी वाढली होती आणि सहा तासांनंतर ती खाली आली. संशोधकांना असेही आढळून आले की, डासांकडून होणाऱ्या मानवी रक्तशोषणास NPF ची वाढलेली पातळीच कारणीभूत असते. अंड्याच्या पोषणासाठी आवश्यक ते रक्तशोषण झाल्यानंतर मात्र त्यांच्यामधील NPF च्या पातळीच घट झाली आणि त्यानंतर मानवी रक्तशोषण थांबले.
संशोधकांना डासांच्या रक्ताच्या लालसेवर परिणाम करणारे आतड्यांतील दुसरे हार्मोन RYamide चे अस्तित्व देखील आढळून आले. रक्त शोषल्यानंतर NPF ची पातळी खाली येते, त्याचवेळेस RYamide ची पातळी मात्र वाढते, असे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले. या प्रयोगाअखेरीस संशोधक या निष्कर्षाप्रत पोहोचले की, NPF च्या पातळीतील वाढ रक्तशोषण वाढवते तर आणि RYamide मधील वाढ रक्तशोषण कमी करण्यास कारणीभूत ठरते आणि एकाच वेळेस या दोन्ही परस्परविरोधी क्रिया काम करत असतात.
अधिक वाचा: केनिया सरकार करणार १० लाख भारतीय कावळ्यांचा संहार; काय आहे नेमकं प्रकरण?
हे महत्त्वाचे का आहे?
बीजिंगमधील चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ झूलॉजीमधील कीटकशास्त्रज्ञ झेन झू यांनी नेचर डॉट कॉमला सांगितले की, “या शोधामुळे डासांचे पुनरुत्पादन आणि रोगांचे संक्रमण रोखण्यासाठी नवीन कीटकनाशक तयार करण्याच्या प्रयत्नांना मोठीच चालना मिळेल.
डास हा या ग्रहावरील सर्वात प्राणघातक प्राणी आहे. ते मलेरिया, डेंग्यू, वेस्ट नाईल व्हायरस, पिवळा ताप, झिका, चिकुनगुनिया आणि लिम्फॅटिक फिलेरियासिस याविकारांच्या विषाणूंचे वाहक म्हणून कार्य करतात, जगातील मानव आणि सजीवांच्या सर्वाधिक मृत्यूस एकटे डासच सर्वात मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत.
खरं तर, वातावरणातील बदलामुळे, डासांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होत आहे. डेंग्यू सारखे रोग नव्या प्रदेशांमध्ये पसरत आहेत. पूर्वी अतिथंड प्रदेशामध्ये डासांचा प्रादूर्भाव फारसा नव्हता. मात्र आता थंड प्रदेशाशीही डासांनी जुळवून घेतले असून तिथेही त्यांचा प्रादूर्भाव वेगात वाढतो आहे, हे चिंताजनक आहे.
© IE Online Media Services (P) Ltd